Book Review : माणसांच्या प्रवाही गोष्टी

Nadishta Book Review : माणसांचं नदीत मिसळून जाणं प्रचंड प्रवाही असू शकतं, याचं वर्णन करणारी कादंबरी म्हणजे मनोज बोरगावकर लिखित ‘नदीष्ट'!
Book Review
Book ReviewAgrowon

- धनंजय सानप

Manoj Borgaonkar Book Review : मानवी संस्कृतीचा झरा पाझरत गेला तो नदीच्या तीरावर. नदी आणि मानव यांच्यातील संबंध प्राचीन आहे. त्या संबंधात दोघेही वेळोवेळी एकमेकांवर कुरघोडी करत आले आहेत. परंतु या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणसांचं नदीत मिसळून जाणं प्रचंड प्रवाही असू शकतं, याचं वर्णन करणारी कादंबरी म्हणजे मनोज बोरगावकर लिखित ‘नदीष्ट'! नदीष्टची गोष्ट सुरू होते नदीवर पोहायला जाणाऱ्या तरुण नायकाच्या निरीक्षणातून. पण या निरीक्षणात केवळ नदीचा भवताल नाही, तर नदीच्या आत आणि बाहेरच्या जगात चाललेल्या घटनांच्या संगमाची ही निरीक्षणं आहेत. या संगमातून लेखकानं नदी आणि माणसांच्या जगाचा समांतर वाचनीय पट उभा केला आहे.

निसर्गाशी एकरूप होताना नदी माणसाला कायम शिकवत राहते, असं म्हणतात. पण तिचा प्रवाह गढूळ करणाऱ्यांनी तिचं नदीपण नासवलं. माणूस तिला आतून बाहेरून जसा गढूळ करतोय तशी माणसांची मनं गढूळ होत चाललीत. या गढूळ तवंगाला बाजूला सारून नदीचा तळ आपल्याला दाखवते नदीष्ट. माणसांमध्ये गढूळपणा कुठून आला? माणसांच्या जडणघडणीचा त्यात किती वाटा आहे? आपल्या भवतालाकडे माणसं कसं पाहतात? त्यातला संकुचितपणा परंपरेच्या अनर्थातून आला असेल का? संकुचितपणा इतका चिवट कसा झाला? त्याच्याशी दोन हात करणाऱ्यांच्या वाट्याला काय येतं? सुख आणि दुःखाच्या मधोमध माणसं खंगून जात नसतील का? अशा कित्येक मानवी भावनांच्या गुंत्याचा अर्थ कादंबरीचा नायक लावू पाहतोय. त्याचा असा अर्थ लावत राहणं आपल्याही ओंजळीत शहाणपण भरत राहतं.

माणुसपणाच्या गप्पा-गोष्टी करताना कित्येक वेळा आपणही भरकटत कोरडे होत जातो. आतला ओलावा संपावा इतकं स्वमग्नतेला कवटाळून बसतो. याच तंद्रीचा हळुवार भंग करतो ‘नदीष्ट’चा प्रत्येक घटक. मग ती कधी नदीच्या घाटावर भेटलेली माणसं असतात तर कधी ती नायकाच्या प्रश्नांच्या न संपलेल्या शोधाची कहाणी असते. या कहाणीत आपल्याला भेटत जातात, आपल्याकडून नकळत हरवलेली पात्रं. त्यामुळे यातल्या प्रत्येक पात्राच्या गोष्टीत आपल्याला स्वतःचा भूतकाळ शोधायला कादंबरीचा नायक भाग पाडतो.

गोदावरी नदीच्या महाकाय पात्रात एक नोकरदार तरूण नियमितपणे पोहायला जातो. त्याला पोहण्याचा नाद लागलेला आहे. तो वेगवेगळ्या वेळी पोहायला गोदावरीच्या पात्रात उतरतो. कधी पहाटे, कधी दुपारी तर कधी संध्याकाळी. त्याचं नदीबद्दलचं कुतुहल अफाट आहे. तो पोहण्यात तरबेज आहे. त्यामुळं नदीच्या एका काठावरून दुसऱ्या काठापर्यंत पोहत जाणं, त्याच्यासाठी धाडसाचं कमी आणि शोधाचं काम आहे. या शोधात नायक इतका बुडालेला आहे की, त्याला नदीचा प्रवाहीपणा सुटत नाही. तो न सुटण्याची कारणं मात्र वाचकाला अंतर्मुख करतात.

Book Review
Book Review : माणसांच्या अस्तित्वालाच भिडणाऱ्या प्रश्‍नांचा मागोवा

नायक नदीच्या पाण्यात उतरल्यावर आत्मीयतेनं नदीचं स्वरूप अनुभवत राहतो. तिचा डोह, तिचा प्रवाह, तिच्यातले खाचखळगे, तिच्यातली वळणं, तिचा अहंकार, तिची खोली-लांबी-रुंदी सगळं काही त्यानं समजून घेतलंय. तरीही त्याचं कुतूहल तिच्या मोहातून त्याला वेगळं होऊ देत नाही. या मोहाला त्याचं भावनिक असणं कारणीभूत आहे. पण त्याची भावनिकता केवळ नदीच्या पात्रापुरती सीमित नाही. या भावनिकतेला सहानुभूतीची किनार आहे. म्हणूनच तर नायकाला भेटणाऱ्या पात्राची आयुष्यं खळखळत आपल्यासमोर येतात. त्यात केवळ दुःख, दैन्य, वैषम्य नाही, तर समाधान, तृप्ती आणि स्थैर्याच्या अधूनमधून उमटणाऱ्या लहरी आहेत. या सगळ्यांची प्रातिनिधिक उदाहरणं म्हणून समूहाच्या मानसिक कोतेपणाचे बळी ठरलेले सगुणा, मालाडी, भिकाजी, साकिनाबी तर आयुष्यभर संघर्षात जिंदगी विरून गेलेल्या दादाराव, बामनवाड, कालूभैय्या या पात्रांच्या कथा एकाच वेळी हळहळ व्यक्त करून निर्मोही व्हायला भाग पाडतात.

Book Review
Book Review : चिरंतन वेदनेचा दस्तावेज – ‘झळ’

‘नदीष्ट’ची कथा नदी अनुभवणाऱ्या प्रत्येकाला आपलीच वाटेल, अशा धाटणीची आहे. परंतु त्याचवेळी तिच्या उदरात आणि काठावर किती आणि काय-काय मांडून ठेवलं आहे, याची बोधात्मक बाजू उलगडून दाखवणारी देखील आहे. नायकाला लागलेला पोहायचा नाद त्याला नदीष्ट करून टाकतो. नदीच्या आत आणि बाहेर डोकावून पाहण्याचा नायकाचा हा नाद म्हणजेच नदीष्ट. जसं नाद एका मर्यादेनंतर माणसाला नादिक बनवतो, तसं नदीचं आतलं आणि बाहेरचं रूप आपल्याला दिसायला लागलं की, आपणही नदीष्ट होत जातो. इतकं की, जणू काही नदीच्या प्रवाहात आपण अलगद तरंगतोय, असं वाटायला लागतं. नदीच्या सोबत माणसांच्या शोधाचा इतका रोमांचकारी प्रवास आपल्यालाही भुलवून टाकतो. सहज, सुटसुटीत प्रसंग वाचून केवळ नॉस्टॅल्जिक भावनेला न कुरवाळताही माणसांचे अंतरंग लेखकाने संयमी पद्धतीनं हाताळलेत, हे या कादंबरीचं वैशिष्ट्य.

मोहित करणारी लेखन शैली, आटोपशीर वर्णनं, आशयातला नेटकेपणा, निरीक्षणातलं सौंदर्य आणि सामाजिक वास्तवाच्या टिचक्यांमुळे कादंबरीच्या कथानकाबद्दलची उत्सुकता वाढत जाते. थोडक्यात लेखकाने नदीची कथा सांगताना माणसांची आयुष्य अत्यंत खुबीनं उलगडून दाखवली आहेत. त्यामुळं माणसांच्या डोहाचे तळ सहज गाठता येतात.

पुस्तक: नदीष्ट (कांदबरी)
लेखक : मनोज बोरगावकर
प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन
पृष्ठसंख्या : १६६
किंमत : २०० रुपये
-----------

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com