डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील
कोणत्याही नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनामध्ये मूलस्थानी संवर्धन महत्त्वाचे असते. जलसंसाधनांच्या संवर्धनामध्ये क्षेत्रीय उपचारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानंतर जलस्रोतांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून क्षेत्रीय उपचार व ओघळीवरील उपचार महत्त्वाचे ठरतात. नाला वर्गीकरण क्रमांक एक ते तीन मधील भौगोलिक क्षेत्रे (चढाची क्षेत्रे, Ridge line) मोठ्या प्रमाणामध्ये माती व पाणी वाहून जाण्यास कारणीभूत ठरतात.
या ठिकाणची जमीनही शेतीसाठी तितकी फायदेशीर नसते. मात्र अशा ठिकाणी उपचार केल्यास त्याचा लाभ निश्चितपणे शेती क्षेत्रास होतो. शेती क्षेत्राचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. या लेखामध्ये घळ नियंत्रणाचे व जलसंधारणाचे इतर उपचार यांची माहिती घेणार आहोत.
घळ नियंत्रणाचे उपचार
घळीचा उगम होत असलेल्या ठिकाणापासून तीव्र उताराचा भाग संपेपर्यंत अथवा सपाट भाग सुरू होईपर्यंत केल्या जाणाऱ्या उपचारांना घळ नियंत्रणाचे उपचार म्हणून ओळखले जाते. घळ नियंत्रणाच्या उपचारामध्ये अनघड दगडी बांध/ उपचाराचा समावेश होतो.
अनघड दगडी बांध
अनघड दगड (Loose Boulder) हे सर्व साधारण नारळाच्या आकाराच्या दगडांच्या साहाय्याने घातले जातात. लूज बोल्डर हा उपचार हा काहीसा ‘गली प्लग’ सारखाच असला तरी यामध्ये रचलेले दगड एका दोरीत असतात. त्यांना दोन्ही बाजूंनी शास्त्रीय पद्धतीने उतार दिलेला असतो. या उपचाराच्या माध्यमातून मातीची धूप पूर्णपणे थांबते. सुरुवातीच्या पहिल्या एक ते तीन वर्षांमध्ये वरच्या क्षेत्रातून येणाऱ्या पाण्यातील गाळ या बांधामध्ये साठतो. कालांतराने गाळमाती साठून एक भिंत तयार होते.
त्यानंतर हे दगडी बांध जलसाठा तयार करू लागतात. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास या बंधाऱ्यावरून जादा पाणी वाहून जाते. अतिपावसाच्या स्थितीत ते फुटण्याची शक्यता निर्माण होते. हे टाळण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी या बांधातील गाळमातीचा साठा उपसावा लागतो. यामध्ये नैसर्गिकरीत्या काही झाडे उगवतात. सरपटणाऱ्या प्राण्यांनाही एक चांगला अधिवास उपलब्ध होतो.
मातीचे छोटे बांध
ज्या भागात अनघड दगड उपलब्ध होत नाहीत, अशा भागांमध्ये मातीची धूप थांबविण्यासाठी ओघळीच्या रुंदीएवढ्या लांबीचा मातीचा छोटा बांध (Small Earthen Bunding) घातला जातो. यामुळे पाणलोटाच्या वरच्या भागातून वेगाने वाहणारा पाण्याचा प्रवाह अडविला जातो. जमिनीची धूप कमी होते. काही अंशी पाणी मुरते.
समपातळी बांधबंदिस्ती /कंटूर बंड
डोंगर उतार संपल्यानंतर पायथ्याशी असणाऱ्या जमिनीवरती शेती केली जाते. पाणलोटाच्या या क्षेत्रात जमिनींचा पोत हलका असतो व अशा जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी समपातळी बांध बंदिस्ती किंवा कंटूर बंड (Contour Bunding) घातले जातात. हे बांध उतारास आडवे समपातळीत घातले जात असल्यामुळे या बांधांना समपातळी बांध म्हणतात.
समपातळी बांधाच्या आतील बाजूस पाण्याचा साठा होतो. जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास मदत होते. या पाण्यामुळे जमिनीच्या खालच्या वरच्या दोन्ही भागांत ओलावा निर्माण होतो व दीर्घकाळ टिकतो.
पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतीमध्ये उत्पादनामध्ये सर्वसाधारणपणे ३० टक्के वाढ होते. समपातळी बांधामध्ये जादा आलेल्या पाण्याला बाहेर काढण्यासाठी समपातळी बांधाला योग्यरीतीने सांडवा केला जातो. खालील क्षेत्रामध्ये जादाचे पाणी काढून दिले जाते. समपातळी बांधावर पवना, कुंदा, गांजनकाडी, खस, मारवेल, शिपरूट इ. स्थानिक गवतांचे बी फेकून वाढवले जातात. त्याच्या मुळांमुळे माती धरून ठेवली जात असल्यामुळे हे बांध भक्कम होतात. जलसाठादेखील चांगला तयार होतो.
स्थानिक प्रदेशानुसार महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जातींची गवते उपलब्ध आहेत. त्या त्या प्रदेशातील गवतांच्या जातींना प्राधान्य दिल्यास निसर्ग संवर्धनास मदत होते. याशिवाय गवताचा वापर पशुधनासाठी चारा म्हणूनही होऊ शकतो. त्यातून ग्रामपंचायतींना चांगले उत्पन्न मिळू शकते. स्थानिक पातळीवर ‘ए फ्रेम’ (A frame) किंवा गवंडी वापरत असलेली पानसळ वापरल्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य अशी समपातळी बांधबंदिस्ती करता येते.
कर्नाटकमध्ये सौंदत्तीनजीक गोंठामार नावाच्या गावामध्ये समपातळी बांधबंदिस्तीमुळे आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे. गवताबरोबर स्थानिक प्रजातीची झाडे बांधावर लावल्यामुळे नैसर्गिक संतुलनदेखील साधले आहे.
ओढ्यानाल्यावरील उपचार
गॅबियन बंधारे (Gabbion Bunding)
पाणलोट क्षेत्रामध्ये एकापेक्षा अधिक तीन किंवा चार घळी एकत्र येत असलेल्या ठिकाणी पाण्याचा दाब वाढतो. अशा ठिकाणी साधे बांध फारसे टिकत नाहीत. अशा क्षेत्रामध्ये लोखंडी जाळी अंथरून त्यामध्ये दगड एका ओळीत बांधून ठेवले जातात. जाळीमुळे दगड वाहून जात नाही. तर दगडाच्या वजनामुळे लोखंडी जाळीही हलत नाही. पाण्याचा दाब बांधावर फारसा पडत नाही. या बांधामधून उताराच्या दिशेने पाणी वाहून जाते.
आलेली गाळ, माती दगडांच्या मध्ये साचते. या प्रक्रियेमुळे काही दिवसातच पाणीसाठा तयार होण्यास मदत होते. सिमेंट बंधाऱ्यास पर्याय म्हणून देखील हा गॅबियन बंधारा बांधला जातो. बंधारा बांधल्यानंतर २ ते ३ वर्षांमध्ये पाठीमागे साठलेल्या गाळाचा उपसा करावा लागतो. त्या वेळी बंधाऱ्याच्या वरील (चढाच्या बाजूस) सर्वसाधारण १ मीटरपर्यंत गाळ न खोदता तसाच ठेवावा.
म्हणजे त्यात सिमेंट बंधाऱ्याच्या क्षमतेचे पाणी या गॅबियन बंधाऱ्यामध्येही साठू शकते. आर्थिकदृष्ट्या गॅबियन बंधारे सिमेंट बांधापेक्षा स्वस्त ठरतात. सरासरी एका सिमेंट बंधाऱ्याच्या खर्चामध्ये दोन ते तीन गॅबियन बंधारे उभारणे शक्य होते. याशिवाय गॅबियन बंधारे दोन ते तीन वर्षांनंतर सिमेंट बंधाऱ्याप्रमाणेच जलसाठा निर्माण करतात. या उपचारांची योग्य देखभाल केल्यास फायदेशीर ठरतात, अन्यथा पुरेशा डागडुजीअभावी हे बंधारे कालांतराने निष्प्रभ ठरतात.
माती नाला बांध (Soil Nalla Bunding)
पाणलोटाच्या मध्य भागात मुरमाड किंवा काळ्या मातीची उपलब्धता सहजासहजी होत असल्यास अशा ठिकाणी माती नाला बांध घातले जातात. सर्वसाधारणपणे नाला तळाचा उतार ३ टक्के असलेल्या आणि नाल्याचे काठ दीड मीटरपेक्षा अधिक उंच असल्यास अशा ठिकाणी मातीचे बांध घालण्यात येतात. नाला बांधातील पाणी साठ्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावण्यास मदत होते.
परिसरातील बागायती क्षेत्रातही चांगली वाढ होते. याचे जादा पाणी सांडव्याद्वारे पुढे नैसर्गिक प्रवाहात सोडले जातात. निसर्गसंवर्धनामध्ये पाणलोट क्षेत्रातील इतर कोणत्याही उपचारापेक्षा मातीनाला बांध कधीही उजवे ठरतात. स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार सर्वसाधारणपणे दोन ते तीन टीसीएम (एक टीसीएम = दहा लाख लिटर) पाणीसाठा सहजरित्या मातीनाला बांधामध्ये साठू शकते.
जलसंकल्पामध्ये एका मॉन्सून काळामध्ये सरासरीएवढे पर्जन्य उपलब्ध झाल्यास सर्वसाधारणपणे दोन ते तीन वेळा हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरतो. माती नालाबांध अनेक सजीवांसाठी नैसर्गिक अधिवास तयार करतो. सर्वसाधारणपणे मातीनाला बांधातील साठलेल्या पाण्यामुळे डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत जलसाठा उपलब्ध होतो. याशिवाय भूगर्भातील पाणीसाठा देखील वाढल्याने रब्बी हंगामातील पिकांना संरक्षित सिंचन उपलब्ध होते.
सिंमेंट बंधारा
पाणलोट क्षेत्रामध्ये काही ठिकाणी माती नाला बांध घालणे शक्य नसते. अशा ठिकाणी कठीण खडक, पाषाण असल्यास सिमेंट बंधारे (Cement Bunding) घातले जातात. सर्वसाधारणपणे पाठीमागून येणाऱ्या ५०० हेक्टर क्षेत्रातील अपधाव गृहीत धरून सिमेंट बंधारे घातले जातात. ओढ्यातील मुख्य प्रवाहास अडविण्यासाठी आडवी भिंत सिमेंट व दगडांच्या साह्याने बांधली जाते.
पाणी साठ्याची ठराविक क्षमता झाल्यानंतर जादाचे पाणी भिंतीवरून खालच्या दिशेला पाडण्याची व्यवस्था केली जाते. सिमेंट बंधारा बांधत असताना नालाकाठाच्या दोन्ही बाजूंस वहितीखाली शेती असणे गरजेचे आहे. त्यामुळे मुरलेल्या पाण्याचा वापर हा आजूबाजूच्या शेती क्षेत्रास होतो. पाणलोट क्षेत्र विकासामध्ये क्षेत्रावरचे उपचार शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास कमीत कमी सिमेंट बंधारे बांधण्याची आवश्यकता भासते.
पाणलोट क्षेत्राच्या ओघळीवरील उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा दृश्य स्वरूपात तयार झाल्याचे दिसत असल्याने गावकऱ्यांना असे उपचार आवडतात. मात्र हे उपचार क्षेत्रीय उपचारांइतके प्रभावी नसतात, हे लक्षात ठेवले पाहिजे. कारण पाणीसाठ्याचे बाष्पीभवन होत राहते. साठविलेल्या पाण्याचे गुणधर्म कालांतराने बदलतात.
- डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (संचालक, शिवश्री पर्यावरण संस्था, पुणे) - डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.