Watershed Management : सामाजिक अभिसरणाचे पाणलोटातील महत्त्व

Water Conservation : सामाजिक अभिसरण म्हणजे संसाधन विकासाचा एक समान दृष्टिकोन आणि एक सारख्या साधनांचा वापर करत लोकांनी एकसंधपणे केलेली एकत्रित कृती होय.
Watershed Management
Water ConservationAgrowon
Published on
Updated on

Watershed Development : सामाजिक अभिसरण म्हणजे संसाधन विकासाचा एक समान दृष्टिकोन आणि एक सारख्या साधनांचा वापर करत लोकांनी एकसंधपणे केलेली एकत्रित कृती होय. या कृतीमुळे सार्वजनिक संसाधनाची निर्मिती करत सार्वजनिक समस्या सुटण्यास मदत होते.

सामाजिक अभिसरण म्हणजे काय?

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमामध्ये सामाजिक अभिसरणाची सुंदर व्याख्या केलेली आहे. त्यानुसार सामाजिक अभिसरण म्हणजे संसाधन विकासाचा एक समान दृष्टिकोन आणि एक सारख्या साधनांचा वापर करत लोकांनी एकसंधपणे केलेली एकत्रित कृती होय. या कृतीमुळे सार्वजनिक संसाधनाची निर्मिती करत सार्वजनिक समस्या सुटण्यास मदत होते.

लोकशाहीच्या मूल्यांवर आधारित लोकांनी स्वयंसंघटीत अशा एकसंध गट तयार केला जातो. त्या ठरविलेल्या विशिष्ट ध्येयासाठी एकासारख्या साधनांच्या साह्याने स्वयंचलितपणे कार्यरत राहू शकतो. अशा गटांची निर्मिती करण्यासाठी लोकांमध्ये क्षमता विकसित करण्याची आवश्यकता असते.

त्यात नेमकी समस्या ओळखणे, त्या सोडविण्यासाठी एका विशिष्ट धोरण आणि नीती आखणे व त्यासाठी शास्त्रीय मार्गांचा अवलंब करणे, स्वयंप्रेरणेने सातत्याने कार्यरत राहणे इ. क्षमतांचा समावेश होतो.

अशी क्षमता असलेल्या गट संपूर्ण गावांचे प्रतिनिधित्व करत स्वयंविकासासोबतच समुदाय विकास घडविण्याचे काम करतात. सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेमध्ये अनेक व्यक्तींचा गट एकत्रितपणे कृती अथवा उपक्रम राबवून स्वयंप्रयत्नाने सामाजिक उद्दिष्ट साध्य करतात.

सामाजिक अभिसरणाचे महत्त्व

पाणलोट क्षेत्रामध्ये भौतिक स्वरूपातील आणि वेगवेगळ्या मालमत्तेची मालकी असणाऱ्या अनेक गोष्टींचा समावेश होतो. पाणलोटाची आपण मानवाने काहीही व्याख्या केलेली असो किंवा त्याचे क्षेत्र ठरवलेले असो मात्र नैसर्गिक सीमारेषा आणि जैव भौगोलिक संपत्ती यांची सांगड कधीच घालता येत नाही. म्हणूनच संपूर्ण पाणलोटात येणाऱ्या जमिनीवर काम करणे गरजेचे असते.

तिथे आवश्यक त्या संरचना उभारत उपाययोजना कराव्या लागतात. जमिनीतील पाण्याची उपलब्धता वाढविणे, जमिनीची धूप थांबविणे आणि जमिनीची पोत टिकविण्यासाठी कोणत्याही क्षेत्राच्या कृत्रिम सीमारेषांचा विचार न करता भौतिक आणि जैविक उपचार करावे लागतात. उदा. समतल चर खोदणे, छोटे बंधारे घालणे इ. पाणलोटाच्या वरील भागातून गाळ वाहणे कमी झाल्यानंतर आपोआपच खालील साठवण किंवा सिंचन तलावातील गाळाचे प्रमाण कमी होईल.

भूपृष्ठावरून वाहणारा अपधाव हा कमीत कमी राहील, हे प्रथम पाहिले जाते. अतिरिक्त वाहणाऱ्या अपधाव साठविण्यासाठी योग्य ठिकाणी सिंचन तलाव अथवा पाझर तलावांचा रचना केली जाते. पाणलोट संकल्पनेमध्ये नियोजकर्त्यांनी एकूण भौगोलिक रचना आणि स्थानिक कृषिनिगडित घटकांचा विचार करून त्या त्या क्षेत्र व हंगामानुसार उपक्रम हाती घेणे हितावह ठरते.

पाणलोटांमध्ये तांत्रिकदृष्ट्या केलेले योग्य बदल हे स्थानिक जनतेच्या सामाजिक - आर्थिक परिस्थितीवर परिणाम करतात. उदा. कुऱ्हाड बंदी, खुली चराई बंदी अथवा खाणकामावर बंदी इ. अशा तरतुदींचा फटका आजवर गाव परिसरात मिळणाऱ्या मोफत चाऱ्यांवर जनावरांचे पालन करणाऱ्या सर्वांनाच बसत असला तरी गरिबांना बसणारा फटका अधिक असू शकतो.

मात्र पाणलोटाच्या साठवण भागात प्रकल्पांमुळे अधिक फायदे मिळतात. ते नागरिक कुणाचाही विचार करता लुटत असतील, तर लोकांमध्ये रोष निर्माण होऊ शकतो. म्हणून पाणलोट प्रकल्प व्यवस्थापनांचे फायदे सर्वांपर्यंत पोचले पाहिजेत. सर्वांनी काम करणे आणि सर्वांना फायदे मिळणे या प्रक्रियेला सामाजिक अभिसरणामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.

समुदाय संघटन

सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेने सर्व ग्रामस्थ, लाभार्थींचे समुदाय संघटन होऊ शकते. त्यातील पहिली प्रक्रिया म्हणजे गटांची निर्मिती होय. पुढील संघटनांसाठी उत्पादन, उत्पन्न, रोजगार आणि प्रक्रिया उद्योग इ. बाबी महत्त्वाच्या ठरतात. त्यातून मिळणाऱ्या प्रत्यक्ष लाभाने लोकांचा विश्वास वाढतो. त्यासाठी प्रकल्प भेटी उपयोगी ठरतात.

केवळ भेटी देऊनच न थांबता वैयक्तिक आणि समुदायाची क्षमतावृद्धी व स्वयंक्षमता वाढीसाठी त्या त्या गावात घडलेल्या प्रक्रियांचा चिकित्सक अभ्यास व त्यावर आधारील लोकशिक्षण महत्त्वाचे ठरते. त्यासाठी स्वयंसेवी संस्था व बाह्य यंत्रणांशी जोडून घेतले पाहिजे. म्हणजे तांत्रिक बाबीतील अचूकता जपली जाऊन प्रकल्पांची अंमलबजावणी योग्यरीत्या होते.

Watershed Management
Watershed Management : पाणलोट क्षेत्रातील पाणी प्रवाहाचा निर्देशांक

पाणलोट प्रकल्पांच्या यशामध्ये समुदाय संघटना अभिसरण महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळेच लोकांचा प्रत्यक्ष सहभाग हा पाणलोट विकास आणि व्यवस्थापनामध्ये साध्य होतो. लोकांचे संघटन झाल्याने एकमेकांप्रति विश्वास आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढतो. अशा गट किंवा संघटनांना क्षमता वृद्धीसाठी मदत करत हळूहळू जबाबदारी स्वीकारण्यास प्रवृत्त करणे गरजेचे असते.

कोणत्याही पदापेक्षा जबाबदारी स्वीकारण्यातून नेतृत्व विकास होत असतो. त्यासाठी स्थानिकातील गुणांची ओळख पटवीत आवश्यक त्या क्षमता वाढविण्यास प्रोत्साहन द्यावे लागते. भौतिक आणि आर्थिक उपक्रमांसंदर्भात माहिती, अन्य गटांसोबतच समन्वय, निर्णयक्षमता या बाबी वैयक्तिक अथवा सामाजिक समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाचे ठरते.

समुदाय संघटनाची प्रक्रिया

  • एकाच ठिकाणी राहणाऱ्या लोकांना एकत्र आणत विशिष्ट कामासाठी गट निर्मितीस प्रोत्साहन देणे. या प्रक्रियेत एकजिनसी गट तयार करणे, स्वयंसेवी गट तयार करणे, उपभोक्ता गट तयार करता येतात.

  • त्यांना विशिष्ट समस्येवर मात करण्याच्या दृष्टीने विचार करायला लावणे.

  • त्यांच्या कल्पना किंवा सूचनांचा आदर करत त्यातील त्रुटी विशेषतः चांगल्या व वाईट निदर्शनास आणणे.

  • चांगल्या कल्पनांना शास्त्रीय बाबींची जोड अचूकता वाढवणे. त्यातून त्यांनीच सुचविलेल्या अथवा मांडलेल्या विचारासाठी आवश्यक कार्य करण्यास प्रेरित करणे.

  • प्रत्येकाला त्या कामातील योग्य त्या जबाबदारी स्वतःहून किंवा समन्वयातून घेण्यास भाग पाडणे.

  • प्रत्येकजण योग्य प्रकारे काम करतो आहे की नाही, यावर सर्वांचे लक्ष असल्याची भावना निर्माण करणे.

  • अशा काही टप्प्यांमध्ये समुदाय संघटनाची व त्यातील सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया पुढे नेली जाते. समुदाय संघटनांच्याच माध्यमातून उत्पादनवाढीशी निगडित उपक्रम आर्थिक चलनप्राप्ती, रोजगार निर्मिती, क्षमता बांधणी आणि सामाजिक नेतृत्व सक्षमतेसाठी प्रयत्न इ. उपक्रम जाणीवपूर्वक राबवत न्यावे लागतात.

उपक्रम निश्चिती

  • गट सातत्याने कार्यरत राहण्यासाठी निश्चित उद्दिष्ट्ये व त्यावर आधारीत उपक्रम सुरू ठेवावे लागतात. या उपक्रमांमध्ये पाणलोटाशी संबंधित उपक्रमाप्रमाणेच पुढील घटकांचा समावेश आवर्जून करावा.

  • सांस्कृतिक, सामाजिक नैतिकतेमध्ये बसणारे उपक्रम.

  • संपूर्ण समाजासाठी उपयुक्त बाबी. राबविण्यास सोप्या, फारशा खर्चाशिवाय त्वरित हाती घेण्यासारख्या कृती.

  • जात, पात, पंथ व धर्म इ. बाबींचा विचार न करता लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला भाग घेता येण्यासारख्या बाबी.

(समुदायाला सहज मान्य उपक्रम)

Watershed Management
Watershed Management : इंडो-जर्मन पाणलोट विकास ः स्थानिकाच्या क्षमतावृद्धीसाठी प्रयत्न

परस्परांवर विश्वास

कोणताही सामुदायिक उपक्रम किंवा कृती यशस्वी होण्यासाठी परस्परांवरील विश्वास अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या सार्वजनिक उपक्रम हे सर्वांगीण समाजाच्या हितासाठीच राबविले जात असल्याची खात्री पटते, त्यावेळी विश्वास निर्माण होतो. परस्परांवर विश्वास निर्माण होण्यासाठी पारदर्शकता, फायद्यांचे समन्यायी वाटप आणि स्वयंकेंद्री न राहता इतरांसाठी राबणारे नेतृत्व इ. बाबी महत्त्वपूर्ण ठरतात. याशिवाय परस्परांना समजावून घेणे आणि विचारांचे आदान प्रदान यातून परस्परांवरील विश्वास वाढत जातो. पारदर्शक कार्यपद्धतीमुळे गैरसमज टळतात.

स्वयंसेवी संस्थांची भूमिका

पाणलोट प्रकल्पांच्या नियोजन आणि अंमलबजावणीदरम्यान लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्यासाठी बिगर शासकीय संस्थांचा सहभाग पाणलोट प्रकल्पांच्या अंमलबजावणी दरम्यान महत्त्वाचा ठरतो. समुदाय संघटनांमध्ये शासनाने बिगरशासकीय संस्थांची भूमिका खालीलप्रमाणे स्पष्ट केली आहे.

ग्रामसभा आणि ग्रामपंचायतींना सहभाग आणि दान देण्यास प्रोत्साहित करणे.

विश्वास निर्माण होण्याइतकी जवळीकता निर्माण करणे आणि प्रवेश प्रेरक उपक्रमांची अंमलबजावणी करणे.

विकास आराखडा तयार करण्यासाठी ग्रामीण सहभागी मुल्यावलोकनाचा उपक्रम राबविणे.

बचत गट उपभोक्ता गट, पाणलोट समिती इ. निर्मिती करून समुदाय संघटन करणे.

पाणलोट समितीच्या नोंदणीसाठी साहाय्य करणे.

बचत गट, उपभोक्ता गट, पाणलोट समिती, समितीचे सचिव आणि स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन.

तांत्रिक उपचारांवर भर देताना कमी खर्चाच्या आणि स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करणे.

पाणलोट प्रकल्पांतील स्वयंसेवी गट, उपभोक्ता गट आणि पाणलोट समितीच्या प्रतिनिधींना प्रकल्पाच्या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी सोयीसुविधा पुरविणे अथवा मार्गदर्शन करणे.

तांत्रिक मार्गदर्शन, निरीक्षण आणि प्रकल्प अंमलबजावणीचा आढावा घेणे.

ठरविलेले मापदंड (अथवा परिपत्रकाप्रमाणे) पाणलोट प्रकल्पाच्या उपक्रमांतील उपचारपद्धतीची नोंद घेणे.

प्रकल्पांच्या खात्याची उपचारनिहाय चाचपणी करणे.

प्रकल्पांच्या प्रकल्पोत्तर नियोजन, देखभाल दुरुस्ती आणि विकासासाठी संख्यात्मक रचना निर्माण करणे.

समुदाय संघटनेस मारक बाबी

एखाद्या सामाजिक उपक्रमांपुरते प्रेरित झालेले समुदाय संघटन हे विस्कळीत व त्या उपक्रमापुरते मर्यादित राहण्याचा धोका असतो. तो टाळण्यासाठी एका उपक्रमातून दुसरा चांगला व फायदेशीर उपक्रम अशा पद्धतीने समुदायापुढील लक्ष्य सतत वाढवत न्यावे लागते. खालील काही बाबी समुदाय संघटनास मारक ठरतात.

गटाला नियमित प्रेरणा व प्रोत्साहन द्यावे लागते. त्यात कमतरता झाल्यास संघटन मागे पडते.

सदस्यांच्या क्षमता समजून न घेता कामे ठरवणे, प्रत्यक्ष दिसणाऱ्या फायद्यांची त्वरित अपेक्षा करणे.

गटा तटांमधील स्पर्धा / समुदायातील वादविवाद, स्वार्थामुळे चांगल्या उपक्रमांना विरोध होणे.

लोकांत मिसळून काम करण्याच्या कौशल्याचा अभाव, वेळ आणि आर्थिक नियोजनातील त्रुटी व गडबडी इ.

सांस्कृतिक आणि पारंपरिक अडथळे.

- डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (संचालक, शिवश्री पर्यावरण संस्था, पुणे.)

- डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com