Hivrebajar  Agrowon
ॲग्रो विशेष

Hivrebajar : हिवरे बाजार शिवारात यंदा पाण्याची टंचाई जाणवणार

Team Agrowon

Ahemadnagar News : उपलब्ध पाण्याचा कसा वापर करायचा याबाबत आदर्श गाव हिवरे बाजारने यंदाही उपलब्ध पाण्याचा ताळेबंद सादर केला आहे. त्यानुसार गतवर्षापेक्षा यंदा हिवरे बाजार शिवारात सुमारे ७५ कोटी लिटर पाणी कमी उपलब्ध झाले आहे.

यंदाच्या पावसाळ्यात हिवरे बाजार शिवारात केवळ २२ दिवस पाऊस पडला आहे. यावर्षी डिसेंबरनंतर पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे दिसतेय, त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करत चारा उत्पादनाला प्राधान्य देऊन मुरघास करण्यावर भर असणार आहे.

आदर्शगाव हिवरे बाजार येथे हा दुष्काळी भाग आहे. येथे कमी पाऊस पडतो. मात्र केवळ जलसंधारणाच्या कामामुळे शिवारात पाणी उपलब्ध होत असते. इतर ठिकाणाच्या तुलनेत येथे पाणी कमी उपलब्ध होत असले तरी उपलब्ध पाण्याचा गरजेनुसार विनियोग व्हावा यासाठी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १९ वर्षापासून नवरात्रातील सातव्या माळेला दरवर्षी ग्रामसभेत उपलब्ध पाण्याचा ताळेबंद मांडून उपलब्ध पाण्याचे पुढील वर्षासाठी नियोजन केले जाते.

यंदाचा ताळेबंद पोपटराव पवार यांनी मांडला. दादाभाऊ गुंजाळ, सरपंच विमलताई ठाणगे, सोसायटीचे अध्यक्ष छबुराव ठाणगे, यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

२००४ पासून पाणलोटात पर्जन्यमापक बसविल्यामुळे अचूक पाण्याचा ताळेबंद येतो. यावर्षी २२ दिवसांत ५३८ मिलिमीटर पाऊस पडून ५२५.१५ कोटी लिटर पाणी उपलब्ध झाले. त्यातील ३५०.११ कोटी लिटर पाणी गावाच्या वापरासाठी उपलब्ध झाले. गावाची वार्षिक गरज ३३३.३२ कोटी लिटर आहे. त्यामळे सोळा कोटी लिटर पाणी राखीव ठेवता येणार आहे.

गेल्यावर्षी हिवरे बाजार शिवारात ६७८ मिलिमीटर पाऊस पडून ४२८.९ कोटी लिटर पाणी उपलब्ध झाले. लोकसंख्या व जनावरे यांना पिण्यासाठी आवश्यक ७.७१ कोटी लिटर, शेतीसाठी ३१८.६१ कोटी लिटर व इतर वापरासाठी ७ कोटी लिटर अशी गरज असून उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई येणार नाही यासाठी उन्हाळी सिंचन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. उन्हाळ्यात फक्त जनावरांचा चारा व फळबाग जगविणे एवढेच उद्दिष्ट ठेवून भविष्यासाठी १६.८० कोटी लिटर पाणी राखीव ठेवण्याचा हिवरे बाजार करांनी निर्णय घेतला आहे.

‘‘गतवर्षीपेक्षा यंदा पाऊस कमी असला तरी गतवर्षी सिंचनाच्या कामामुळे पाणी मुरल्याने यंदा त्याचा फायदा होत आहे. डिसेंबरनंतर पाणी टंचाई जाणवू शकते. परिसरात दूध व्यवसाय, फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे जनावरे, फळबागा जगली पाहिजेत म्हणून चारा, मुरघास आणि कमी पाण्यावर फळबागा जगवण्यावर भर देण्याचे ठरले आहे.’’
- पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्श गाव योजना, प्रकल्प व संकल्प समिती,

हिवरे बाजारचा पाणी ताळेबंद (२०२३-२४)

- एकूण पाऊस ः ५३८ मिलिमीटर

- पावसाचे दिवस ः २२

- उपलब्ध झालेले एकूण पाणी ः ५२५.१५ कोटी लिटर

- बाष्प होणारे पाणी ः १८३.८० कोटी लिटर

- वाहून जाणारे पाणी ः ४०.०१ कोटी लिटर

- जमिनीत मुरणारे पाणी ः ८९.२८ कोटी लिटर

- मातीत मुरणारे पाणी ः १५७.५४ कोटी लिटर

- जमिनीवर साठणारे पाणी ः ५२.५१ कोटी लिटर

- जलसंधारण कामामुळे मुरणारे अधिकचे पाणी ः ५०.७८ कोटी लिटर

- उपलब्ध पाणी (जमा) ः ३५०.११ कोटी लिटर

- गावाची वार्षिक गरज(खर्च) ः ३३३.३२ कोटी लिटर

- भविष्यासाठी राखीव ठेवावयाचे पाणी ः १६.८० कोटी लिटर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT