Solapur News : भारतीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे. विशेषतः नव मतदारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी येथे केले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवणे आणि नव मतदारांना मतदान करण्याकरिता प्रेरित करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित स्वीप मल्टिमीडिया व्हॅनच्या शुभारंभ प्रसंगी श्रीमती ठाकूर बोलत होत्या.
या वेळी केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, स्वीपचे नोडल अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, शिक्षणाधिकारी कादर शेख, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ राजेंद्र वडजे, सरकारी कामगार अधिकारी विलास गायकवाड, समाज कल्याण अधिकारी सचिन कवले, अंबादास यादव उपस्थित होते.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या, की मागील विधानसभा निवडणूक व लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये जिल्ह्यातील मतदानाचे प्रमाण अल्प असलेल्या भागांमध्ये मल्टिमीडिया व्हॅनच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. मतदारांचा सहभाग वाढविणे आणि नागरिकांना निवडणूक प्रक्रियेबद्दल साक्षर करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असे त्या म्हणाल्या.
या वेळी स्वीपचे सहायक नोडल अधिकारी रूपाली भावसार, गोदावरी राठोड, स्वाती स्वामी, अमोल भोसले, शाहबाज काझी, अनिल थोरबोले, साईराज राउळ, योगिराज कोंडाबत्तीन आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे संगमेश्वर कॉलेज आणि वालचंद महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कमी मतदान असणाऱ्या भागात जागृती
जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघांतील १०० हून अधिक ठिकाणी ही व्हॅन प्रवास करेल, ज्यात मतदानाचे प्रमाण अल्प असलेल्या भागांचा समावेश आहे, ही व्हॅन प्रामुख्याने मतदान प्रक्रिया, मतदान केंद्राची ठिकाणे, आदर्श आचारसंहिता आणि कोणत्याही प्रकारच्या उल्लंघनाबाबत तक्रारी दाखल करण्यासंबंधाची माहिती आणि ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्यक्तींनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केल्याचे व्हिडिओ संदेश एलईडी स्क्रीनवर पाहता येणार आहेत, असे सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.