Akola News : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रंगतदार लढती होत असून या भागात अकोला जिल्ह्यातील अकोट मतदार संघात दोन आणि बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदार संघात एका शेतकरी नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अकोटमध्ये शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे तर जळगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत डिक्कर रिंगणात आहेत. हे दोघेही परिवर्तन महाशक्ती आघाडीकडून लढत आहेत.
या भागातील सर्वच मतदार संघात कुठे थेट तर बहुतांश ठिकाणी तिरंगी-चौरंगी लढती होऊ घातल्या आहेत. अकोट मतदार संघात महायुती-महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी या तीन आघाड्यांच्या उमेदवारांसमोर परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार म्हणून श्री. बहाळे उभे आहेत.
याशिवाय शेतकरी संघटनेचे (रघुनाथदादा पाटील) विदर्भस्तरीय पदाधिकारी लक्ष्मीकांत कौठकरही याच मतदार संघात उभे आहेत. यापूर्वी बहाळे व कौठकर हे एकत्रच शेतकरी संघटनेचे काम करीत होते. मात्र, मध्यंतरी कौठकर यांनी रघुनाथदादांच्या संघटनेचा हात धरला.
आता दोघेही अकोटमध्ये भाग्य अजमावत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने हे नेते आवाज उठवत राहतात. प्रामुख्याने ललीत बहाळे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यांना सहकार क्षेत्राची साथ मिळण्याची चिन्हे आहेत.
त्यांनी या मतदार संघातील प्रत्येक गावखेड्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांना बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ची या मतदार संघात पकड असल्याने याचा फायदा मिळू शकतो. श्री. बहाळे हे प्रत्येक सभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहेत. त्यांच्या सभांना होत असलेली गर्दी उत्साहवर्धक आहे. ही गर्दी मतात किती परावर्तीत झाली यासाठी निकालाची प्रतीक्षा करावी लागेल.
डिक्करही लढतीत
जळगाव जामोद मतदार संघात प्रस्थापित आमदार डॉ. संजय कुटे हे महायुतीचे तर माजी आमदार कृष्णराव इंगळे यांची मुलगी डॉ. स्वाती वाकेकर या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. वंचित बहुजन आघाडीने येथे मराठा कार्ड वापरत डॉ. प्रवीण पाटील यांना रिंगणात उतरवले. या तिरंगी लढतीत परीवर्तन महाशक्तीचे उमेदवार म्हणून प्रशांत डिक्कर आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे व राजू शेट्टी यांचे समर्थक म्हणून ते ओळखले जातात. दोन दिवसांपूर्वी युवराज छत्रपती संभाजी यांनी जळगाव जामोदमध्ये सभा घेतली. त्यांनी पाठीशी संपूर्ण पाठबळ उभे करण्याचे या वेळी जाहीर केल्याने डिक्कर यांना बराच दिलासा मिळाला. अकोट व जळगाव जामोद या दोनही मतदार संघात शेतकरी नेत्यांनी किती प्रभाव पाडला, कोणी विजय मिळवला हे शनिवारी (ता. २३) येणाऱ्या निकालातूनच स्पष्ट होईल.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.