Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Connection With Soil : आनंदाच्या उगवणीसाठी मातीशी होऊया एकरूप

Bonding with Nature : उन्हात तापलेल्या मातीवर पावसाचे थेंब पडले की माणूसच काय, बैल देखील आनंदाने उधळायला लागतात, डिरकायला लागतात, शिंगाने माती उकरायला लागतात. तो आनंद माणूसही श्‍वासात भरून घेतो आणि आनंदाने मोहरून उठतो.

Team Agrowon

इंद्रजित भालेराव

Farmers' connection with Nature : सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या नाण्याची कोणती बाजू चलनात आणायची आणि कोणती बाजू बाद करायची हे आपल्या हिकमतीवर अवलंबून असतं. आनंदाची बाजू चलती ठेवण्याची हिकमत आपण शिकायला हवी. ही हिकमत शिकलो की बहिणाबाईच्या शब्दांत सांगायचं झालं तर आपली अवस्था अशी होते,

माझं दुःख माझं दुःख तळघरात कोंडलं

माझं सुख माझं सुख हंड्या झुंबर टांगलं

दुःख तळघरात कोंडून सुखाच्या हंड्या, झुंबरं बैठकीत टांगावी लागतात. सतत दुःखाचं प्रदर्शन करायची सवय लागली की सुखाचा आनंद माणसाला पारखा होतो. पण हे दुःख बाजूला सारून सुखाला सामोरं जाण्यासाठी मन निर्मळ करणं ज्याला जमतं तो नेहमीच सुखाला प्राप्त करून घेत असतो. माझ्याच एका कवितेत मी लिहिलं होतं,

दुःख असो जीवघेणे जगत राहूया

काळ किती क्रूर कसा तेच पाहूया

असे किती काळ आपण पाहिलेत रे

असे किती महाकाळ साहिलेत रे

हाही काळ पालटून पुढे जाऊया

दुःख असो जीवघेणे जगत राहू या ...

सुख ही हलती सावली आहे. ती येते आणि जाते. पण आपणाला शेवटपर्यंत सोबत करतं ते दुःखच. त्यामुळे जे सतत आपल्या सोबत राहणार आहे त्याच्याशी दोस्ती केली म्हणजे आपणाला ते सहज सहन होतं. आणि त्याच्याशी दोस्ती करता नाही आली की ते असह्य होतं. मग त्याला असह्य करून स्वतःला दुःखाच्या खाईत लोटायचं की त्याला सहन करत सुखाचे पर्वत चढायचे, हे आपल्या हातात असतं. बहिणाबाई एका कवितेत म्हणतात,

माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत

पावसात सामावतं मातीमध्ये उगवतं

तुझ्या येण्याची चाहूल लागे पानापानामधी

देवा तुझं येणं जाणं वारा सांगे कानामधी

ज्याला आपल्या भोवतीच्या सृष्टीत असा देव शोधता येतो, त्याला इतरत्र आनंद शोधण्याची गरजच पडत नाही. त्याच्या हृदयात आपोआपच सुखाचा सूर्य उगवत असतो. त्याला जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी केवळ सुख आणि सुखच दिसत असतं. कारण तो स्वतःच अखंड सुख होऊन राहिलेला असतो.

ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही सृष्टीच्या नियंत्याची तीन रूपं आपण समजत असतो. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय अशी कामं आपण या तीन रूपांना विभागून दिलेली आहेत. पण शेवटी तो एकच असतो, हे पटवून देण्यासाठी एकनाथ महाराजांनी आपल्या भागवतात उदाहरण दिलं आहे ते शेतकऱ्याचं. एकनाथ महाराज म्हणतात,

जो शेताची पेरणी करी। तोची राखे, देखे, सोकरी।

तोची वाळलियावरी। सवंगणी करी सर्वाची॥

तेवी उत्पत्ती काळी तोची ब्रह्मा।

स्थिती काळी तोची विष्णू नामा।

प्रलय काळीही रुद्रप्रेमा। ये पुरुषोत्तमा तेची नामे॥

(भा. अ. ०४ ओ. ६१-६२)

म्हणजे पेरणीही शेतकरीच करत असतो, पिकाचं संगोपनही शेतकरीच करत असतो आणि शेवटी त्याची कापणीही तोच करत असतो. ही जशी एका शेतकऱ्याचीच विविध रूपं आहेत, तशीच ब्रह्मा, विष्णू, महेश ही एकाच नियंत्याची रूपं आहेत. इथं शेतकऱ्याचं रूपक एकनाथ महाराजांना आठवतं आणि नकळतपणे एकनाथ महाराज शेतकऱ्याला ब्रह्मा, विष्णू आणि महेश या नियंत्याच्या तीनही रूपांच्या ठिकाणी शेतकरी दिसतो. तसंच काहीसं तुकारामांचंही झालेलं आहे. इतक्या संकटांना आणि दुःखांना सामोरं जाऊनही तुकाराम महाराज म्हणतात,

आनंदाचे डोही। आनंद तरंग।

आनंदची अंग। आनंदाचे॥

काय सांगो जाले। काहीचिया बाही।

पुढे चाली नाही। आवडीने॥

गर्भाचे आवडी। मातेचा डोहाळा।

तेथीचा जिव्हाळा। तेथ बिंबे॥

तुका म्हणे तसा। ओतलासे ठसा।

अनुभव सरीसा। मुखा आला॥

खिन्नतेचे कवी म्हणून ओळखले जाणारे बालकवीही एका क्षणी आनंदाने उजळून निघतात आणि म्हणतात,

आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे

वरती खाली मोद भरे वायु संगे मोद फिरे

नभात भरला, दिशात फिरला,

जगात उरला मोद विहरतो चोहीकडे

आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे

उन्हात तापलेल्या मातीवर पावसाचे थेंब पडले की माणूसच काय, बैल देखील आनंदाने उधळायला लागतात, डिरकायला लागतात, शिंगाने माती उकरायला लागतात. तो आनंद माणूसही श्‍वासात भरून घेतो आणि आनंदाने मोहरून उठतो. ना. धों. महानोर आपल्या एका कवितेत म्हणतात,

रूजे दाणा दाणा ज्येष्ठाचा महिना

मातीतला गंध ओला चौखूर दिशांना

पाखरांचे पंख आम्हा आभाळ पुरेना

मातीशी एकरूप झालेल्या शेतकऱ्याची विभोर आनंदावस्था महानोर या कवितेत व्यक्त करतात. माणूस निसर्गाशी एकरूप होता आणि निसर्ग माणसाशी एकरूप होता, तोपर्यंत मातीतून केवळ आणि केवळ आनंदाचीच उगवण होत होती. पण आपण हे अंतर वाढवत नेलं आणि त्यातच बट्टा निर्माण झाला. आपणाला मातीतून आनंदाचीच उगवण हवी असेल तर मातीशी एकरूप झाल्याशिवाय पर्याय नाही.

तुम्ही मातीशी एकरूप झालात, मातीचं मन समजून घेतलं, तर माती तुम्हाला कधीच अंतर देत नाही. त्यासाठी माती सोबत माती होऊन मातीत राबावं लागतं. गोपाल नीलकंठ दांडेकर यांच्या कादंबऱ्यांतील पवनाकाठचा धोंडी आणि माचीवरला बुधा ही अशी मातीशी एकरूप झालेल्यांची काही उदाहरणे. आजही अशी मातीशी एकरूप होऊन राहणारी आणि मातीतला आनंद भोगणारी माणसं आपल्या भोवती आहेत. मग त्यांची नावं आणि रूपं वेगवेगळी असतील.

एकेकाळी स्वतः महानोर असेच मातीशी एकरूप होऊन राहिलेले होते. आज आपणाला महारुद्र मंगनाळे यांच्यासारखा एक माणूस मातीशी एकरूप झालेला दिसतो. आज त्यांचा परिवार वाढतो आहे. दरवर्षी अशा मातीशी एकरूप होऊ इच्छिणाऱ्यांचा मेळावा त्यांच्या रानात भरत असतो. नुकताच १ डिसेंबर रोजी असा मेळावा त्यांच्या रानात झाला आणि मातीशी एकरूप होऊ इच्छिणाऱ्यांनी तो आनंद सोहळा साजरा केला. मातीशी एकरूप होताना येणारी सगळी आव्हानं पेलून मातीतल्या निखळ आनंदाशी एकरूप होण्याचा प्रयत्न मंगनाळे करतात. तसा निखळ आनंद ज्याला घेता येईल त्याच्यासाठी माती ही आनंददायक गोष्ट आहे.

( ८४३२२२५५८५ लेखक कवी, साहित्यिक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Election : ‘झेडपी’, पंचायत समित्यांचा बिगुल

Fertilizer Shortage : युरिया, डीएपीचा तुटवडा, लिंकिंगने शेतकरी त्रस्त

Ginger Research Center: आले संशोधन केंद्राचा पेच; कृषिमंत्र्यांच विधानपरिषदेत बैठकीचं आश्वासन 

Silk Market : बीड रेशीम कोष बाजारात शेतकऱ्यांचे शोषण

Turmeric Market : नांदेडला हळदीचे चुकारे थकल्याने लिलाव पाडले बंद

SCROLL FOR NEXT