Vegetable Farming
Vegetable Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Vegetable Farming : कमी कालावधीचा काशीभोपळा देतोय अधिकचा मोबदला !

Sudarshan Sutaar

सुदर्शन सुतार

Red Pumpkin Crop : शेळगाव (आर) (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील तुकाराम रेळेकर यांनी आठ वर्षांपासून काशीभोपळ्याच्या उत्पादनात सातत्य ठेवत त्यात हातखंडा तयार केला आहे.

विविध हंगामात किंवा विविध टप्प्यात लागवडीचे उत्कृष्ट नियोजन व मुंबईला विक्री व्यवस्था निर्माण करून नगदी किंवा व्यावसायिक पिकाप्रमाणे त्यातून उत्पन्नस्त्रोत निर्माण केला आहे. सध्या सुरू असलेल्या नवरात्री सणात विशेष महत्त्व व मागणी असलेले असे हे भोपळ्याचे पीक असते.

सोलापूर-बार्शी महामार्गावर शेळगाव (आर) (ता. बार्शी) हे साडेपाच हजार लोकसंख्येचे गाव आहे. भौगोलिक क्षेत्र सुमारे पाच हजार एकर असून चार हजार एकरांवर शेती होते. कांदा आणि विविध प्रकारच्या भाजीपाला उत्पादनामध्ये इथल्या शेतकऱ्यांचा हातखंडा राहिला आहे. वर्षातील बाराही महिने प्रतिदिन किमान १० ते १५ टन भाजीपाला एकट्या शेळगावमधून विविध बाजारपेठांत जातो.

कांदा, भेंडीचा सर्वाधिक समावेश असतो. या पिकांतील अभ्यासू, अनुभवी शेतकरी गावात पाहायला मिळतात. गावातील एकेक शेतकऱ्याने एकेक पिकात खासियत तयार केली आहे. तुकाराम रेळेकर हे त्यापैकीच एक असून त्यांनी काशीभोपळा ( डांगर) शेतीत हातखंडा तयार केला आहे.

काशीभोपळ्याती शेती

गावाच्या दक्षिणेला महामार्गालगतच तुकाराम यांची सुमारे नऊ एकर शेती आहे. कांदा व काशीभोपळा ही त्यांची मुख्य पिके आहेत. सन १९९५ च्या सुमारास दहावीच्या शिक्षणानंतर ते शेतीत उतरले. शेती करीतच ते तरकारी (भाजीपाला) वाहून नेणारे वाहन चालवायला शिकले. त्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांचा भाजीपाला ते पुणे, मुंबईच्या बाजारात नेऊ लागले. त्यातून बाजारपेठेत कोणकोणत्या हंगामात कोणकोणत्या भाजीपाल्याला कशी मागणी असते.

दर काय असतात याची जाणीव झाली. त्यातून कमी कालावधीत येणारे, त्याद्वारे ताजे उत्पन्न देणारे व वाहतुकीला सुलभ अशा कारणांमधून काशीभोपळा पीक अत्यंत आश्‍वासक असल्याचे त्यांना वाटले. सन २०१५ पासून या पिकाची लागवड त्यांनी सुरू केली. सुमारे आठ वर्षांपासून आजगायत त्यात सातत्य ठेवले आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशी होते भोपळ्याची शेती

तुकाराम सांगतात की जानेवारी, मे व जून-जुलै अशा हंगांमात काशीभोपळ्याची लागवड करता येते. मी दरवर्षी चार चे साडेचार एकरांत त्याचे पीक घेतो. मे व जून-जुलै अशा विविध टप्प्यांत किमान एक प्लॉटमध्ये त्याची लागवड करतो.

खरिपात २ ते ३ चांगले पाऊस झाल्यास उत्पादन अधिक चांगले मिळते. ठरावीक अंतराने टप्प्याटप्प्याने लागवड केल्याने एखाद्या कालावधीत दराने दगा दिला तर पुढील कालावधीत हमखास चांगला दर मिळतो. लागवडीसाठी मध्यम-भारी जमीन निवडली जाते. नांगरण, कुळवण करून चांगली मशागत करून घेतली जाते.

दर दोन वर्षांनी दोन ट्रॅक्टर ट्रॉली शेणखताचा वापर फायदेशीर ठरतो. मोकळ्या रानात किंवा गादीवाफ्यावरही लागवड करता येते. पाच फूट बाय पावणेचार फूट लागवडीचे अंतर ठेवले जाते. ठिबक सिंचनाचा वापर असतोच. एकरी सुमारे २०० ग्रॅम बियाणे लागते. लागवडीपासून सुमारे ६५ दिवसात भोपळा (साधारण कच्च्या स्वरूपात) काढणीस येतो. लाल रंगाच्या भोपळ्याची काढणी करायची तर ९० दिवसांचा कालावधी लागतो. मात्र साधारण कच्च्या भोपळायाला तुलनेने मागणी अधिक असते.

मागणी, उत्पादन, दर

श्रावणात विविध सणांमध्ये भोपळ्याला मोठी मागणी असते. शिवाय पाने, नवीन शेंडा, फुले, फळे व बी अशा सर्व घटकांचा आहारात वेगवेगळ्या प्रकारे समावेश होतो. दक्षिण भारतात सांबरामध्ये भोपळ्याचा प्राधान्याने वापर केला जातो. नवरात्रोत्सवात देवीच्या पूजेमध्ये या भोपळ्याला मानाचे स्थान असते. ही भाजी उपवासाला देखील चालते. त्यामुळे या कालावधीत मागणी अधिक असते. जून ते ऑक्टोबर हा सर्वाधिक मागणीचा काळ असतो.

तुकाराम सांगतात की सोलापूर किंवा पुणे मार्केटपेक्षाही वाशी- मुंबईत या भोपळ्याला सर्वाधिक व वर्षभर मागणी असते. वर्षभराचा विचार केल्यास प्रति किलो सरासरी १२ रुपये दर मला मिळतो. कमाल तो २० रुपयांवरही जातो. तर पाच रुपयांपर्यंत खाली देखील येतो. एकरी सुमारे १२ ते १४ टन उत्पादन मिळते.

हवामान व पाऊस अनुकूल व समाधानकारक मिळाल्याने तीन वर्षे एकरी २० टनांपुढेही उत्पादन घेतल्याचे तुकाराम सांगतात. फळाचे साधारण ५ ते ८ किलोपर्यंत तर कमाल १० ते १५ किलोपर्यंतही वजन मिळते. एकरी सुमारे ३२ हजार रुपये खर्च येतो. खर्च वजा जाता सुमारे ७० दिवसांच्या काळात ५० हजार रुपयांचा नफा हे पीक देऊन जाते.

शेतकरी व खरेदीदार- दुहेरी ओळख

तुकाराम पूर्वीपासूनच भाजीपाल्याची वाहतूक करायची. आजही हा व्यवसाय त्यांनी सुरू ठेवला आहे. परिसरातील शेतकऱ्यांकडील भोपळ्याची वाहतूकही ते आपल्या मालासोबत करतात.
त्यातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत त्यांना उपलब्ध होतो.

पूर्वी छोटे वाहन होते. आता या उत्पन्नातून १२ टन क्षमतेचा ट्रक घेणे त्यांना शक्य झाले आहे. भोपळ्याचे उत्तम उत्पादक आणि खरेदीदार अशी दुहेरी ओळख त्यांनी तयार केली आहे.

मुलांना केले उच्चशिक्षित

तुकाराम यांना शेतीत पत्नी वैशाली यांची मोलाची साथ मिळाली आहे. शेतीचे बहुतांश व्यवस्थापन वैशाली करतात. शेती व वाहतूक व्यवसाय या बळावरच मुलांना उत्तम शिक्षण देणे दांपत्याला शक्य झाले आहे.

मोठी मुलगी वृषाली पुण्यात ‘आयटी इंजिनिअर म्हणून नोकरीत आहे. धाकटी मुलगी वैष्णवी ‘सॅाफ्टवेअर इंजिनिअरिंगचे तर मुलगा विवेक ‘बीएएमएस’ ते शिक्षण घेतो आहे.

संपर्क- तुकाराम रेळेकर- ९६२३२३२८४४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update : आनंदाची बातमी! दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सूनच्या सरी बरसल्या

Mango Festival : बुलडाण्यातील आंबा महोत्सवात ४० प्रजाती; विक्रीही सुरू

Afghanistan Floods : अफगाणिस्तानात पुरामुळे विध्वंस, ६८ जणांचा मृत्यू; ३०० हून अधिक जनावरेही दगावली

Leopard Terror : चाकूर तालुक्यात पुन्हा बिबट्याची दहशत

Pune Municipality : पुणे महापालिकेचा एसटी महामंडळाला अनधिकृत होर्डिंगप्रकरणी दंड

SCROLL FOR NEXT