कृष्णा जोमेगावकर
Goat Management : कलंबर खुर्द (जि. नांदेड) येथील रामकिशन घोरबांड आणि गोविंद घोरबांड या काका पुतण्याने शाळेतील नोकरी करत शेळीपालनाची आवड जपली आहे. सेवानिवृत्तीनंतर काय करायचे या प्रश्नावर मात करण्यासाठी ‘राधाई गोटफार्म’ नावाने शेळीपालन सुरू केले आहे.
नांदेडपासून चाळीस किलोमीटर अंतरावरील कलंबर खुर्द येथील रामकिशन नामदेव घोरबांड हे बारुळ (कंधार) येथील श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. त्यांचे पुतणे गोविंद गंगाधर घोरबांड हे धनेगाव (ता.नांदेड) येथील एका खासगी शाळेवर लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची कलंबर खुर्द शिवारात पाच एकर शेती आहे. शाळेवर नोकरी करत शेतीकडे लक्ष देताना त्यांनी सेवानिवृत्तीनंतर काय करायचे असा विचार केला. त्यासाठी त्यांनी शेतीपूरक व्यवसाय करण्याचा निश्चय केला.
मे २०१९ मध्ये १५ शेळ्या व एक बोकड खरेदी करून बंदिस्त शेळीपालन व्यवसायास सुरुवात केली. त्यास ‘राधाई गोट फार्म’ असे नाव दिला. आज त्यांच्याकडे लहान-मोठ्या मिळून ६० शेळ्या आहेत. शेळीपालन व्यवसायामध्ये बोकड विक्री आणि लेंडीखत विक्रीतून चांगला जम बसविला.
आफ्रिकन बोअर जातीची निवड ः
वजनात चांगली भरणारी तसेच मटणासाठी चविष्ट असलेल्या आफ्रिकन बोअर या जातीच्या शेळ्या शेळीपालनासाठी निवडण्यात आल्या. रिसनगाव (ता. लोहा) येथील एका शिक्षकाकडून १५ शेळ्या एका बोकडाची तीन लाख साठ हजार रुपयांना खरेदी केली.
बंदिस्त पद्धतीने शेळीपालन ः
बंदिस्त शेळीपालन करण्याचे निश्चित केल्यानंतर उस्माननगर येथील शेतात शेडची उभारणी केली. साधारण २२ फूट बाय ५० फूट आकाराच्या पत्र्याचे शेड उभारले. त्यात शेळ्या, लहान करडे आणि बोकडांसाठी विविध कप्पे तयार केले. प्रत्येक कप्प्यात पिण्याचे पाणी आणि खाद्याची सोय आहे. यासह चाऱ्याची कुट्टी करण्यासाठी १० बाय १० फुटांचे पत्र्याचे शेड तसेच चारा व खाद्य ठेवण्यासाठी स्टोअर रूप आणि गोडावून बांधले आहे.
असे आहेत कप्पे ः
- गाभण शेळ्या ः१५ बाय ९ फूट.
- भाकड शेळ्या ः १५ फूट बाय ९ फूट.
- ब्रीड बोकड ः ९ बाय ६ फूट.
- लहान पिल्ले ः ९ फूट बाय सहा फूट
- मोठी पिल्ले ः ९ फूट बाय ११ फूट
- विक्रीयोग्य बोकड ः ९ फूट बाय १५ फूट
असे कप्पे तयार करून सुसंगत शेडची रचना केली आहे.
मुक्त संचारासाठी सोडली जागा ः
दिवसभर शेळ्यांना मुक्त संचारासाठी शेडसमोरील मोकळ्या जागेत सोडले जाते. त्यासाठी बंदिस्त शेडसमोर ५० बाय ५० फुटांची मोकळी जागा ठेवली आहे. तेथे चाऱ्यासाठी लाकडी गव्हाणी उभारल्या आहेत. दिवसभर शेळ्यांचा या जागेत मुक्त संचार असल्याने बऱ्यापैकी लेंडीखत जमा होते. हे लेंडीखत दररोज गोळा करून एकत्रित करून साठविले जाते.
चारा पिकांची लागवड ः
शेळ्यांना दररोज ओला आणि सुका चारा दिला जातो. ओल्या चाऱ्यासाठी एक एकरांत विविध चारा पिकांची लागवड केली आहे. प्रत्येकी १० गुंठे क्षेत्रावर दशरथ गवत, मका तसेच विविध प्रकारचे हिरवे आणि लाल रंगाचे गवत लागवड केली आहे. हिरव्या व लाल
गवतामधून शेळ्यांना वाढीसाठी विविध पोषक घटक मिळतात. त्यामुळे त्यांच्या वजनात झपाट्याने वाढ होते, असे रामकिशन घोरबांड सांगतात.
बांधावर विविध वृक्षांची लागवड ः
शेळ्यांमध्ये दुधाचे प्रमाण वाढून त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी शेताच्या बांधावर विविध वृक्षांची लागवड केली आहे. त्यात शेवरी, हादगा, तुती, शेवगा इत्यादी झाडांचा समावेश आहे. या झाडांची पाने तोडून शेळ्यांना विशेषत: लहान करडांना दिले जातात. त्यामुळे पिल्लांची वाढ जोमदार होऊन त्यांचे आरोग्यही चांगले राहते.
दैनंदिन खाद्य व्यवस्थापन ः
दररोज सर्व शेळ्यांना सकाळी सात वाजता सोयाबीन ८० किलो, तूर व हरभरा गुळी दिली जाते. त्यानंतर सकाळी अकरा वाजता हिरवे व लाल गवताची कुट्टी करून ६५ किलो प्रमाणे दिले जाते. पुन्हा दुपारी दोन वाजता ६५ किलो हिरवा चारा दिला जातो. सायंकाळी सात वाजता ६५ किलो हिरवा चारा दिला जातो. दिवसभरात उपलब्धतेनुसार तुती, शेवरा, शेवगा, हादग्याची पाने दिली जातात. शेळ्यांना ओल्या चाऱ्यासह सुका चारा ही दिला जातो. यात ज्वारी कडबा, सोयाबीन, हरभरा व तुरीची गुळी यांचा समावेश असतो. सायंकाळी बंदिस्त शेडमध्ये शेळ्या आणल्यानंतर मोठ्या शेळ्यांना ४०० ग्रॅम तर लहान करडांना २०० ग्रॅम प्रमाणे मका खाण्यास दिली जाते.
शेळ्यांना दिवसभर मोकळ्या जागेत मुक्त संचारासाठी सोडल्यानंतर त्यातील गव्हाणीत हिरवा आणि वाळला चारा दिला जातो. लहान करडांना गव्हाणीतील चारा उपलब्ध होण्यास अडचण येते. त्यासाठी त्यांना स्वतंत्र व्यवस्था केली जाते. सायंकाळी ७ वाजता शेळ्यांना त्यांच्या वर्गवारीनुसार शेडमधील कप्प्यात आणले जाते.
आरोग्य व्यवस्थापनावर भर ः
शेळ्यांचे विविध आजारांपासून संरक्षण होऊन त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी लसीकरणावर विशेष भर दिला जातो. दरवर्षी १७ सप्टेंबरला पीपीआर लस दिली जाते. दर दोन महिन्यातून एकदा जंतनाशक तर दर तीन महिन्यातून एकदा ईटी अधिक टीटी लस दिली जाते. व्यायलेल्या शेळ्यांना कॅल्शिअमचा पुरवठा केला जातो. सोबतच मिनरल मिश्रणही दिले जाते.
बोकड विक्रीवर भर ः
शेळ्यांची संख्या वाढविण्यासाठी मादीची संख्या अधिक राखली आहे. तर बोकडांची विक्री केली जाते. नायगाव, नांदेड व स्थानिक बाजारात प्रतिकिलो ७०० रुपये दराने विक्री होते. २०२१-२०२२ मध्ये पाच बोकड तर २०२२-२३ मध्ये ६ बोकडांची विक्री झाली. अशी आजपर्यंत दोन लाख रुपयांच्या बोकडांची विक्री करण्यात आली. सध्या शेडमध्ये साधारण ११ बोकड विक्रीसाठी तयार आहेत. श्रावण महिना संपल्यावर मागणी वाढते. त्याकाळात विक्री करणार असल्याचे गोविंद घोरबांड यांनी सांगितले.
लेंडीखत उत्पादन ः
२०१९ पासून आजपर्यंत शेडमधून ७० ट्रॉली लेंडी खत मिळाले आहे. प्रति ट्रॉली ३ हजार रुपये दराने लेंडीखताची विक्री करण्यात आली. त्यातून दोन लाख १० हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे.
रामकिशन घोरबांड - ९७६६१९८४१४
गोविंद घोरबांड - ९८५०६०९३१४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.