Wareouse Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Warehouse: ट्रस्ट पावती : बँक आणि कर्जदार यांच्यातील द्विपक्षीय व्यवस्था

Warehouse Trust Receipt: बँक आणि कर्जदार यांच्यातील द्विपक्षीय व्यवस्था म्हणून ट्रस्ट पावती महत्त्वाची आहे. ही पावती बँकेला शेतीमाल तारण व्यवस्थेत सुरक्षा देते. एक प्रकारे, कर्जदार वस्तूवर प्रक्रिया करण्यासाठी वित्तपुरवठादाराचा ‘एजंट’ म्हणून काम करते.

Team Agrowon

मंगेश तिटकारे, हेमंत जगताप

Warehouse Collateral Security: गोदाम पावती व्यवसायात खासगी गोदाम, ग्रामीण गोदाम आणि सार्वजनिक गोदाम अशा तीन प्रकारात प्रामुख्याने गोदामांची विभागणी करण्यात येते. या व्यवसायात गोदाम तारण व्यवस्थापन क्षेत्रात वित्तीय पुरवठा व गोदाम पुरवठा साखळी याबाबत माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे. या पुरवठा साखळीतील विविध घटक जसे की खरेदीदार, प्रक्रियादार, निर्यातदार, स्थानिक व्यापारी, उत्पादक, गोदाम मालक, गोदाम चालक, गोदाम तारण व्यवस्थापन कंपन्या, वित्त पुरवठादार इत्यादींप्रमाणे इतर अनेक घटकांचा समावेश असून त्यांच्या जबाबदाऱ्या व उद्देश वेगवेगळे आहेत.

ट्रस्ट पावतीचे महत्त्व

गोदाम पावतीचा व्यवसाय करताना पुरवठा साखळीतील विविध प्रकारचे ग्राहक गोदाम पावतीचा वापर करतात. यामध्ये प्रामुख्याने व्यापारी, खरेदीदार, निर्यातदार, प्रक्रियादार यासारख्या अनेक प्रकारच्या घटकांचा समावेश असतो. गोदाम पावती व्यवस्थापन व्यवसायात वित्तीय अर्थसाह्य करणाऱ्या संस्थांकडून वित्तपुरवठा हा जेव्हा प्रक्रिया उद्योगांसाठी केला जातो, तेव्हा वित्तपुरवठादार केवळ तारण सेवा देणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापकाद्वारे नियंत्रित केलेल्या गोदामातील कच्च्या आणि प्रक्रिया केलेल्या वस्तूंना वित्तपुरवठा करण्याचा पर्याय निवडतो.

बहुतेक कायदेशीर प्रणालींमध्ये, गोदामात साठवणूक करण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या बाबतीत आणि गोदाम पावती वित्तपुरवठा प्रक्रियेत फक्त विशिष्ट वस्तू गहाण ठेवल्या जाऊ शकतात किंवा वित्तपुरवठादारांना दिल्या जाऊ शकतात. जेव्हा अशा वस्तूंवर प्रक्रिया करून त्याचे रूपांतर दुसऱ्या उप उत्पादनात केले जाते, तेव्हा वित्तपुरवठादाराचे संपार्श्‍विकत्व म्हणजेच तारण ठेवलेल्या वस्तूवरील तारणाचे अधिकार संपुष्टात येतात आणि कर्जदारासोबत ट्रस्ट किंवा मध्यस्थी करणारी तारण व्यवस्थापन एजन्सीची व्यवस्था केल्याशिवाय, रूपांतरित मालांवर वित्तपुरवठादाराचा कोणताही अधिकार राहात नाही. अशा परिस्थितीत सर्वांत जास्त वापरली जाणारी यंत्रणा किंवा कागदपत्र म्हणजे ट्रस्ट पावती. ही ट्रस्ट पावती बँक आणि कर्जदार यांच्यातील द्विपक्षीय व्यवस्था असून बँकेला शेतीमाल तारण व्यवस्थेत सुरक्षा देते.

एक प्रकारे, कर्जदार वस्तूवर प्रक्रिया करण्यासाठी वित्तपुरवठादाराचा ‘एजंट’ म्हणून काम करते. (जर वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेली जात असेल तर अशीच व्यवस्था वापरली जाऊ शकते). तथापि, कर्जदाराकडे वस्तूचा भौतिक ‘ताबा’ राहतो, ज्यामध्ये ‘महत्त्वपूर्ण जोखीम’ असू शकते आणि त्याची अंमलबजावणी करणे देखील कठीण असू शकते. म्हणूनच, जर कर्जदारांनी वित्तपुरवठादाराकडे बऱ्याच कालावधीपासून व्यवहार केला असेल आणि जादाच्या हमी स्वरूपात काही व्यवस्था केली असेल किंवा तारण ‘व्यवस्थापन कंपनी’ मार्फत कर्जदाराच्या प्रक्रियेबाबतच्या कामकाजावर कडक नियंत्रण ठेवलेले असेल, तरच बँकांकडून ट्रस्ट रिसीट्स स्वीकारल्या जातात. अशा प्रकारची व्यवस्था आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोदाम पुरवठा साखळ्यांमध्ये दिसून येते.

परदेशातील व्यवहार

अनेक पूर्व युरोप आणि मध्य आशियातील देशांमध्ये फील्ड वेअरहाउसिंग किंवा ग्रामीण गोदाम ही व्यवस्था गोदाम व्यवसायात किंवा गोदाम पुरवठा साखळीत एक अत्यंत आकर्षक साधन असू शकते. १९५० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत, जेव्हा युनिफाइड कमर्शिअल कोड अंमलात आला, तोपर्यंत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि कॅनडामध्ये शेतीच्या वित्तपुरवठ्यात ग्रामीण गोदाम व्यवस्थेने एक महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. फ्रान्स, बेल्जियम आणि अनेक लॅटीन अमेरिकन देशांमध्ये (EBRD, २००४) एक व्यावहारिक आणि सुरक्षित सुरक्षा साधन म्हणून ग्रामीण गोदाम व्यवस्थेची संकल्पना स्वीकारण्यात आली आहे. आजही ती संकल्पना व्यापकपणे सुरू आहे. अमेरिकेमध्ये अजूनही काही उद्योगांमध्ये विशेषतः प्रक्रिया करणारे प्रक्रियादार आणि वितरक यांचेमार्फत ही प्रणाली वापरली जाते.

अनेक पूर्व युरोप आणि मध्य आशियातील देशांमध्ये विशेषतः धान्य आणि तेलबिया उद्योगात ग्रामीण गोदाम व्यवस्थापन व्यवस्था मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. उदाहरणार्थ, रशियन फेडरेशनमध्ये सार्वजनिक गोदामांसाठी योग्य कायदेशीर आणि नियामक व्यवस्था नसताना देखील, बँका एकतर इन-हाउस संपार्श्‍विक सुरक्षा सेवा म्हणजेच तारण व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांची नेमणूक करतात किंवा विशेष तारण व्यवस्थापन सेवा तज्ञ किंवा विशेष संपार्श्‍विक व्यवस्थापकांशी करार करतात

आंतरराष्ट्रीय स्तरावर बाल्टिक कंट्रोल, कोटेक्ना, ड्रम रिसोर्सेस किंवा सोसायटी जनरल डी सर्व्हिलन्स सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या व भारत देशातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, बुलडाणा अर्बन, आर्या कोलॅटरल सर्व्हिसेस, गो ग्रीन सर्व्हिसेस, स्टार ॲग्री सर्व्हिसेस अशा प्रकारच्या संपार्श्विक किंवा तारण व्यवस्थापन सेवा पुरवितात. लेखातील आलेखामध्ये एकीकडे कर्जदाराच्या स्वरूपानुसार आणि दुसरीकडे कायदेशीर व्यवस्थांची ताकद व सार्वजनिक गोदामांची आर्थिक ताकद यांच्या आधारे, सार्वजनिक गोदामांच्या व्यवस्थेच्या तुलनेत क्षेत्रीय गोदामांचे आकर्षण याचा एक सारांश देण्याचा प्रयत्न केला आहे.

आलेखामधील उभ्या अक्षावरून दिसून येते, की प्रक्रिया करणाऱ्या उत्पादकांना प्रक्रियेसाठी त्वरित माल मिळण्याची गरज असते, तर निर्यातदार सामान्यतः उत्पादन पाठवणीपूर्वी उत्पादनांची साठवणूक करतात, म्हणून त्यांना त्वरित उत्पादनांची फारशी गरज नसते. विविध उत्पादनांचे वितरक त्यांच्या शोरूममध्ये प्रत्येक वस्तूची मर्यादित प्रमाणात साठवणूक करतात, तसेच विकल्या गेलेल्या वस्तू ताबडतोब गोदामातून हलविण्याची गरज असते. उत्पादने त्वरित मिळण्याची गरज जितकी जास्त असते, तितका कर्जदाराच्या परिसरातील गोदामांना ग्रामीण गोदाम व्यवसायात जास्त प्रीमिअम मिळण्याची शक्यता असते.

आलेखामधील आडव्या अक्षावरून असे दिसते, की सार्वजनिक गोदाम कंपन्यांची आर्थिक स्थिती आणि कायदेशीर व नियामक यंत्रणेची मजबुती, हे दोन्ही सार्वजनिक गोदाम व्यवस्थेद्वारे देण्यात आलेल्या गोदाम पावत्या किती सुरक्षित आहेत हे ठरवितात. त्यामुळे यावरूनच क्षेत्रीय गोदाम व्यवस्थापन आणि सार्वजनिक गोदाम व्यवस्थापन यातील व्यवसायाबाबतचे आकर्षण ठरते. जोखमीच्या वातावरणात, जरी ग्रामीण किंवा क्षेत्रीय गोदाम व्यवस्थापन अधिक खर्चीक असले, तरी वित्तपुरवठादार सार्वजनिक गोदाम व्यवस्थेपेक्षा क्षेत्रीय गोदाम व्यवस्थेला प्राधान्य देतात, कारण क्षेत्रीय गोदाम व्यवस्थापन सेवा पुरवणारा कोलॅटरल मॅनेजर किंवा तारण व्यवस्थापक उच्च-दर्जाची आंतरराष्ट्रीय हमी देऊ शकतो. चांगल्या नियमन असलेल्या वातावरणात आणि अत्यंत विश्‍वसनीय वेअरहाउसिंग कंपन्यांमुळे, क्षेत्रीय गोदाम व्यवस्थापन प्रामुख्याने प्रक्रियादारांच्या वित्तपुरवठ्यापुरते मर्यादित राहील.

गोदाम पावती वित्तपुरवठ्याचे स्वरूप

सामान्यत: गोदाम पावती वित्तपुरवठ्याचे स्वरूप व्यवहाराचा प्रकार आणि अनुमानावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांना शेतीमाल कापणीनंतर वित्तपुरवठा करण्यासाठी व त्यांना विक्रीची वेळ निवडण्यासाठी सार्वजनिक गोदाम व्यवस्थापन प्रणाली वापरण्यास प्रवृत्त करणे ही आदर्श रचना असेल. हे गोदाम वस्तूंच्या भौतिक साठ्याचे संकलनदेखील करू शकते. मात्र अशी सुविधा विकसित देशांमध्ये कमी प्रमाणात आहेत, कारण तेथे शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली असून या प्रक्रियेत स्वतंत्र व्यावसायिक साठवणूक कंपन्या निर्माण झाल्या आहेत.


पूर्व युरोप आणि मध्य आशिया या देशांमध्ये अशा प्रकारची परिस्थिती कमी प्रमाणात विकसित असल्याने बँकांना ग्रामीण किंवा क्षेत्रीय व्यवस्थापन पद्धतीचा मोठ्या प्रमाणात अवलंब करावा लागतो. जर कर्जाचा उद्देश हा व्यापाऱ्याला पुरेशा प्रमाणात वस्तूंच्या मोठ्या साठ्याची उभारणी करणे असेल, तर बँकेसाठी कोलॅटरल मॅनेजरचा वापर करून देशांतर्गत असलेल्या फील्ड अथवा क्षेत्रीय गोदामांमध्ये गोदाम पावती तयार करणे योग्य ठरू शकते, तसेच त्याच वेळी बंदरातील सार्वजनिक गोदामाद्वारे दिलेल्या गोदाम पावत्या स्वीकारणे हा सुद्धा योग्य पर्याय ठरू शकतो.

प्रक्रियादाराला वित्तपुरवठा करण्यासाठी, फील्ड वेअरहाउसिंग किंवा ग्रामीण गोदामातील व्यवस्थेचा वापर करावा लागतो. वस्तूंच्या वितरकाला वित्तपुरवठा करण्यासाठी, वितरकाच्या गरजेनुसार त्याला वस्तूंचा साठा त्वरित उपलब्ध होईल अशी व्यवस्था असणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, उपकरणांच्या सुट्या भागांच्या वित्तपुरवठ्यासाठी सामान्यत:, उपकरणे विक्रेत्याच्या (इक्विपमेंट डीलर) परिसरात फील्ड वेअरहाउसिंग किंवा क्षेत्रीय गोदाम व्यवस्थापन यंत्रणा हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो, तर खतांच्या वित्तपुरवठ्यासाठी सार्वजनिक गोदाम (पब्लिक वेअरहाउस) वापरण्याचा पर्याय उपलब्ध असू शकतो.

निर्यातदाराला वित्तपुरवठा करण्यासाठी, पुरवठा साखळीत (सप्लाय चेन) योग्य ठिकाणी असलेले सार्वजनिक गोदाम उदा. आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडून धान्य गोळा करणारी सायलो यंत्रणा, रेल्वे मार्ग किंवा नदीजवळचे गोदाम, किंवा निर्यात टर्मिनलजवळील सायलो हे सर्वात योग्य साधन ठरू शकते. जरी वित्तपुरवठादार निर्यातदाराच्या स्थानिक खरेदी कामकाजासाठीही वित्तपुरवठा करीत असेल, तर याच्यासोबत ग्रामीण भागातील लहान केंद्रांमध्ये फिल्ड वेअरहाउसिंग किंवा ग्रामीण गोदाम व्यवस्था जोडली जाऊ शकते.

जर सहज उपलब्ध असणारी सार्वजनिक गोदामे उपलब्ध नसतील उदा., सार्वजनिक गोदामे उत्पादन होणाऱ्या भागांपासून दूर असतील किंवा त्यांची क्षमता अपुरी असेल, तर बँका आणि त्यांच्या ग्राहकांकडे फिल्ड वेअरहाउसिंग व्यवस्था किंवा क्षेत्रीय गोदाम व्यवस्था वापरण्याखेरीज पर्याय उरत नाही. यासाठी, सरकारने शेतकऱ्यांच्या वित्तपुरवठ्यासाठी सुधारणा करण्याचे साधन म्हणून ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धान्य उत्पादन होते, अशा ठिकाणी सार्वजनिक गोदामांच्या उभारणीस प्रोत्साहन देण्याचा विचार करावा.

- प्रशांत चासकर ९९७०३६४१३०

(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., साखर संकुल, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सिताफळाचे दर तेजीत; आले दरात सुधारणा, हळद बाजार स्थिर, हिरवी मिरची टिकून, तर केळीला उठाव

Soybean Yellow Mosaic: सोयाबीनवरील पिवळा मोझाईकचे सोप्या पद्धतीने व्यवस्थापन

Monsoon Rain Alert: राज्यात २ दिवस पावसाचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधारेचा अंदाज

Crop Damage Crisis : कमी पावसामुळे पिकांवर नुकसानीचे सावट

Congress Protest: मुंबईत काँग्रेसचा निवडणूक आयोगाविरोधात संताप! टिळक भवनाबाहेर रास्ता रोको

SCROLL FOR NEXT