
मंगेश तिटकारे, हेमंत जगताप
Agri Financial Opportunity: शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था आणि महिला बचत गटांचे फेडरेशन यांच्यामार्फत गोदाम पावती संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी भौगोलिक क्षेत्रातील कृषी विषयक बाबी जसे, की उत्पादित पिकांचा प्रकार, विक्री व्यवस्थेशी निगडीत विविध घटक, धान्याशी निगडीत पुरवठा साखळी इत्यादी निकष गृहीत धरले जातात. गोदामांच्या प्रकाराबाबत विचार केला तर व्यावसायिक भाषेत गोदामाचे प्रामुख्याने खाजगी गोदाम, सार्वजनिक गोदाम आणि फिल्ड गोदाम / क्षेत्रीय गोदाम असे तीन प्रकार गृहीत धरण्यात येतात.
खाजगी गोदामामध्ये मालाचे उत्पादन आणि गोदाम व्यवस्थापन हे एकाच छताखाली करण्यात येते. ही गोदामे त्याच कंपनीद्वारे नियंत्रित केली जातात. या प्रकारात गोदामावर नियंत्रण ठेवणाऱ्या कंपनीचा प्राथमिक व्यवसाय गोदाम व्यवस्थापन नसून मालाचे उत्पादन, घाऊक विक्री किंवा किरकोळ विक्री हा असतो. परंतु गोदाम व्यवस्थापन हा त्याच्या संपूर्ण व्यवसायातील अनेक कामांपैकी एका कामाचा भाग म्हणून चालविले जाते. म्हणून गोदाम व्यवस्थापन व्यवसाय आणि साठविलेल्या वस्तूंच्या मालकामध्ये जवळचा संबंध असतो. उदा. फिलिपिन्ससारख्या काही देशांमध्ये या कंपन्यांना त्यांच्या गोदामांमध्ये वस्तूंच्या उपस्थितीचा पुरावा म्हणून गोदाम पावत्या देण्याची परवानगी आहे आणि बँका कर्जासाठी त्या पावत्या, तारण म्हणून स्वीकारतात.
खाजगी गोदामांमध्ये वस्तूंचा वापर कर्जासाठी तारण म्हणून करणे बँकांसाठी खूप धोकादायक असते. बँकेकडून भौतिक तपासणी व्यतिरिक्त, साठवणूक केलेला माल खरोखर जागेवर आहे का? याची खात्री करण्यासाठी बँकेकडे फारसे काही साधन उपलब्ध नसते आणि जरी असले तरी, गोदामातून मालाच्या होणाऱ्या हालचालीवर अथवा वाहतुकीवर बँकेचे कोणतेही नियंत्रण नसते. जेव्हा वस्तू गोदामात असतात, तेव्हा कर्जदाराच्या दिवाळखोरीच्या कालावधीत बँकेला मोठा कायदेशीर धोका असतो, कारण कर्ज वसुली करताना बँकेला इतर कर्जदारांप्रमाणे प्राधान्य दिले जात नाही. म्हणजेच काय तर जर कर्जदाराकडून त्याच्या खराब आर्थिक परिस्थितीत कर्ज चुकते होऊ शकले नाही तरी कायद्यानुसार प्रथम कर्जदाराला संरक्षण मिळते. त्यानंतर कर्ज वसुलीसाठी बँकेला प्राधान्य दिले जाते.
सार्वजनिक गोदाम हे सामान्यतः एक मोठे साठवण क्षेत्र असते, जे अनेक व्यवसायांना सेवा देते, उदाहरणार्थ, बंदर किंवा शेतमालाची अंतर्गत वाहतूक व हाताळणी केंद्र. हे गोदामचालकाद्वारे भाड्याने किंवा विकत घेऊन मालकी हक्क प्रस्थापित करून चालविले जाते किंवा दीर्घ कालावधीसाठी भाड्याने घेऊन तृतीय पक्षांसाठी निश्चित शुल्क आकारून चालविले जाते. परंतु गोदामचालक तो साठविलेल्या वस्तूंचे मालकी हक्क मिळवीत नाही: गोदाम चालक त्या वस्तूंचा मालक नसतो, परंतु त्या वस्तूंचा तो संरक्षक म्हणून काम करतो.
स्वतंत्र गोदाम व्यवसाय करणाऱ्या मोठ्या कंपन्या, त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या गोदामांच्या व्यतिरिक्त भाड्याने घेतलेली गोदामे अशा दोन्ही प्रकारची गोदामे व्यवसायाकरिता चालवितात. उदा. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत चालविण्यात येणारी गोदामे. तसेच अनेक सार्वजनिक गोदामे स्वतंत्र गोदाम चालकाद्वारे देखील दीर्घकालीन करारांनुसार चालविली जातात. या प्रकारात गोदाम मालकाला निश्चित रक्कम भाड्याच्या स्वरूपात मिळते. गोदाम चालकाला गोदाम आणि त्यामाध्यमातून इतर व्यावसायिक शुल्क मिळते. बँकेतून कर्ज मिळविण्यासाठी, शेतकरी किंवा व्यापारी त्याचा शेतमाल सार्वजनिक गोदामात हलवू शकतो.
क्षेत्रीय गोदाम व्यवस्था
क्षेत्रीय गोदाम (फिल्ड वेअरहाऊस) ही एक अशी व्यवस्था आहे, की ज्यामध्ये एक तारण व्यवस्थापन करणारी कंपनी किंवा क्रेडिट सपोर्ट कंपनी ही ठेवीदार (उत्पादक/ग्राहक) किंवा सार्वजनिक गोदाम व्यवस्थेतील गोदामातील साठवणूक सुविधा (किंवा त्याचा काही भाग) नाममात्र शुल्क देऊन भाड्याने घेते.
साठवणूक करण्यात येणाऱ्या वस्तूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतःचे कर्मचारी नियुक्त करते. बहुतेक प्रकरणांमध्ये, ज्या संस्थेकडे क्रेडिट देण्याची सुविधा असते त्या संस्थेचे स्वत:चे गोदाम सुद्धा असते परंतु गोदामावरील नियंत्रण स्वतंत्र गोदाम ऑपरेटरकडे सोपविले जाते. क्षेत्रीय गोदाम वस्तू जमा करणाऱ्या फर्मच्या परिसरात किंवा जवळ असल्याने, फर्मच्या दैनंदिन व्यवसायात थोडासा व्यत्यय येण्याची शक्यता असते. प्रत्यक्षात, वस्तू गोदामामध्ये हलविण्याऐवजी, वेअरहाऊस वस्तू उत्पादकाच्या जवळ हलविले जाते.
गोदाम पावती वित्तपुरवठा करण्याचा हा प्रकार म्हणूनच विशेषतः उपयुक्त असतो. प्रक्रिया उद्योगांकरिता गोदाम आणि बँक हे दोन्ही घटक जवळ असतील तर वाहतूक खर्च, वेळ यात मोठ्या प्रमाणात बचत होते.
गोदाम पावतीचा वापर
सार्वजनिक गोदाम चालक अनेकदा गोदाम पावत्या देतात. या गोदाम पावत्यांना बँका तारण म्हणून स्वीकारतात, परंतु हे योग्य तारण आहे की नाही हे अनेक घटकांवर अवलंबून असते. विशेषतः देशातील कायदेशीर आणि नियामक व्यवस्था, गोदाम चालकाची स्थिती इत्यादी. गोदामाच्या पावत्या एकेरी किंवा दुहेरी दस्तऐवज घटक म्हणून अदा केल्या जाऊ शकतात. सामान्य गोदामाची पावती ही एक दस्तऐवज किंवा मालकी हक्क असलेला दस्तऐवज म्हणून गृहीत धरण्यात येते. गोदाम पावती दस्तऐवज धारकाला गोदामातून वस्तू मागून घेण्याचा व त्यांची विल्हेवाट लावण्याचा अधिकार आहे. तसेच गोदाम पावती धारकाला केवळ मान्यता देऊन गोदाम पावती दुसऱ्या पक्षाला म्हणजेच नवीन धारकाला देण्याचा देखील अधिकार आहे.
बँका वस्तूंवर प्रत्यक्ष मालकीहक्क प्रस्थापित करण्यासाठी किंवा नियंत्रण मिळविण्यासाठी सामान्य पावत्या वापरू शकतात, परंतु कमोडिटी क्षेत्रातील घटक किंवा या क्षेत्रातील व्यावसायिक अशा पावत्यांविषयी सावध असतात. तसेच ज्या गोदाम पावत्या असे मजबूत अधिकार देतात, तेथे या पावत्यांवर कोणतेही नियंत्रण नसते. त्याप्रमाणे अशा प्रकरणांमध्ये जोपर्यंत इलेक्ट्रॉनिक नोंदणी पद्धती वापरली जात नाही, तोपर्यंत फसवणूक आणि गैरवापराची शक्यता तुलनेने जास्त असते.
गोदाम पावत्यांचे प्रकार
गोदाम पावत्यांचे (एक मानक नागरी कायदा दस्तऐवज) तारण पावती आणि गोदाम पावती असे दोन प्रकार असतात. या दोन्ही पावत्या एकमेकांपासून वेगळ्या केल्या जाऊ शकतात. गोदामचालकाद्वारे दोन्ही कागदपत्रे एकत्र सादर केल्यावरच माल सोडण्यात येतो.
तारण पावती त्याच्या धारकाला तारण ठेवणाऱ्याकडून (वस्तूंचा ठेवीदार) कर्जाची परतफेड करण्याची मागणी करण्याचा अधिकार असल्याचे दर्शविते.
गोदाम पावती धारकाला साठविलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावण्याचा अधिकार आहे. परंतु तारण पावतीच्या धारकाने कर्जाची परतफेड केल्यानंतरच तो गोदामातून माल काढू शकतो.
आंतरराष्ट्रीय परिस्थिती
अमेरिका, पश्चिम युरोप, सिंगापूर आणि दक्षिण आफ्रिका सारख्या इतर देशांमध्ये सार्वजनिक गोदामे गोदामांच्या पावतीवर वर्चस्व गाजवतात. या देशांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा असून त्यांची प्रमुख ठिकाणी गोदामे आहेत. धान्य उत्पादक प्रदेशांमध्ये विपणन साखळीसह, मुख्य प्रक्रिया केंद्रांजवळ, सायलो, रेल्वे मार्ग, नद्यांजवळ उत्पादन उचलण्यासाठी लिफ्टची सुविधा आणि निर्यात बंदरांमध्ये उद्योजक किंवा मोठ्या सहकारी संस्थांच्या मालकीची सार्वजनिक गोदामे असून ते प्रमुख आंतरराष्ट्रीय गोदामे आणि शिपिंग गटांचा भाग असतात.
या गोदामांद्वारे देण्यात येणाऱ्या गोदाम पावत्या प्रमुख आंतरराष्ट्रीय कमोडिटी एक्स्चेंजसाठी वितरणाची साधने म्हणून कार्यरत असतात, ज्यामुळे वस्तूंची निर्मिती करणाऱ्या मालकांना या सार्वजनिक गोदामांमध्ये त्यांच्या वस्तू साठविणे अधिक आकर्षक बनते. सुदृढ कायदेशीर नियामक प्रणाली, वस्तू पुरवठा साखळ्यांमध्ये पुरेशी स्पर्धा, गोदामे बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची उपलब्धता आणि व्यापाराचा प्रवाह हे सर्व या सार्वजनिक गोदाम प्रणालींच्या यशात योगदान देतात. जगाच्या इतर भागात, सार्वजनिक गोदाम सुविधेला अत्यंत कमी प्राधान्य दिले जाते (उदा., लॅटीन अमेरिका) परंतु त्याचा वस्तू वित्तपुरवठ्यावर (उदा., भारत) मोठा परिणाम झालेला दिसून येत नाही.
- प्रशांत चासकर, ९९७०३६४१३० (शेतमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., साखर संकुल, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.