Agriculture Warehouse : गोदाम पावती वित्तपुरवठा क्षेत्रासाठी सेवा पुरवठादार

Warehouse Receipt Finance : गोदाम पावती वित्तपुरवठा क्षेत्रात वित्तपुरवठादारांना सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना अनेक वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.
Agriculture Warehouse
Agriculture Warehouse Agrowon
Published on
Updated on

Agriculture Warehouse Scheme : गोदाम पावती व्यवसाय सुरू करण्याच्या अनुषंगाने गोदाम निर्मिती सोबतच गोदाम व्यवसायाशी निगडित संकल्पना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. गोदामाच्या प्रकारात सार्वजनिक गोदामे, खासगी गोदामे आणि ग्रामीण गोदामे असे व्यावसायिकदृष्ट्या तीन प्रकार गृहीत धरण्यात येतात. गोदाम व्यवसायात गोदाम पावती वित्तपुरवठादार, वेअरहाऊसिंग कंपन्या, फ्रेट फॉरवर्ड््र्स, कोलॅटरल मॅनेजर्स आणि क्रेडिट सपोर्ट एजन्सी आणि गोदाम व्यवसाय उभारणीकरिता येणारा खर्च यांची देखील माहिती असणे आवश्यक आहे.

गोदाम पावती वित्तपुरवठा क्षेत्रात सेवा देणारे सेवा पुरवठादार

गोदाम पावती वित्तपुरवठा क्षेत्रात वित्तपुरवठादारांना सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना अनेक वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. तपासणी एजन्सी, गोदाम कंपन्या किंवा वेअरहाउसिंग कंपन्या, फ्रेट फॉरवर्ड््र्स, कोलॅटरल मॅनेजर्स आणि क्रेडिट सपोर्ट एजन्सी या सर्व नावांमध्ये किंवा कंपन्यांमध्ये काय फरक आहे हे सुद्धा पाहणे आवश्यक आहे.

बऱ्याच वेळेस यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा एकसारख्या दिसतात. उदाहरणार्थ, तीनही प्रकारच्या संस्था तपासणी सेवा देतात, परंतु त्यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांच्या व्याप्तीमुळे त्यात काही प्रमाणात फरक निदर्शनास येऊ शकतो.

तपासणी एजन्सी

या कंपन्या मालाची गुणवत्ता, प्रमाण आणि वजन तपासतात. वित्तपुरवठादार संस्थेच्या विनंतीच्या आधारे या सेवा पुरविल्या जातात.

‘लेटर ऑफ क्रेडिट’ सारख्या व्यवहारांसाठी तपासणी प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक असते. हे प्रमाणपत्र फक्त एका विशिष्ट वेळेपर्यंत वैध असते. मालाच्या सातत्यपूर्ण उपस्थितीबाबत तसेच माल जागेवर आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी कोणतीही हमी किंवा जबाबदारी या कंपन्या स्वीकारत नाही.

या कंपन्यांमार्फत मॉनिटरिंग सेवा म्हणजेच मालाची नियमित तपासणी दीर्घकाळपर्यंत पुरविली जाऊ शकते, पण त्यातही मालाच्या उपस्थितीबाबत सदर कंपन्यांमार्फत कोणतीही हमी घेतली जात नाही.

वेअरहाउसिंग कंपनी

ही कंपनी तृतीय पक्षांना साठवणुकीशी निगडीत सेवा पुरवतात. कायदेशीर आणि नियामक चौकटीत बसणाऱ्या प्रतिष्ठित वेअर हाउसिंग कंपनीची गोदाम पावती चांगली तारण हमी म्हणून मानली जाऊ शकते.

या पावतीवर सायलो पावत्या किंवा द्रवरूप स्वरूपातील मालासाठी टँकरच्या पावत्या गहाण ठेवून किंवा तारण ठेवून व्यापार केला जाऊ शकतो.

फ्रेट फॉरवर्ड््र्स

या प्रकारातील कंपन्या लॉजेस्टिक्स किंवा दळणवळण सेवांचा भाग म्हणून कोलॅटरल मॅनेजमेंट सेवा देतात. या कंपन्या सहसा त्यांच्या कार्गो विमा धोरणांतर्गत या सेवा पुरवितात. त्याचप्रमाणे फक्त त्यांच्या स्वतःच्या गोदामामध्ये कोलॅटरल व्यवस्थापन किंवा तारण व्यवस्थापन केले जाते.

एकदा साठविलेला माल गोदामामधून बाहेर गेल्यावर ही सेवा संपते.

Agriculture Warehouse
Warehouse Finance Receipt: गोदाम पावती वित्तपुरवठा विस्ताराची संधी

कोलॅटरल मॅनेजर्स

कोलॅटरल मॅनेजर्स किंवा तारण व्यवस्थापक हे गोदाम आणि मालाच्या गुणवत्तेची अखंडता निश्‍चित करतात.

मालाची गुणवत्ता तपासणी, प्रतवारी, योग्य साठवणूक व्यवस्था, विमा इत्यादी सेवा यांचेमार्फत पुरविण्यात येते. यांचे स्वतःचे गोदाम असू शकते किंवा ते तृतीय पक्षाच्या गोदामात मालाचे व्यवस्थापन करू शकतात. माल गोदामात आणणे, त्याची साठवणूक करणे आणि माल बाहेर पाठविणे या सर्व प्रक्रियांवर कोलॅटरल मॅनेजर्स किंवा तारण व्यवस्थापक यांचेमार्फत देखरेख ठेवली जाते.

क्रेडिट सपोर्ट एजन्सी

क्रेडिट सपोर्ट एजन्सी वरील सर्व सेवांसह संपूर्ण पुरवठा साखळीमध्ये सुरक्षितता पुरविते. तसेच शेतीमाल तारणाच्या व्यवहाराशी संबंधित सर्व जोखीम या संस्थांमार्फत ओळखून त्यावर उपाययोजना सुचविण्यात येतात.

बँकेने निधी पुरवठा केल्यापासून कर्ज फेडेपर्यंत संपूर्ण व्यवहारावर त्यांच्यामार्फत नियंत्रण ठेवण्यात येते. उदाहरणार्थ, देशांतर्गत गोदामापासून ते निर्यात करण्यासाठी असणाऱ्या गोदामापर्यंत किंवा एका देशातून दुसऱ्या देशात माल पाठविण्यासाठी होणारे व्यवहार सुरळीत करण्यासाठी या प्रकारच्या क्रेडिट सपोर्ट एजन्सी सहकार्य करतात.

गोदाम पावती वित्तपुरवठ्यामध्ये विविध प्रकारच्या सेवा देणाऱ्या कंपन्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. प्रत्येक सेवेची स्वतःची वैशिष्ट्ये आणि मर्यादा आहेत. योग्य सेवा निवडून वित्तपुरवठादार आपली जोखीम कमी करून व्यवहार अधिक सुरक्षित व पारदर्शक करू शकतात.

गोदाम पावती वित्तपुरवठा रशियामधील फॉर्म १३ ची भूमिका

फॉर्मर सोव्हिएट युनियन (FSU) म्हणजेच रशियन देशांमधील धान्याचे उत्पादन करणाऱ्या क्षेत्रात, बँका (स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय) सार्वजनिक गोदाम व्यवस्थेद्वारे देण्यात येणाऱ्या फॉर्म १३ गोदाम पावत्यांना कर्जाची हमी म्हणून वापरतात.

ही पद्धत सोव्हिएट काळापासून चालत आलेली असून, ती विशेषतः  धान्य आणि त्याच्या उप-उत्पादनांसाठी वापरली जाते. मात्र, या गोदाम पावत्यांमुळे बँकांना खरोखरच सुरक्षितता मिळते का? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते.

फॉर्म १३ म्हणजे काय?

या फॉर्मचे अधिकृत नाव  स्टँडर्ड फॉर्म ZPP-१३ असून याचे नियमन  रशियन सरकारच्या  स्टेट ग्रेन इन्स्पेक्शनच्या ४ एप्रिल २००३ च्या आदेश क्रमांक २०अंतर्गत नियंत्रित करण्यात येते. गोदाम पावती विषयात याचा वापर केवळ धान्य आणि त्याच्या उप-उत्पादनांच्या साठवणुकीसाठी फॉर्म १३ चा वापर केला जातो.

फॉर्म १३ च्या मर्यादा

फॉर्म १३ वापराच्या काही मर्यादा समजून घेणे आवश्यक असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील या फॉर्मच्या काही मर्यादा सुद्धा तपासून पाहणे आवश्यक आहे.

केवळ साठवणूक पावती आहे, ती हस्तांतरीय नाही

फॉर्म १३ ही फक्त एक  स्टोअरेज किंवा साठवणूक पावती आहे, जी गोदाम चालकामार्फत माल स्वीकारल्याची खात्री करते. ही पावती मालकी हक्क दर्शवीत नाही आणि तृतीय पक्षाला (बँक किंवा इतरांना) हस्तांतरित करता येत नाही.

गहाण किंवा तारण म्हणून वापरता येत नाही.

फॉर्म १३ पावतीवर कोणताही माल थेट गहाण किंवा तारण ठेवता येत नाही. जर बँक धान्यावर तारण हक्क मिळवू इच्छित असेल, तर  मूव्हेबल प्रॉपर्टीच्या तारणाच्या नियमांनुसार बँकेस स्वतंत्र करार करावा लागतो.

फॉर्म १३ बँकांसाठी धोक्याचे कागदपत्र आहे.

जर गोदामामधील धान्य नष्ट झाले, चोरीला गेले किंवा गोदामचालक दिवाळखोर झाले, तर बँकेला परतावा मिळण्याची शक्यता कमी असते. फॉर्म १३ मध्ये कोणत्याही आर्थिक हमीची तरतूद नसल्यामुळे, बँकांना कायदेशीर संरक्षण मिळत नाही.

बँकांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने सुधारणा करण्याचे उपाय

स्वतंत्र कोलॅटरल मॅनेजमेंट कंपनीची नेमणूक

बँकांनी स्वतःचे  गोदाम निरीक्षक (सुपरवायझर्स) किंवा शेतमाल तारण कंपन्या (CMA) नेमाव्यात. इलेक्ट्रॉनिक स्टॉक मॉनिटरिंग सिस्टिम वापरून गोदामातील प्रत्यक्षात असलेला साठा तपासण्याची तरतूद करावी.

गहाण करार / तारण करार

रशियाच्या  सिव्हिल कोड (कलम ३५७) नुसार मूव्हेबल मालमत्तेचा गहाण करार केल्यास बँकेला अधिक संरक्षण मिळू शकेल.

Agriculture Warehouse
Warehouse Receipts: गोदाम पावतीमुळे वित्तपुरवठा संधी

आधुनिक गोदाम पावती प्रणालीचा वापर

युक्रेन, कझाकिस्तान सारख्या काही देशांनी  हस्तांतरणीय गोदाम पावती प्रणाली स्वीकारली आहे, ज्यामुळे गोदाम पावती वित्तपुरवठा करणे सुरक्षित होते. फॉर्म १३ ही जुनी सोव्हिएट युनियनच्या काळातील पद्धत असून, ती आधुनिक व्यापार आणि बँकिंग सारख्या महत्त्वाच्या गरजांना पुरेशी सुरक्षितता देत नाही. बँकांनी अतिरिक्त सावधगिरी बाळगून धान्य तारणाशी निगडीत क्षेत्रातील कर्जे सुरक्षित पद्धतीने देणे आवश्यक आहे.स्वतंत्र शेतमाल तारण व्यवस्थापन, तारण करार आणि आधुनिक गोदाम पावती प्रणाली  यामुळेच याप्रकारच्या योग्य पद्धतीने बँकांना अशा धोक्यांवर मात करणे शक्य येईल. (लँग-अँडरसन आणि रिम्को, २००६)

सार्वजनिक व ग्रामीण गोदामांच्या खर्चाची तुलना

सार्वजनिक आणि ग्रामीण (फील्ड) गोदाम या दोन्ही प्रकारच्या गोदामांच्या व्यवस्थापन खर्चात स्थिर आणि परिवर्तनीय खर्चाचा समावेश असला तरी, त्यांची खर्चाची रचना विभिन्न असल्याने गोदामाचा वापर करणाऱ्या ग्राहकांना लागणारे शुल्कही वेगवेगळे असू शकते.

ग्रामीण गोदामांचा खर्च

वित्तपुरवठादारांसाठी ग्रामीण गोदाम हे गोदाम व्यवसायातील एक प्रकारचे साधन आहे. वित्तपुरवठादार ग्राहकाच्या गोदामात गोदाम व्यवस्थापनासाठी कोलॅटरल व्यवस्थापन कंपनीमार्फत कोलॅटरल व्यवस्थापकाची नेमणूक करतो. गोदाम व्यवस्थापनामध्ये कोलॅटरल व्यवस्थापकामार्फत मालाची जोखीम गृहीत धरून परिवर्तनीय खर्चात (Variable Cost) सामान्यत: मालाच्या मूल्याच्या ०.१ ते ०.२५ टक्का दरमहा जोखीम प्रीमिअम आकारला जातो. तसेच कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनापासून होणाऱ्या नुकसानीसाठी विमा, लहान प्रमाणातील नुकसान भरपाईसाठी राखीव निधी इत्यादी बाबी सुद्धा कोलॅटरल व्यवस्थापकाला या जोखीम खर्चात गृहीत धराव्या लागतात.

स्थिर खर्च

गोदाम व्यवस्थापनामध्ये प्रत्येक गोदामाकरिता कोलॅटरल व्यवस्थापकामार्फत इतर स्थिर आकार किंवा खर्च गृहीत धरले जातात. यात एक किंवा अनेक सुरक्षा रक्षक नेमणूक आणि त्यांचा वेतन खर्च, गोदाम निरीक्षकांचे मानधन, योग्य तपासणी (ड्यू-डिलिजन्स), प्रमाणपत्र देणे, गोदामात फवारणी किंवा धुरळणी करणे (फ्युमिगेशन) आणि इतर अतिरिक्त खर्च यांचा समावेश असतो. कोलॅटरल व्यवस्थापकामार्फत नगण्य भाड्यावर पायाभूत सुविधा घेण्यासाठी करार करण्यात येतो. हा खर्च सुद्धा स्थिर खर्चात पकडण्यात येतो.

सार्वजनिक गोदाम व्यवस्थापन खर्चात हाताळणी खर्च म्हणजेच सर्वसाधारणपणे मालाची हालचाल म्हणजेच माल गोदामाच्या आत बाहेर करण्यासाठी येणारा खर्च, गोदाम पावती देणे, साठवणूक शुल्क (दर प्रति टन / पोती / कापूस गाठ) यांचा समावेश परिवर्तनीय खर्चात करण्यात येतो. सार्वजनिक गोदाम सर्वसाधारणपणे शेतीमाल काढणीच्या काळात आणि बाजारभावाच्या कमीजास्त होणाऱ्या कालावधीत ठेवीदारांकडून राखीव ठेवण्यात येतात.

गोदाम भाडे प्रति टन प्रति दिन अथवा प्रती महिना

गृहीत धरण्यात येते. यासाठी करार करण्यात येतो.

हा कालावधी सामन्यात: मान्य केलेल्या मालाच्या

स्थिर प्रमाणासाठी व कालावधीसाठी निश्‍चित करण्यात येतो. हा कालावधी साधारणपणे ४५ दिवसांसाठी

अथवा त्याहून अधिक असू शकतो. जर साठवणुकीच्या प्रमाणात अथवा कालावधीत वाढ झाली अथवा शेतीमाल वेळेत उचलला गेला नाही तर गोदाम भाड्यात वाढ होऊ शकते. दोन्ही बाबतींत ठेवीदारास दंड भरावा लागू शकतो.

स्थिर खर्चामध्ये भांडवल व गोदाम मालकांचा वसुलीचा खर्च किंवा भाडेपट्टा व्यवस्थेच्या बाबतीत भाडे शुल्क यांचाही समावेश असतो.

गोदाम व्यवस्थेसाठी किंमत श्रेणी

सार्वजनिक गोदाम व ग्रामीण गोदाम या दोन्ही प्रकारच्या गोदाम व्यवस्थेसाठी किंमत श्रेणी मोठ्या प्रमाणात बदलतात. ठेवीदाराला सार्वजनिक गोदाम वापरताना होणाऱ्या अतिरिक्त वाहतूक खर्चाचाही विचार करावा लागतो. परंतु जर सार्वजनिक गोदाम हे आडबाजूला नसून रस्त्यालगत, नेहमीच्या दळणवळण मार्गावर असेल (रेल्वेमार्गाजवळ माल रेल्वेत टाकण्यासाठी वगैरे) तर मात्र वाहतूक खर्च वाढत नाही. परंतु मोठ्या प्रमाणावर वस्तूंची साठवणूक व वाहतूक करावयाची असल्यास सार्वजनिक गोदामांचा वापर अस्पर्धात्मक होऊ शकतो.

सार्वजनिक गोदाम शुल्कामध्ये परिवर्तनशील घटक आणि स्थिर खर्च यांचा विचार केला तर ग्रामीण गोदाम अथवा फिल्ड वेअरहाउससाठी लागणाऱ्या शुल्कापेक्षा हा खर्च कमी असतो. म्हणूनच सार्वजनिक गोदाम (उपलब्ध असल्यास) उत्पादित वस्तूंची आयात करणाऱ्या लहान आणि मध्यम उद्योगांसाठी अधिक आकर्षक पर्याय असू शकतात. तथापि, उत्पादित वस्तू सार्वजनिक गोदामात नेण्यासाठी आणि तेथून वाहतूक करण्यासाठी खर्च करावा लागतो.

उदाहरणार्थ, आफ्रिकेत, सहकारी संस्था आणि व्यापारी अजूनही कोको, कॉफी किंवा मका यांचे कमी प्रमाण असले तरी त्यासाठी शेतातील गोदामांचा तुलनेने मोठ्या प्रमाणात वापर करतात, ज्याचा एकूण खर्च दरमहा प्रति गोदाम २ ते ४ हजार अमेरिकन डॉलर यांच्या दरम्यान असतो. त्यामुळे वाहतूक खर्च, मालाचे प्रमाण आणि साठवणुकीचा कालावधी या घटकांचा विचार करून गोदामाचा योग्य प्रकार निवडावा.

- प्रशांत चासकर

९९७०३६४१३०

(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., साखर संकुल, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com