Silk Farming Update : महाराष्ट्रात रेशीम शेतीचा विस्तार करण्यासाठी रेशीम संचालनालय सातत्याने प्रयत्न करत असते. त्यांच्या मार्फत तुती लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम व अनुदान योजना राबवल्या जातात. त्याच प्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, केंद्रीय रेशीम मंडळाची सीडीपी, कृषी विभाग अंतर्गत पोकरा योजनेतून रेशीम शेतीसाठी अनुदानाची सोय आहे.
याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे अपारंपरिक रेशीम राज्यामध्ये महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. पूर्वी रामनगरसह अन्य राज्यांमध्ये विक्रीसाठी जावे लागे. रेशीम कोषांचे उत्पादन वाढल्यानंतर विक्री सुलभतेने व्हावी याकरिता उत्पादक पट्ट्यात बाजारपेठही विकसित करण्यात येत आहेत.
महाराष्ट्रातील सध्याची तुती लागवड पद्धत
महाराष्ट्रात सध्या तुती लागवड ही प्रामुख्याने पाच बाय तीन बाय दोन फूट या अंतरावर होते. पट्टा पद्धतीनुसार दोन सरींत पाच फूट, दोन झाडांच्या ओळीत तीन फूट, दोन झाडांतील अंतर हे दोन फूट ठेवले जाते. एकरी ५५०० इतकी झाडे बसतात.
यातून रेशीम अळ्यांसाठी पाल्याची उपलब्धता अधिक होत असली तरी आंतरमशागतीमध्ये काही अडचणी येतात. परिणामी, पहिल्या वर्षी बाग सेट होईतोवर शेतकरी कंटाळतो. पट्टा पद्धतीत दोन ओळींमध्ये एक ड्रीप लॅटरल पुरेशी होते.
पुढे यात पॉवर टिलरने मशागत करता येते. शिवाय दोन ओळींतील तीन फूट अंतरामध्ये उगवणाऱ्या गवताचे मल्चिंग केल्यास त्या ठिकाणी नैसर्गिकरीत्या गांडुळांचे प्रमाण वाढते. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते.
...अशी आहे तुती वृक्ष लागवड पद्धत
तुती वृक्ष लागवड पद्धतीत ६ फूट बाय ६ फूट (एकरी १२१० झाडे), पाच फूट बाय पाच फूट (एकरी १७४३), सात फूट बाय सात फूट (एकरी ८८८ झाडे), आठ फूट बाय आठ फूट (एकरी ६८० झाडे) असे लागवड अंतर शिफारशीत आहे.
जमिनीचा उंच, सखलपणा आणि पोत विचारात घेऊन लागवड अंतर निश्चित करावे लागते. तुती झाडाची वाढ साडेतीन ते पाच फूट झाल्यानंतर कट मारला जातो. या उंचीवर झाडाला आडव्या फांद्या फुटतात. झुडूप तयार होत नाही. त्यामुळे यात ट्रॅक्टरद्वारे आंतरमशागत करणे सोयीचे जाते. तसेच वन्यप्राणी लपून राहू शकत नाहीत.
पहिल्या वर्षी रोपवाटिकेतून रोपे आणून लागवड केल्यास भुईमूग, सोयाबीन किंवा भाजीपालावर्गीय आंतरपीकही घेणे शक्य होते. त्याकरिता दोन फुटांचे अंतर दोन्ही बाजूला सोडावे लागते. मात्र या पिकासाठी संपूर्ण सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करावा. त्यात कोणत्याही कीटकनाशकाचा वापर करता येत नसल्याचे रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी सांगितले.
तुती वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्याकरिता रेशीम संचलनालयाच्या वतीने बडनेरा (अमरावती) येथील राज्य रेशीम पार्क, छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय फार्मवर या पद्धतीने लागवड केली आहे.
विशेष म्हणजे एखादे पाणी कमी पडले तरी हा ताण झाड सहन करू शकत असल्याचे निरीक्षणामध्ये दिसून आली आहे. अशीच लागवड केलेल्या विनोद पेटे पाटील यांना चांगला अनुभव आल्याने त्यांनी दहा बाय दहा फूट अंतरावर लागवड केली आहे.
कर्नाटकात ‘लिफ’ तर महाराष्ट्रात ‘ब्रॅंच फीडिंग’
कर्नाटकमध्ये फांदीचा पाला काढून तो खाण्यासाठी दिला जातो. याला ‘लिफ फीडिंग’ असे म्हणतात. महाराष्ट्रात कोवळ्या पानांच्या फांदी पाल्यासकट तोडून रेशीम कीटकांना खाण्यासाठी दिली जाते.
याला ब्रॅंच फीडिंग म्हणतात. यात फांदीसोबत असलेली पाने लवकर वाळत नाहीत. अळ्या वेगाने पाल्याचा फडशा पाडत असल्यामुळे याचा विशेष परिणाम होत नाही.
कोलारमध्ये सर्वाधिक क्षेत्रावर तुती वृक्ष पॅटर्न
रेशीम शेतीतील पारंपरिक राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात तुती वृक्ष लागवड मोठ्या क्षेत्रावर आहे. इथे कोरडवाहू रेशीम शेतीचा संकल्पना राबवली जाते. महाराष्ट्रातही या संकल्पनेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रेशीम संचालनालय प्रयत्न करत आहे.
पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील चिकलठाणा येथे अंडीपुंज निर्मिती केंद्र प्रस्तावीत आहे. २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, याच केंद्राच्या परिसरात सहा ते सात एकरावर तुती वृक्ष लागवड करण्यात आली आहे. अमरावती रेशीम पार्कच्या परिसरातही या संकल्पनेनुसार लागवड करण्यात आली आहे.
...अशी करावी लागवड
लागवडीसाठी गादीवाफ्यावर किंवा प्लॅस्टिक पिशवीमध्ये तयार केलेली एक वर्ष वयाची कलमे वापरावीत. प्लॅस्टिक पिशवीतील रोपे उत्तम मानली जातात. पावसाळ्यात जून महिन्यात दोन फूट बाय दोन फूट आकाराचा खड्डा करून लागवड करावी. पुरेसा कालावधी मिळाल्यामुळे मुळांची वाढ चांगली होते.
बुंध्याची योग्य वाढ झाल्यानंतर कट मारला जातो. यामुळे झाड पाचरते. फांदी आडवी जाण्यासाठी जमिनीवर खुंटी रोवून सुतळीने बांधली जाते. त्यामुळे ही आडवी फांदी पाच फुटाचा घेर घेते, असे महेंद्र ढवळे यांनी सांगितले.
पिकाला पहिल्या वर्षी दोन पाणी पाळ्यांची गरज राहते. त्यानंतर दुसऱ्या वर्षी पाण्याची तितकीशी गरज राहत नाही. सकाळी पाल्याची तोडणी केल्यास दुपारच्या वेळी झाडाची सावली पडत नाही. त्यामुळे अशा क्षेत्रात शेतकऱ्यांना भाजीपाल्यासारखी आंतरपिके पिके घेता येतात. मात्र त्याचे नियोजन सेंद्रिय पद्धतीने करणे गरजेचे आहे.
तीन पीक घेणे होते शक्य
जून महिन्यात कटिंग केल्यास सप्टेंबरमध्ये पीक घेता येते. सप्टेंबर मध्ये कट मारल्यानंतर डिसेंबरमध्ये आणि डिसेंबर महिन्यात पाऊस पडल्यास पुन्हा फेब्रुवारीत पाला कापता येतो. या प्रमाणे तीन पिके शेतकऱ्याला मिळू शकतात. योग्य व्यवस्थापन शक्य झाल्यास काही शेतकरी चार पिकेही घेऊ शकतात.
महाराष्ट्रातील रेशीम शेती दृष्टिक्षेपात
- १३,३६७ शेतकऱ्यांद्वारे १३,८७२ एकरांवर तुती लागवड.
- २०२२-२३ मध्ये ३९६३ टन कोष उत्पादन.
- लक्ष्यांकाच्या १०२ टक्के कोष उत्पादन झाले.
संपर्क - महेंद्र ढवळे, ९४२१७०७९४८, (उपसंचालक, रेशीम संचालनालय, नागपूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.