Baramati News : ‘‘पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा साखर उत्पादन हा प्रमुख उपजीविकेचा स्रोत बनला आहे. यात ऊस वाहतूक व तोडणी यंत्रणेला खूपच महत्त्व आले आहे. साखर कारखानदारांना कमी खर्चात अधिकचे गाळप उरकायचे झाल्यास ऊस तोडणी व वाहतूकदार यंत्रणेला समन्वयातून वागवावे. त्यांना सेवासुविधा देणे महत्त्वाचे आहे,’’ अशी माहिती माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी दिली.
माळेगाव सहकारी साखर कारखान्यात कार्यरत निलकंठेश्वर ट्रक-टॅक्टर ऊस वाहतूक संघटनेच्या वतीने थंडीच्या पार्श्वभूमीवर सुमारे अडीच हजार ऊस तोडणी मजुरांना ब्लॅंकेट, स्वेटर आदी साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले. वाहनातून ऊस खाली करून घेणारे टिपलर नावाचे अत्याधुनिक यंत्र यशस्वी करणाऱ्या उद्योजक नितीन सातव यांचाही सन्मान करण्यात आला.
या वेळी माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे, संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोरटे, उपाध्यक्ष तानाजी देवकाते, माजी सहायक विक्रीकर आय़ुक्त प्रशांत सातव, संचालक मदनराव देवकाते, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पांडुरंग कचरे, संचालक दत्तात्रेय येळे, कामगार संचालक सुरेश देवकाते, प्रताप आटोळे, संघटनेचे उपाध्यक्ष सागर तावरे आदी उपस्थित होते.
दरम्यान, वाहतूक कमिशनमध्ये वाढ, गटाप्रमाणे गेटकेन वाहतुकीलाही अनुदान मिळावे, अशा काही प्रलंबित मागण्यांबाबत संचालक मंडळ शक्य तेवढा विचार करेल, असे आश्वासन जगताप यांनी दिले.
चंद्रराव तावरे म्हणाले, ‘‘माळेगाव कारखाना ही शेतकऱ्यांची लक्ष्मी आहे. ही संस्था व्यवस्थित चालवून सभासद, साखर कामगार आणि ऊस तोडणी वाहतूकदार समाधानी ठेवणे हे संचालक मंडळाचे काम आहे. निलकंठेश्वर संघटनेचे शक्य तेवढे प्रश्न सोडविले आणि तो पॅटर्न इतर कारखान्यांनी राबविला, त्याचे समाधान आहे.’’
माळेगावचा टिपलरचे आकर्षण...
माळेगावच्या गव्हाणीलगत उभारलेला अत्याधुनिक टिपलर (हार्वेस्टर मागची उसाची वाहणे खाली करून घेणारा टेबल) आता राज्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. हा अत्याधुनिक टिपलर उद्योजक नितीन सातव यांच्या संकल्पनेतून उभारला आहे. परिणामी, माळेगावच्या कार्यस्थळावर हार्वेस्टरद्वारे १ हजार टन प्रतिदिनी उसाचे गाळप उरकत आहे. वेळेची दुप्पट बचत झाल्याने वाहतूकदारांच्याही खेपा वाढल्याने ते समाधानी आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.