Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Drought : दुष्काळ आहेच, हळूहळू तीव्रता जाणवेल!

Farmer Situation In Maharashtra : मुळात पाण्याची उपलब्धता व देण्याची सुविधा मुठभर शेतकऱ्यांकडेच आहे. ज्यांना पिकांना एकही पाणी देता आलं नाही, त्यांना मोठा फटका बसलाय. एकंदरीत यावर्षी सोयाबीन उत्पादनात मोठी घट होणार असं दिसतयं.

Team Agrowon

Maharudra Mangnale

Farmer News Maharashtra : सरकार घोषित करो अथवा न करो, यावर्षीच्या दुष्काळाचं चित्र स्पष्ट झाले आहे. काही भागात अति तीव्र तर काही भागात कमी तीव्र असं याचं स्वरुप आहे.तालुका व जिल्ह्याची पावसाची सरासरी ही भ्रामक आहेच शिवाय मंडलाची(सर्कलवाईज) आकडेवारी ही पावसाचं वास्तव चित्र समोर आणित नाही. याचं महत्त्वाचं कारण सर्वदूर,व्यापक असा पाऊस नाही. एकाच गावच्या एका बाजुच्या शिवारात झालेला पाऊस दुसऱ्या बाजुच्या शिवारात नाही, असा सगळीकडंचा अनुभव आहे. त्यामुळं तालुक्यातील एखाद्या-दुसऱ्या मंडळात पावसाची बरी नोंद तर इतर मंडळात अत्यल्प पाऊस, असं चित्रही पाहायला मिळतं.

काही भागात सोयाबीनची पिकं हिरवी,बघायला बरी वाटत असली तरी,उत्पादनात मोठी घट होणार ,हे निश्चित आहे.याचं कारण खंडीत पाऊस हे आहे. यावर्षी जवळपास सगळ्या भागात पेरण्या चांगल्या झाल्या. उगवण व वाढही बरी राहिली. मात्र ऐन मोक्याच्या वेळेला पावसाने ओढ दिली. सोयाबीनला फुलं लागण्याच्या काळात तीन ते चार आठवड्याचा खंड पावसाने दिला.यामुळे लागलेली फुलं मोठ्या प्रमाणात गळाली. त्यानंतर थोडा पाऊस झाला. आता नेमक्या शेंगात दाणा भरण्याच्या काळात पाऊस गायब झालाय.

ज्यांच्याकडं पाण्याची सुविधा होती, त्यांनी पाणी देण्यासाठी भरपूर धावपळ केली.मात्र वीज वितरण कंपनीने कायम खोडा घातला.आठ तास हे थ्री फेज वीजेचे अधिकृत वेळापत्रक असूनही, इतका वेळ एकही दिवस वीज मिळाली नाही. शिवाय दर आठवड्याला बदलणाऱ्या शेड्यूलने शेतकऱ्यांचे बेहाल केले.रात्री बारा ते सकाळी आठ अशी वेळ ठेवण्यामागचा वीजमंडळाचा हेतू स्पष्ट आहे.

तो म्हणजे,शेतकऱ्यांना वीज वापरता येऊ नये. तो हेतू सफल होतोय.त्या बदल्यात शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जातोय. मुळात पाण्याची उपलब्धता व देण्याची सुविधा मुठभर शेतकऱ्यांकडेच आहे. ज्यांना पिकांना एकही पाणी देता आलं नाही, त्यांना मोठा फटका बसलाय. एकंदरीत यावर्षी सोयाबीन उत्पादनात मोठी घट होणार असं दिसतयं.

नेहमीप्रमाणे या दुष्काळाचा मोठा आघात, केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना होणार आहे.दुसरा फटका जनावरांना बसणार आहे.शेतकऱ्यांकडे चारा आणि पाणी दोन्हीही उपलब्ध नाही. ते मिळवायचं कसं याचं उत्तर नाही.दिवाळीनंतर जनावरं बेभावाने विकली जातील. बहुतांश कत्तलखान्याकडे जातील,हे दु:खद असलं तरी वास्तव आहे.

सरकारला व प्रशासनाला अद्यापही दुष्काळाचं गांभीर्य जाणवलेलं दिसत नाही. राजकीय नेते एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्यात मश्गूल आहेत.गोदीमिडीया चाटूगिरीत,नाही त्या प्रश्नांवर चर्चा करण्यात मश्गुल आहे.प्रशासकीय अधिकारी स्वत:हून  काही सकारात्मक करतील असं नाही. दुष्काळ हा सगळ्यांसाठीचा सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न असतानाही,चर्चा मात्र वेगळ्याच विषयांवर चालू आहे. समाज भरकटवून गेलाय नाही त्या विषयांच्या मागे.x`

विमा कंपन्याचे  राजकारण्यांशी विशेषतः सत्ताधाऱ्यांशी साटेलोटे असल्याने ,त्या पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळवून देतील,अशी अजिबात शक्यता नाही. सगळीकडं असं नैराश्याचं वातावरण आहे.

केवळ सरकार, प्रशासनाचेच नाही तर,लोकांचेही दुष्काळाकडे पूर्ण दूर्लक्ष आहे.समोर एवढी गंभीर परिस्थिती असतानाही,ढोल,ताशे लावून उत्सव साजरे करीत आहेत.हे लज्जास्पद आणि चीड आणणारे आहे.धर्माच्या, रूढी,परंपरांच्या नावाखाली लोक एवढे कोडगे कसे काय बनलेत, ते कळायला मार्ग नाही.नोकरदारांना, मध्यमवर्गीयांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही.मात्र त्यांनी स्वत:ला कितीही अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला तरी,याचे चटके त्यांनाही बसणे अटळ आहे. 

मला पुढे वाढून ठेवलेला दुष्काळ स्पष्टपणे दिसतोय. त्याचे परिणाम, दाहकता जाणवतेय. त्यामुळं अस्वस्थ आहे मी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Disease : खारपाण पट्ट्यात कपाशीवर ‘स्पोडोप्टेरा’चा प्रादुर्भाव

Anil Daunde : प्रशासनाने वारकऱ्यांना सुविधा द्याव्यात

Electricity Bill : खेडमधील १९ हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले माफ

Paddy Crop Harvesting : भात पीक काढणीची लगबग

CM Eknath Shinde : महायुतीच्या योजना चोरून बनवला वचननामा : मुख्यमंत्री शिंदे

SCROLL FOR NEXT