Nagpur News : ‘यलो मोझॅक’चे संकट टळल्यानंतर आता सोयाबीनवर मूळकुजचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची चिंतेच भर पडली आहे. विदर्भात सुमारे १७ लाख ५० हजार हेक्टरवर असलेल्या सोयाबीन लागवड क्षेत्रापैकी सुमारे २ लाख हेक्टर क्षेत्र यामुळे बाधित झाल्याचा अंदाज तज्ज्ञांद्वारे वर्तविण्यात आला आहे. परिणामी, शेतकऱ्यांवर हे पीक गमाविण्याची वेळ आली आहे.
विदर्भात कापसासोबतच सोयाबीन लागवड सर्वाधिक होते. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे संशोधित ‘फुले संगम आणि फुले किमया’ या वाणांपासून उत्पादकता चांगली मिळाली. परिणामी, या दोन वाणांखालील क्षेत्रात वाढ नोंदविली गेली. परंतु हे दोन्ही वाण दक्षिण भारतासाठी (पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर) शिफारशीत आहेत.
त्यानंतरही या अधिक कालावधीच्या वाणांची लागवड करण्यात आली. हे दोन्ही वाणांवर ९० टक्के प्रादुर्भाव असून दहा टक्के वाण इतर संशोधन संस्था, कंपन्यांचे आहेत, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. मूळकुज हा जमिनीद्वारे उद्भविणारा रोग असून, जमिनीत संबंधित बुरशी दीर्घकाळ सक्रिय राहते. पावसाचा खंड पडतो आणि जमिनीचे तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यास प्रादुर्भाव अधिक होतो. पाऊस कमी, ताण बसल्याने पिकाला अन्नद्रव्य घेण्यास अडचणी आल्याच्या परिणामी झाडाची प्रतिकारशक्ती कमी होते.
ट्रायकोडर्मा या बुरशीजन्य घटकाचे ड्रेचिंग (आळवणी) केल्यास प्रादुर्भाव कमी करता येतो. परंतु सध्या सोयाबीन पीक हे शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. या स्थितीत प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकऱ्यांना हे पीक हातचे गमावण्याची वेळ आली आहे. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, अमरावती जिल्ह्यांत मूळकुज संदर्भातील सर्वाधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विद्यापीठाच्या अमरावती येथील प्रादेशिक संशोधन केंद्र (सोयाबीन) तज्ज्ञांकडे येत आहेत.
त्याची दखल घेत खरांगणा (वर्धा) भागात वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. राजीव घावडे यांनी नुकतीच पाहणी केली. या वेळी प्रादुर्भाव नियंत्रणाबाहेर असल्याची स्थिती त्यांना दिसून आली. विदर्भात सर्वदूर अशीच स्थिती असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.