Pune News : काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप समोरासमोर विरोधात उभे ठाकले आहेत. सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार असल्याने या निवडणुकीला रंगत वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप पुरस्कृत पॅनेलसह एका अपक्ष उमेदवाराचा देखील सरपंच पदासाठी अर्ज कायम राहिल्याने काटेवाडीतील सरपंच पदाची निवडणूक तिरंगी होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गाव या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे चर्चेत आले आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेना (शिंदे गट ) सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार सामील झाले असले तरी गावपातळीवर मात्र भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध कायम राहिला आहे.
एकूण १६ जागांसाठी ही ग्रामपंचायत निवडणूक लढवली जाणार आहे. तत्पूर्वी १५ सदस्यपदासाठी एकूण ११८ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पैकी ७१ अर्ज माघारी घेतले. तर सरपंच पदासाठी तब्बल १८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यापैकी तीन उमेदवारी अर्ज कायम राहिले असून उर्वरित अर्ज माघारी घेण्यात आले.
काटेवाडी ग्रामपंचायतचे सरपंचपद यंदा अनुसूचित महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. सरपंच पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलच्या वतीने मंदाकिनी दादा भिसे, भाजप पुरस्कृत पॅनेलकडून ज्योती बापू भिसे, तर तर अपक्ष कमल बापू भिसे यांच्यामध्ये तिरंगी लढत रंगणार आहे.
यापूर्वी देखील २०१७ मध्ये काटेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. यावेळी प्रथम जनतेतून थेट सरपंच निवडण्यात आला होता. यावेळी देखील सलग दुसऱ्यांदा काटेवाडी ग्रामस्थ थेट जनतेतून सरपंच निवडणार आहेत.
विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निवडणूक बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली जाणार. तर पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पांडुरंग कचरे यांच्याकडून भाजप पुरस्कृत पॅनेलची बांधणी करण्यात आली आहे. आदर्श ग्रामपंचायत असा नावलौकिक मिळवणाऱ्या काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विरोधकांकडून नेमके कोणते मुद्दे उपस्थित केले जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.