Nagar Market Committee Election : नगर बाजार समिती निवडणुकीत अनेक ठिकाणी दुरंगी-तिरंगी लढती

नगर जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांच्या निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. गुरुवारी (ता. २०) अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी बहुतेक ठिकाणचे चित्र स्पष्ट झाले.
Nagar Market Committee Election
Nagar Market Committee ElectionAgrowon

Nagar News : नगर जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांच्या निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. गुरुवारी (ता. २०) अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी बहुतेक ठिकाणचे चित्र स्पष्ट झाले. काही ठिकाणी काही जागा बिनविरोध झाल्या आहेत.

बहुतेक ठिकाणी दुरंगी- तिरंगी लढती होत आहेत. विशेषतः तालुक्यातील नेत्यांनी बाजार समितीची सत्ता आपल्याच ताब्यात राहण्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

जिल्ह्यातील नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, नेवासा, राहुरी, संगमनेर, कोपरगाव, राहाता, अकोले, श्रीरामपूर अशा सर्व चौदा बाजार समित्यांच्या निवडणुका होत आहेत.

आगामी काळात पंचायत समित्या, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा अशा मोठ्या निवडणुका होणार आहेत. बहुतेक ठिकाणी १८ जागांवर, तर काही ठिकाणी १६ वा १७ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शेतकऱ्यांनाही उमेदवारी करता आल्याने, अनेक ठिकाणी युवकांना संधी मिळाल्याचे दिसून येत आहे.

Nagar Market Committee Election
Crop Damage In Nagar : नगरमध्ये गारपीट नुकसानीचा आकडा वाढतोय

नगर तालुका बाजार समितीत ३५ उमेदवार रिंगणात आहेत. तालुक्यात भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिलेंविरुद्ध महाविकास आघाडीतील नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. पाथर्डी बाजार समितीत ३७ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपच्या आमदार मोनिका राजळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. प्रताप ढाकणे यांच्या कार्यकर्त्यांत लढत होत आहे.

कर्जतमध्ये ४५ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक काही ठिकाणी दुरंगी, तर कोठे तिरंगी केली आहे. पारनेर तालुक्यात १८ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके व शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. शेवगाव तालुक्यात १८ जागांसाठी ३८ जण निवडणूक रिंगणात आहेत. या तालुक्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच सरळ लढत होताना दिसते.

नेवासे बाजार समितीत ३६ उमेदवार रिंगणात आहेत. आमदार शंकरराव गडाख विरुद्ध माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या गटात ही निवडणूक होत आहे. जामखेड तालुक्यात ३८ जण रिंगणात आहेत. आमदार रोहित पवार विरुद्ध आमदार राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. राहुरीत ३९ उमेदवार रिंगणात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रसाद तनपुरे विरुद्ध पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांत लढत होत आहे.

संगमनेर तालुक्यात ४५ जण निवडणूक रिंगणात आहेत. तालुक्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार बाळासाहेब थोरात यांच्या गटांत लढत होत आहे. कोपरगावला ३८ उमेदवार रिंगणात आहेत. तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. राहात्यात ४ उमेदवार रिंगणात आहेत. पालकमंत्री विखे पाटील यांची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांत लढत होत आहे. अकोले तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे व भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांच्या कार्यकर्त्यांत लढत होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com