Tukdoji Maharaj Thoughts: आपला भारत हा खेड्यांचा देश आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात खेडे खरे पाहता आत्मनिर्भर होती. गावात काय नव्हते? श्रमसंस्कृती खेड्यापाड्यात सदैव नांदत असल्यामुळे शेती आणि माणसांची समृद्धी होतच होती. तरीही स्वयंपूर्ण खेडे ही सर्वांचीच आस होती. गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास हे सूत्र ठरलेले व पटलेले होते. त्यामुळे समाजहित घडू पाहणाऱ्या अनेक महामानवांनी ग्रामीण भागात प्रत्यक्षात आपल्या कामाची सुरुवात केली.
त्यामध्ये माणिक बंडोजी इंगळे म्हणजेच, ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ यांचे विचारकर्तव्ये श्रेष्ठत्त्वाची आहेत. ग्रामीण भारताचा विकास अर्थातच, ग्रामोन्नती आणि गावकी अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी ‘ग्रामगीता’ सांगितली. ते सांगायचे, ‘‘माझा देव कार्यरूपाने जनात आहे. विस्तीर्ण स्वरूपात पसरलेली गावे हीच माझी दैवते आहेत. ग्रामसेवा हीच माझी पूजा आहे.’’ कर्माची पूजा बांधून गावे सांधणारे आणि गावविकास साध्य करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यामुळेच दखलपात्र आहेत.
तुकडोजींचे गुरु आडकोजी महाराजांनी माणिकऐवजी ‘तुकडोजी’ हे नाव राष्ट्रसंतांना दिले. ‘तुकड्या म्हणे’, ‘तुकड्या कहे’ म्हणजेच, अशी त्यांनी मराठी आणि हिंदी भाषांमध्ये स्व-साहित्य निर्मिती केली. त्यांचे ‘ग्रामगीता’, ‘अनुभवसागर भजनावली’, ‘सेवास्वधर्म’, ‘राष्ट्रीय भजनावली’, ‘लहरकी बरखा’ इत्यादी साहित्य समाजहितासाठी सदैव महत्त्वाचे आहे. आपल्या विचारांची समाजाला गरज आहे, हे ध्यानात आल्यानंतर भजन आणि कीर्तनकलेतून त्यांनी समाजजागृती केली. त्यांचे सांगणे ‘प्रबोधन’पर होते.
प्रबोधन करण्याकरिता त्यांनी खंजिरी भजन प्रकार निवडला. त्यांच्या विचारांनी भारताची एकात्मता आणि स्वतंत्रता प्रबळ झाली. प्रबोधनाच्या पातळीवर कलेला दर्जा देणारे ते एकमेव ‘राष्ट्रसंत’ ठरलेले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन आणि जाती-धर्मांचे भेद मिटवून टाकण्यासाठी त्यांनी त्यांची ‘जीवनयात्रा’ ‘विचारमात्रा’ केली. अमरावतीजवळ मोझरी येथे ‘गुरुकुंज’ आश्रमात त्यांनी सेवेकरी निर्माण केले.
समाजाने कोणाला आश्रित करण्यापेक्षा त्यांनी आश्रितांनाच सेवेकरी केले, हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. शेगावचे गजानन महाराज मंदिर संस्थान आणि मोझरीचा गुरुकुंज आश्रम हे माझे आस्थेचे आणि प्रेरणेचे केंद्र आहेत. गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांनी सांगितलेला ‘गावसेवा’ ठेवा मी जपत असतो स्वकर्माने. तुकडोजी महाराजांचे म्हणणेच आहे की, ‘ईश्वरसेवाचि गाव-सेवा, तो सर्वांचाचि ठेवा’, हा ठेवा आपण आणि अनुयायी जपत असल्यामुळे थोडाफार चांगुलपणा शाबूत राहतो.
त्यांच्या अनुयायांनी चांगल्या गावाची उभारणी करण्यासाठी ते सांगतात, ‘‘त्यांना दावा आदर्श जीवन, अथवा प्रचारे द्या पटवून किंवा सेवा रात्रंदिन, करा त्यांची हवी ती’, सेवा करूनही गाव सर्वार्थाने साथ देईलच असे नाही. कुण्या गावातील शिरजोर आगाऊपणा करू लागले तर, ‘सत्य पडताहे कमजोर, म्हणोनिच असत्य होय शिरजोर, यास्तव सत्यासि करावे कठोर’, म्हणजेच, सत्याला कठोर करणे म्हणजे काय? तर सत्यपणाने कामे करून शिरजोराला अनुल्लेखाने टाळलेले अधिकच उचित आहे. गुणिजन माणसांची संघटना गावविकासात एकामनाने आणि अनंत हातांनी राबवून विकास साधावा. ते स्वतः कर्मसाधक म्हणूनच जगायचे. त्यांची ‘या झोपडीत माझ्या’ ही रचना त्यांच्या जीवनाचे वस्तुनिष्ठ विचारदर्शन घडवते.
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनि होती चोऱ्या।
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या।।
पाहुन सौख्य माझे, देवेंद्र तोहि लाजे।
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या।।
या रचनेतून धनवान सत्ताधीश आणि गरीब समाज हा भेदभाव न करता, साधा पण सुसह्यपणे जीवन जगण्याचा त्यांनी दिलेला विचारसंदेश मोलाचाच आहे. भारतीय जीवनपद्धती आणि शेतीतील अस्वस्थ करणारी स्थिती सदैव अनुभवता शेतकरी आणि समाज तग धरून राहिला पाहिजे. सोशीकपणापेक्षा सहनशीलता आणि सजगता चिवट करण्यासाठी संतांचे विचार साह्यकारीच आहेत. संत आणि सिद्धांताच्या एकस्थितीविषयी त्यांनी म्हटलेले आहे की,
संत देहाने भिन्न असती,
परि ध्येय-धोरणाने अभिन्न स्थिती।
साधने जरी नाना दिसती,
तरी सिद्धांतमती सारखी।।
म्हणून संतांचे सिद्धांत समजले, की एकीचे बळ वाढते. गाव एकजीवाने जगतो. गावाची भरभराट होते. त्यामुळे संत सिद्धांत हे गावशुद्धीसाठी मातृत्व संस्कारांसारखे आहेत. हे संस्कार जपले तर अनेक कामे-उद्योग गावागावांतून उभे राहतात. शिक्षण-आरोग्य आणि मानसिक आंदोलने घडतात. शुद्धभाव आणि सहकार्य वाढीस लागते. गावातील विपत्ती जाऊन उन्नती होते. अशा पद्धतीने त्यांनीच गावविकासाचा सार संभवलेला आहे, ते अनुभवाने मांडणी करतात, की
जैसें जैसें सहकार्य वाढे, तैसें गाव उन्नतिस चढे।
न पडे विपत्तीचे कोडे, गांवी कोणा मानवासि।।
गावातील मुला-मुलींचे शिक्षण स्वयंपूर्णतेने झालेच पाहिजे, यावर राष्ट्रसंतांनी भर दिला. ‘‘मुलामुलींना द्यावे शिक्षण, जेणें गावाचे वाढेल भूषण’’, या त्यांच्या विचारांनी आज मुलांप्रमाणेच मुलींच्या शिक्षणाचा आणि स्व-अर्थार्जनाचा टक्का वाढलेलाच आहे. विचारांचा परिणाम आज दृश्य स्वरूपात आपण अनुभवत आहोत. गावागावांतील कर्मवान माणसं विचारांनी गावांची सुधारणा करून वाईट गोष्टी टाळतील, यासाठी त्यांनी मौलिक विचार दिले.
‘गावी चालते सवाई-दिढी,
त्यास याने (शिक्षणाने) बसेन अढी।
ग्रामनिधीची उघडता पेढी,
थंडावेल व्यापारी-सावकारी।।
राष्ट्रसंतांनी अशा कितीतरी पायाभूत गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. त्या आजही कसोशीने पाळायची आवश्यकता आहे. ही सामूहिक जबाबदारी आहे. अज्ञान आणि अर्थ (पैसा) हे दोन प्रश्न पूर्णपणे सुटल्यावर माणूस ‘माणसासारखा’ वागतो. गाव आणि समाज सुरळीत जीवन जगतो. सुरळीत जीवन सुखी-समाधानी आणि आणि समृद्धीकडे जाते. ही अत्यंत जीवनानुभवांची प्रचिती साधली पाहिजे, यासाठी त्यांचे विचार आपले सांगाती आहेत. आजच्या गरजा राष्ट्रसंतांच्या त्या काळात त्यांनी सांगितलेल्या विचारामध्ये आहेत. राज्यकर्त्यांनी राज्य आणि राष्ट्र चालवताना त्या विचाराशी बांधिलकी ठेवून कामे करावीत. त्यांनी लिहिलेले आहे, की
शब्दांत नको समसमान,
प्रत्यक्ष पाहिजे धनमानशिक्षण।
फूट पाडिती ते द्यावेत हाकोन, गावचे भेदी।।
जैसे बापास पुत्रसारिखे,
तैसे गरीब-श्रीमंत राजाचे सखे।
हा भेद मिटविणे काम निके, त्यांचेंचि असे राजधर्मे।।
पण जेथे सरकार मिंधा झाला,
तेथे आग लागली प्रजेला।
मग कोण पुसे कोणाला? धिंगाणा झाला पहा सर्व।।
हे आज आपण अनुभवतो का? याचा जनतेने आणि जनतेचे मायबाप सरकारने विचार करावा का? कारण आज असा विचार करणे अवघड झालेले आहे. पण राष्ट्रसंतांच्या विचाराचे बळ आपणास मिळते.
वाढवा सामाजिक वृत्तीचें लेणे,
मिरवा सामुदायिकतेची भूषणे।
लोकांमाजी।।
राष्ट्रसंतांनी हे सांगितलेले लोकांना हवे आहे. हीच आज त्यांच्या जयंतीच्या (३० एप्रिल) निमित्ताने राष्ट्रसंतांना मानवंदना!
७७७५८४१४२४
(लेखक रानमेवा शेती साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.