
Dairy Success Story : पुणे जिल्ह्यात आंबेघर (ता. भोर) येथील शिवाजी खोपडे यांची १४ एकर शेती आहे. त्यात गहू, भात अशी हंगामी पिके होतात. पाण्याअभावी उन्हाळ्यात शेती पडीक असायची. शेतीला पूरक असा स्वतःचा दुग्धव्यवसाय असावा असे स्वप्न त्यांनी बाळगले होते. त्यादृष्टीने २००० मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठातून (राहुरी) ‘डेअरी डिप्लोमा’ पूर्ण केला.
त्यानंतर दुग्धप्रक्रिया व्यवसायातील आघाडीच्या तीन कंपन्यांमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव घेतला. दुग्धव्यवसाय सुरू करण्याची तीव्र इच्छा व्हायची. परंतु आर्थिक प्राप्तीसाठी नोकरीशिवाय पर्याय नव्हता.
दरम्यान दोन मित्रांसोबत चर्चा केली. भागीदारी तत्त्वावर व्यवसायात उडी घेण्याचे ठरवले. प्रत्येकी तीन लाख अशा नऊ लाखांची भांडवलवृद्धी करण्याचे ठरवले. स्वतःची शेती आणि फ्लॅट गहाण ठेवून १० लाखांचे वैयक्तिक कर्जही शिवाजी यांनी काढले.
व्यवसायातील प्रयत्न
नोव्हेंबर २०१४ मध्ये नोकरीचा राजीनामा दिला. आता कमी खर्चात चांगले युनिट उभारण्यासाठी तयारी सुरू केली. दुधावर प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार करण्याचे प्रयत्न होते. त्यासाठी कोकणातील राजापूर येथील बंद पडलेल्या डेअरीतील साडेपाच लाख रुपयांची ‘मशिनरी’ खरेदी केली.
ताशी ५०० लिटर दूध प्रक्रिया करण्याची त्याची क्षमता होती. सन २०२६ च्या दरम्यान व्यवसायास प्रारंभ झाला. दूध संकलनासाठी शेतकऱ्यांशी चर्चा झाली होती. मात्र स्थानिक विविध डेअरींकडून संकलन सुरू असल्याने पहिल्या दिवशी केवळ नऊ लिटर दूध उपलब्ध झाले.
त्याच दिवशी खासगी डेअरीतून २५० लिटर दूध आणले. प्रत्येक टप्प्यात समस्या येत होत्या. मात्र न खचता त्यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू होते. शिक्षण व अनुभवातून शिवाजी हळूहळू दूधप्रक्रियेचे तंत्र अवगत करू लागले. सन २०१८ पर्यंत दूध संकलन सात हजार लिटरपर्यंत वाढले.
नोटाबंदी आणि कोरोनाचे संकट
व्यवसायात जम बसत असतानाच नोटाबंदीचे संकट उभे राहिले. भागीदारी केलेल्या मित्रांनाही आर्थिक अडचणी आल्याने ते व्यवसायातून बाजूला झाले. त्या वेळी शेतकऱ्यांचे सुमारे ७३ लाख रुपयांचे ‘पेमेंट’ देण्याची मोठी जबाबदारी होती.
अशावेळी शिवाजी यांनी मोठ्या धैर्याने संकटांचा सामना केला. आर्थिक नियोजन करून, प्रसंगी काही मालमत्ता गहाण ठेवून थोडे थोडे करीत पेमेंट चुकते केले. या संकटातून बाहेर पडून उभारी घेत असतानाच कोरोनाचे संकट उभे ठाकले. त्या वेळीही शिवाजी खंबीरपणे उभे राहिले. त्या वेळी दूध संकलन सात हजार लिटरवरून केवळ १७०० लिटरवर आले.
व्यवसायात आली स्थैर्यता
कोरोनाचा काळ संपल्यानंतर शिवाजी यांनी पुन्हा उभारी घेतली. सर्व शक्ती व कौशल्य पणास लावत व्यवसायात स्थैर्य आणण्यास सुरुवात केली. त्यांची पूर्वी आठ विक्री केंद्रे होती. त्यांची संख्या तीनवर आणली. आज पुणे, भोर आणि आंबेघर अशा ठिकाणी ही केंद्रे आहेत. कोणतेही धोके न पत्करता रोजचे दूध संकलन १७०० ते १८०० लिटरपर्यंत मर्यादित ठेवले आहे.
त्यातून श्रीखंड, आम्रखंड, पनीर, तूप, दही, ताक, लस्सी, बासुंदी व कुल्फी (मावा, आंबा, पिस्ता, गुलकंद) असे पदार्थ तयार केले जातात. शिरवळ, पुणे, भोर व महाड (कोकण) पर्यंत वितरक तयार केले आहेत. त्यांच्यापर्यंत उत्पादने पोहोचविण्यासाठी दोन शीतकरण सुविधा असलेली वाहने आहेत. त्यांचे चालक डेअरीत देखील काम करतात.
आरोग्यपूर्ण जीवनाचे तेज
आंबेघरचा परिसर राजगड, तोरणा, रोहिडा किल्ल्यांना वेढलेला व ४० गावखोऱ्यांचा डोंगराळ भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार गावातील प्रत्येक घराघरांत आहेत. त्यातूनच शिवाजी यांनी आपल्या उत्पादनांचे ‘राजतेज’ असे ब्रँडनेम तयार केले आहे. शिवाजी सांगतात की आरोग्यपूर्ण जीवनाचे तेज असे बोधवाक्यच आम्ही तयार केले आहे.
त्यावरूनच खात्री पटते की स्वच्छ, शुद्ध व गुणवत्ताप्रधान अशीच आमची उत्पादने आहेत. प्रत्येक उत्पादन निर्मितीसाठी स्वतंत्र यंत्र, पॅकिंग, सीलिंग तसेच तासाला एक हजार लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेला यांत्रिक सेटअप आहे. ‘फूड सेफ्टी’ विषयातील केंद्र सरकारच्या संस्थेच्या निकषांनुसारच उत्पादनांची गुणवत्ता जपली जाते. परिसरातील दूध उत्पादकांनाही दर दहा दिवसांनी पेमेंट केले जाते.
घरच्यांची खंबीर साथ
२०१५ ला अवघ्या नऊ लिटर दूध संकलनापासून व्यवसाय सुरू झाला आज वर्षाला दीड कोटींची उलाढाल होत आहे. संकटाच्या प्रत्येक टप्प्यावर आई रंजना, वडील बाळासाहेब यांचे मार्गदर्शन व आधार मिळाला. शिवाजी यांची पत्नी कावेरी यांचे एमकॉम, बीएडपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांची व्यवसायात खंबीर साथ आहे.
बंधू युवराज देखील शिवाजी यांच्या खांद्याला खांदा लावून कष्ट घेतात. कुटुंबातील सर्वांच्या एकीमुळे व्यवसायातील सर्व समस्या सोडवणे शक्य झाले. सुमारे वीस जणांना रोजगारही दिला आहे. येत्या काळात १०० गायी, म्हशींचा आधुनिक गोठा उभारणी, तसेच रोजचे दहा हजार लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट ठेवून खोपडे कुटुंब प्रयत्नशील आहे. भविष्यात परदेशात आपले कार्यालय थाटण्याचे स्वप्नही असल्याचे शिवाजी यांनी सांगितले.
शिवाजी खोपडे ९९२२०८००६२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.