मयूर बागूल
Environment Awareness: आज प्रमाणाबाहेर जंगलतोड होत आहे. प्रदूषण, अवर्षण, जमिनीची धूप या संकटांना आपणच आमंत्रण देत आहोत. निसर्गाचे संतुलन बिघडण्यास कोण जबाबदार याचा सखोल विचार होत आहे का? दिसेल त्या झाडावर घाव घालायचे आणि मिळणाऱ्या जागेत घरे, कारखाने उभारायचे हे काम माणसांनीच सुरू केले. पैसा कमावणे हे आजच्या युगाचे एकमात्र ध्येय झाले आहे. पैशाच्या मागे लागत असताना आपण ज्या झाडाच्या आश्रयाला आहोत त्याच झाडावर आघात करून आपला सर्वनाश करून घेत आहोत, हे माणसाच्या लक्षात येत असेल, पण मनातला लोभ त्याला स्वस्थ बसू देत नाही.
सुंदर निसर्गाला आता विनाशाची घरघर तर लागणार नाही ना? मनात शंकेचे काहूर निर्माण होते. असे असेल तर लोभी माणूसच निसर्गाच्या घरघरीला कारणीभूत आहे. यंदा उन्हाळ्यात तापमान चाळीशी ओलांडली आहे. पाऊस वेळेवर पडत नाही. वैश्विक तापमानाची समस्या भेडसावत आहे. हिमशिखरे वितळत आहेत. समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे.
वातावरणातील तापमानवाढ, दुर्मीळ पक्षी व वन्यजिवांची घटती संख्या, ऋतुचक्रात होत असलेले बदल, कीडनाशकांचा मारा वाढल्याने प्रदूषण वाढत आहे, कधीही न ऐकलेल्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव, वन्यजीवसृष्टी नष्ट होणे, जैविक साखळीमध्ये बाधा उत्पन्न होणे यासारख्या समस्या आज जगासमोर आ वासून उभ्या आहेत. वने ही केवळ मानवी जीवनात समृद्धी व संपत्त्ती निर्मितीची साधनेच नव्हे तर त्यावर संपूर्ण जीवसृष्टीचा समतोल अवलंबून आहे. आजवर ज्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली, त्या प्रदेशात वाळवंटे व दुष्काळ निर्माण होऊन तेथील संस्कृतीच नष्ट झाल्याची उदाहरणे इतिहासात आढळतात.
किती वृक्ष जगतात?
देशात जंगलक्षेत्र वाढल्याचा द्विवार्षिक वन अहवाल केंद्रीय पर्यावरण मंत्रालय प्रसिद्ध करीत असतानाच इकडे महाराष्ट्रातील मराठवाडा, खानदेश आणि विदर्भात मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सामना करताना आपण पहिले आहे. राज्य सरकारने या वर्षी हरित महाराष्ट्रात १० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापूर्वी ३२ कोटी आणि ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट यशस्वीपणे गाठल्याचा दावाही सरकारकडून केला जातो.
पण त्यातील किती वृक्ष जगली याचा कुठलाही अहवाल सरकारकडे नाही. सध्या राज्यात रस्त्याची कामे, त्याचं रुंदीकरण तसेच वाढते शहरीकरण व खाजगीकरण यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते, त्या बदल्यात इतर ठिकाणी वृक्ष लागवड केली जाते. इतर ठिकाणी वृक्ष लागवड केली तरीही एका रोपाचे वृक्ष होण्यास अनेक वर्षांचा कालखंड जातो. बेसुमार जंगलतोड झाल्यामुळे त्याभागातील वन्यप्राणी आणि पक्षी यांचे स्थलांतर इतर शहरी भागाकडे होते. यामुळे वन्यजीव साखळी विस्कळीत होते आहे.
दरवर्षी कोट्यवधी नवी झाडे लावण्यापेक्षा मर्यादित झाडे लावून सगळीच झाडे कशी जगतील, याची काळजी घेण्याकडे लक्ष दिले पाहिजे. ही काळजी सरकार पातळीवरच न घेता सर्वसामान्य माणसाचाही यातील सहभाग महत्त्वाचा आहे. नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण तसेच संवर्धन हा या युगातील राष्ट्रीय मुद्दा राहिला नसून तो कधीचाच आंतरराष्ट्रीय झालेला आहे. वने नैसर्गिक स्रोतांचा अविभाज्य भाग असून, त्याचे जीवसृष्टीच्या संवर्धनात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
आता नुसत्या परिषदा आयोजित करून उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भागणार नाही तर लोकसहभागातून उद्दिष्टपूर्तीकडे जाण्यासाठी संकल्प करणे आवश्यक आहे. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे. नाहीतर एकेकाळच्या जंगलांच्या ठिकाणी आगामी काही वर्षांनी वाळवंटे बनतील. जमिनीसाठी, सत्तेसाठी नव्हे तर पाण्यासाठी माणसामाणसांत युद्धे होतील. आज जिथे तिथे इमारतींची जंगले दिसत आहेत. सिमेंटच्या जंगलात मुक्त निसर्गसौंदर्याचा शोध घेणे म्हणजे जणू वाळवंटात हिरवळ शोधणेच!
वृक्ष दत्तक अभियान
आजचा माणूस खूप कर्तृत्वशाली पराक्रमी आहे. निसर्गाला लागणारी घरघर फक्त मानवच थांबवू शकतो. हे अशक्य नाही. माणसाने या बाबतीत आता अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे. एका बाजूला ‘झाडे लावा, झाडे वाचवा’चे नारे पिटतात आणि दुसरीकडे माणसंच झाडांवर आघात करतात. झाडांना आपण ‘सोयरे, वनचरे...’ मानतो ना? मग त्याची काळजी घेणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. झाडे स्वतःसाठी नव्हे तर भावी पिढ्यांच्या सुखासाठी, समृद्धीचे जीवन देण्यासाठी झाडांना संरक्षणाचे दान तरी द्यावे.
पशुपक्षी, प्राणी, वन यांचे संरक्षण, संवर्धन करून आपल्याच बांधवांना वाचवायचे. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे. रोपं लावण्याबरोबर ती कशी जगतील याचीही खबरदारी घेतली पाहिजे. संगोपन केले पाहिजे. ज्या पद्धतीने बालक दत्तक घेऊन पालन पोषण केले जाते. त्याप्रकारे वृक्ष दत्तक अभियान सुरू केले पाहिजे. वृक्ष संवर्धन करणाऱ्याला अनुदान कार्ड दिले पाहिजे. शेतकऱ्यांना शेतीच्या बांधावर अधिक वृक्ष लागवड आणि संवर्धन करण्यास प्रोत्साहन देऊन अनुदान मोबदला दिल्यास त्यांच्या उपयोग होईल.
कार्बन क्रेडिट देखील अधिक वृक्ष संवर्धन करणाऱ्याला दिले पाहिजे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करता येईल. अशक्य काही नाही इच्छाशक्ती आणि पर्यावरण संवर्धनासाठी कटिबद्ध असणे आवश्यक आहे. नाहीतर वनमहोत्सव साजरे करायचे, मोठमोठ्या मंत्र्यांना, आमदारांना आमंत्रित करायचे, त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करायचे. ‘झाडे लावा, झाडे जगवा, घोषवाक्यांचा पुकारा करायचा, वर्तमानपत्रांत ठळक बातम्यांसह छायाचित्रं प्रसिद्ध करायची आणि पुढच्या वर्षी ‘जैसे थे’ स्थिती. याला काय अर्थ आहे?
भविष्यात वृक्ष टिकले नाहीत तर आपणही टिकणार नाही. मुलांप्रमाणे झाडांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. निसर्गाबरोबर राहण्यासाठी फक्त वृक्ष लागवड करून उपयोग नाही तर वृक्ष संवर्धन हे महत्त्वाचे आहे. वृक्ष माणसाचे जीवन फुलांनी सुगंधित करून फळांनी रसभरित करतात. परंतु मानव वृक्षतोड करून आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतो. त्यामुळे वृक्षारोपण ही नितांत गरज ठरली आहे.
आपले जीवन आनंदमय, चैतन्यमय होण्यासाठी झाडं वाचवा. निसर्ग आपल्याला शिकवतो, पण आपण समजून घेत नाही. निसर्गाशी मैत्री करणेच हितावह आहे. निसर्गाची ताकद अफाट आहे. निसर्गाशी शत्रुत्व केले तर तो त्याची ताकद दाखवतो. कुठंतरी सुनामी येते, भूकंप होतात व सर्व उध्वस्त होतं, होत्याचं नव्हतं होतं. ‘निसर्ग कोपला’ असं म्हणण्यापेक्षा याला आपण किती कारणीभूत आहोत, याचा अंतर्मुख होऊन विचार करणे शहाणपणाचे ठरेल. खरोखरच आज अशी वेळ आली आहे की माणसाने आत्मपरीक्षण करणे अनिवार्य आहे.
: ९०९६२१०६६९
(लेखक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.