
अनुराधा भडसावळे
World Environment Day: जानेवारीच्या उन्हात डोंगर आनंदात असतो. गवत सुकू लागलेलं असतं, तर झाडं-झुडपं उबदार हवेत वाढू लागलेली असतात. अशाच वेळी कुणीतरी नतद्रष्ट व्यक्ती एक जळती काडी टाकतो आणि वणवा अख्खा डोंगर गिळंकृत करतो. ‘यंदा वणवे लवकर लागले’ असं म्हणत आपण फक्त लांबून पाहत राहतो. आठवड्यानंतर काळा-करडा झालेला डोंगर दिसतो, पण आपल्याला काही विशेष वेगळे वाटत नाही. कारण असं चित्र आपण गेली कित्येक वर्षं पाहत आलो आहोत.
मे, जूनमध्ये पावसाच्या पहिल्या सरी पडतात आणि रखरखीत डोंगर हिरवे होऊ लागतात. मातीतून नाजूक गवत डोकावू लागतं, जळलेल्या झाडांच्या खोडांतून पालवी फुटते. कीटक परततात, पक्ष्यांचा किलबिलाट भरतो आणि डोंगर पुन्हा जिवंत होतो. मग दरवर्षी प्रमाणे ५ जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणास सुरुवात होते. या दरम्यान पावसात रोपे लावली तरी ती आपोआप फारशी जगत नाहीत.
आजूबाजूचे गवत रोपाशी अन्न, पाणी, प्रकाशासाठी स्पर्धा करते. रोपे चराऊ जनावरांच्या पायाखाली तुडवली जातात, पालवी ओरबाडली जाते, कधी कीड लागते, तर कधी रोपांची मुळे खडकाळ जमिनीत पसरूही शकत नाहीत. हे धोके लक्षात घेऊन ९ इंच बाय ९ इंचाच्या खड्ड्यात प्लॅस्टिकची पिशवी काढून रोप लावल्यावर त्यावर माती लोटून पायाने घट्ट दाबून घ्यावी. प्रत्येक रोपाच्या कडेला आधारासाठी एक काठी रोवून त्याला रोप बांधावे. त्यामुळे सोसाट्याच्या वारा आणि जनावरांपासून रोपाला संरक्षण मिळते.
डोंगर उतारावर लागवडीसाठी झाडे
वृक्षारोपणानंतर रानाला वणवा लागणार, गुरे नवीन पाने खात राहणार हे गृहीत धरून, वणव्यात तग धरणारी आणि गुरांना न आवडणारी झाडे लावणे गरजेचे आहे. सगुणा वनसंवर्धन तंत्राचे जनक कृषिरत्न शेखर भडसावळे यांनी वृक्षारोपणासाठी कोणती झाडे निवडावीत याविषयी सखोल अभ्यास केला आहे. प्रक्षेत्र अभ्यासानुसार सात वर्षे सतत वणवा आणि चरणारी गुरे यांना तोंड देऊन वाळा, शिंदी, करवंद, रानकेळी आणि निर्गुडीची रोपे चांगल्या प्रकारे जगली आहेत आणि त्यांची वाढही जोमदार झालेली आहे.
वाळा
ही गवत वर्गीय वनस्पती आहे. मुळे जमिनीमध्ये तीन मीटर खोल जातात. वणवा लागल्यानंतर त्याची पाने जळतात. परंतु मुळे जमिनीमध्ये टिकून राहतात आणि पुढील वर्षी पुन्हा जोमाने वाळ्यास पाने फुटतात.
कोणत्याही प्रकारची जमीन असेल तरी वाळ्याची खोलवर जाणारी मुळे पावसाच्या पाण्याला जमिनीत मुरण्यासाठी मदत करतात. भूजल वाढवतात, जमिनीची धूप थांबवतात.
वाळ्याची मुळे जमिनीतील प्रदूषण शोषून घेतात. मादागास्करमध्ये वाळा प्रदूषित खनिजे शोषून घेण्यासाठी वापरला जातो.
वर्षभरात वाळा रोप चांगल्या प्रकारे वाढते. उन्हाळ्यात माठामधील पाणी सुगंधी करण्यासाठी वाळ्याच्या मुळांची जुडी वापरली जाते.
शिंदी (वनखजूर)
हे उष्ण, कोरड्या हवामानात टिकणारे झाड आहे. संयुक्त पानांच्या टोकाला काटे असतात.
जमिनीत मुळे जाळ्यासारखी पसरतात. मुळ्यांच्या जाळ्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरते, टिकून राहते. वणव्याने झाडे होरपळली तरीही पुढच्या पावसाळ्यात पुन्हा तरारून वाढतात.
जलसंधारण, धूप नियंत्रण आणि वनसंवर्धनासाठी उपयुक्त झाड आहे. डोंगर उतारांवर लागवड केल्यास धूप नियंत्रणात राहते, भूजल वाढते.
उन्हाळ्यात शिंदीच्या झाडापासून नीरा काढतात. हा रस गोडसर, थंड आणि तरतरी देणारा असतो. पूर्ण वाढ झालेल्या एका झाडातून दररोज ३ ते ५ लिटर नीरा मिळते.
शिंदीच्या गोडसर फळांना शिंदोळ्या म्हणतात. पक्ष्यांना ही फळे आवडतात. झोपडी बांधण्यासाठी आणि झाडू टोपल्या बनविण्यासाठी पाने वापरतात.
करवंद
हे काटेरी झुडूप असून डोंगर उतारावर वाढते. जनावरांचा त्रास कमी होतो. या झाडामुळे जमिनीची धूप थांबवते.
काटेरी असल्यामुळे जनावरे खात नाहीत. उन्हाळ्यात पक्ष्यांना सावली आणि खाद्य मिळते.
रानकेळी
डोंगरकड्यांच्या टोकांवर घट्ट उभी राहते. झाडाची पाने फाटत नाहीत. मजबूत, काटक झुडूप आहे.
मुळे दगडांना धरून ठेवतात. आजूबाजूच्या जमिनीत खोलवर पसरतात त्यामुळे भूस्खलन थांबते. पाणी जमिनीत मुरते. वणव्यानंतर झाडे होरपळली तरी कंद जिवंत राहतो, पुढच्या वर्षी नव्याने फुटून हिरवाई तयार होते.
ही वनस्पती औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. वृक्षारोपण, वनांच्या नैसर्गिक कुंपणासाठी उपयुक्त आहे.
निर्गुडी
स्थानिक, बहूपयोगी आणि टिकाऊ झुडूप आहे. उष्ण, कोरड्या हवामानात टिकते. एकदा मुळे धरली, की कमी पाण्यात सहज जगते, विशेष देखभाल लागत नाही.
खोलवर मुळे जात असल्याने माती घट्ट धरून ठेवते, धूप कमी होते. पालापाचोळ्यामुळे माती सुपीक होते.
निळसर फुले आणि फळे मधमाश्या, फुलपाखरे, पक्ष्यांना आकर्षित करतात. त्यामुळे जैवविविधता वाढवण्यास मदत होते.
ही औषधी वनस्पती वनीकरणासाठी योग्य आहे. पानांचा उपयोग ताप, सर्दी, सांधेदुखीवर होतो.
उन्हाळ्यात पाणी कमी असताना हिरवीगार राहते. जनावरे याची पाने खात नाहीत. भरपूर वाढणारी, वनीकरणासाठी उपयुक्त वनस्पती आहे.
वृक्षारोपणाची उद्दिष्टे
झाडांची हिरवळ निर्माण करणे. पर्यावरण सुधारण्यासाठी मदत होते.
भूगर्भामध्ये पावसाचे पाणी जिरवणे.
पशू, पक्षी, माणसांसाठी अन्न, फळे, औषधांची उपलब्धता होते.
- अनुराधा भडसावळे, ९८२२२८७२२४
(लेखिका पर्यावरण अभ्यासक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.