Rice Agrowon
ॲग्रो विशेष

Global Rice Market: जागतिक बाजारात तांदळाच्या दरातील घसरणीला लगाम

Market Update: जागतिक बाजारात तांदूळाच्या भावात गेल्या काही महिन्यांत घसरण दिसत होती. मात्र, भारतासह इतर निर्यातदार देशांच्या चलनाची स्थिरता आणि विक्रमी उत्पादनामुळे तांदळाच्या दरात स्थिरता येवू शकते.

Team Agrowon

Mumbai News: जागतिक बाजारात तांदळाचे भाव अनेक वर्षांतील निचांकी पातळीवर पोहोचले होते. परंतु भारतासह इतर निर्यातदार देशांच्या चलनाचे मूल्य स्थिरावल्यामुळे तांदळाच्या दरातील घसरण रोखली गेली आहे. परंतु भारतातील तांदळाचा वाढलेला साठा आणि आशियामध्ये विक्रमी तांदूळ उत्पादनाचा अंदाज यामुळे दरवाढीला मर्यादा येणार आहेत, असे तांदूळ निर्यादार आणि व्यापाऱ्यांनी सांगितले.

जगातील एकूण तांदूळ उत्पादनापैकी तब्बल ९० टक्के उत्पादन आशियातील देशांमध्ये होते. त्यातही भारताचे उत्पादन सर्वाधिक असते. भारताने २०२२ मध्ये तांदूळ निर्यातीवर घातलेली बंधने एप्रिल महिन्यात पूर्ण काढली. तसेच रुपयाचे अवमूल्यनही झाले होते. त्यामुळे तांदळाचे भाव गेल्या २२ महिन्यातील नीचांकी पातळीवर पोहोचले होते. थांडलंडमध्येही तांदळाचे भाव तीन वर्षांतील नीचांकी पातळीवर आले. तर व्हिएतनाममध्ये तांदळाने पाच वर्षांतील नीचांकी पातळी गाठली. मात्र आता तांदळाच्या भावात आणखी घट होण्याची शक्यता कमी आहे. तर दुसरीकडे भाववाढीवरही मर्यादा आहेत, असे निर्यातदारांनी सांगितले.

भारताच्या रुपयाचे अवमूल्यन झाले होते. डाॅलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ८७.२ रुपयांवर पोहोचले होते. त्यामुळे तांदळाचे भाव कमी झाले. मात्र आता रुपयाचे मूल्य ८४.५५ रुपयांवर स्थिरावले आहेत. तसेच इतर निर्यातदार देशांच्या चलनाचे मूल्यही स्थिरावले आहेत. त्यामुळे तांदळाच्या भावातील घसरगुंडी रोखण्यास मदत झाली.

राइस एक्स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष बी. व्ही. कृष्णा राव म्हणाले, की तांदळाच्या भावात मोठी सुधारणा झालेली असली, तरी यापुढील काळात भाव मोठी उसळी मारण्याची शक्यता नाही. पुरवठा वाढल्याने तांदळाच्या भाववाढीला मर्यादा आहेत. सध्याच्या दराचा विचार करता तांदळाच्या भावात १० डाॅलरच्या पातळीत चढ-उतार दिसू शकतात. दरपातळी प्रति टन ३९० डाॅलर्सच्या आसपास राहू शकते.

सत्यम बालाजी या निर्यातदार कंपनीचे कार्यकारी संचालक हिमांशू अग्रवाल म्हणाले, की माॅन्सून काळात काही अनपेक्षित घटना घडत नाहीत आणि तांदूळ उत्पादनावर परिणाम जाणवत नाही, तोपर्यंत तांदळाचे भाव सध्याच्या पातळीला राहू शकतात. तांदूळ पिकाला जास्त पाणी लागते. त्यामुळे तांदळाच्या बंपर उत्पादनासाठी माॅन्सून चांगला असावा लागतो. भारतीय हवामान विभागाने २०२५ चा मॉन्सूनमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहील, असा अंदाज दिला आहे. त्यामुळे भारतात तांदळाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.

जागतिक तांदूळ उत्पादनाचा अंदाज

फूड ॲण्ड ॲग्रिकल्चर ऑर्गनायजेशनच्या (एफएओ) अंदाजानुसार, २०२४-२५ च्या हंगामात जागतिक तांदूळ उत्पादन ५४३.६ दशलक्ष टनावर पोहोचण्याचा अंदाज आहे. हे विक्रमी उत्पादन असेल. मागच्या हंगामात ५३५.४ दशलक्ष टन उत्पादन झाले होते. चालू वर्षी विक्रमी उत्पादन आणि शिल्लक साठा मिळून जागतिक बाजारात तांदळाचा पुरवठा ७४३ दशलक्ष टनावर पोहोचण्याचा अंदाज आहे. तर जगाची मागणी ५३९.४ दशलक्ष टन आहे. थोडक्यात, मागणीच्या तुलनेत पुरवठ्याची स्थिती समाधानकारक राहणार असल्याचे चित्र आहे.

भारताची निर्यात वाढणार

भारतात सरकारी गोदामांमध्ये १ एप्रिल रोजी धानासह जवळपास ६३.०९ दशलक्ष टन तांदळाचा साठा होता. हा साठा सरकारी उद्दिष्टाच्या (१३.६ दशलक्ष टन) जवळपास पाच पट अधिक आहे. तांदळाचा विक्रमी साठा आणि चांगल्या माॅन्सूनमुळे उत्पादन वाढण्याचा अंदाज असल्याने खरेदीदार सावधपणे पावले टाकत आहेत. तर निर्यातदार जागतिक बाजारात बाजारात आपली जागा टिकवून ठेवण्यासाठी निर्यात वाढवत आहेत. जागतिक बाजारात भाव कमी असले, तरी वाढलेला पुरवठा आणि मागणी यामुळे यंदा भारताची तांदूळ निर्यात वाढण्याची शक्यता आहे.

भारताची तांदूळ निर्यात जवळपास २५ टक्क्यांनी वाढून २२५ लाख टनांवर पोहोचेल, असा अंदाज राइस एक्स्पोर्टस असोसिएशनने व्यक्त केला आहे. थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान आणि अमेरिकच्या एकत्रित निर्यातीपेक्षा भारताची निर्यात जास्त राहील. त्यामुळे जागतिक निर्यातीमध्ये भारत आपले पूर्वीचे स्थान प्राप्त करण्याची शक्यता आहे. भारताने २०२२ मध्ये तांदूळ निर्यातीवर बंदी घालण्यापूर्वी जागतिक निर्यातीत भारताचा वाटा ४० टक्क्यांपेक्षा जास्त होता.

इतर देशांची निर्यात

भारत आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त तांदूळ देत असल्याने थायलंडची निर्यात कमी झाली. चालू वर्षात पहिल्या तिमाहीत तांदळाची निर्यात ३० टक्क्यांनी कमी होऊन २१ लाख टनांवर स्थिरावली. पूर्ण वर्षात थायलंडची निर्यात २४ टक्क्यांनी कमी होऊन ७५ लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता आहे. व्हिएतनमाची निर्यातही १७ टक्क्यांनी कमी होऊन ७५ लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT