School Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Education: विद्यार्थ्यांना स्पर्धेकडे वळविणाऱ्या शिक्षिका

Archana Bhale: माजलगावच्या शाळेत निम्न मध्यमवर्गीय पालकांची मुले दाखल असतात. त्यांना अधिकाधिक चांगले शिक्षण देण्यात आणि जडणघडणीत उपयुक्त होतील असे उपक्रम राबण्यात अर्चना बाळकृष्ण भाले मॅडम कायम पुढे असतात.

Team Agrowon

डॉ. कैलास दौंड

Majalgaon School: महात्मा जोतिबा फुले माध्यमिक विद्यालय, माजलगाव येथील अर्चना भाले येथे ऑगस्ट २०१६ पासून सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी २०१७ पासून सातत्याने भित्तिपत्रिकेचा उपक्रम राबवला आहे. त्या शिकवत असलेल्या वर्गाच्या तिन्ही तुकडीतील जवळपास १२० विद्यार्थी हस्तलिखित भित्तीपत्रिका दरवर्षी तयार करतात. त्यासोबतच विविध उपयुक्त माहिती, चित्रे चिकटवून विद्यार्थी जवळपास शंभर चिकट बुक तयार करतात.

दरवर्षी मराठी भाषा क्षेत्रात योगदान देणाऱ्या नवीन पाहुण्यांना बोलावून मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप केला जातो. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या भित्तिपत्रकांमध्ये अभ्यास विषयक माहिती बरोबरच लेखक, कवी यांची चित्रे, माहिती, जाहिराती-बातमी संकलन असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. यावर्षी मराठी अभिजात भाषा या विषयावर लक्ष केंद्रित करून अर्चना भाले यांनी विद्यार्थ्यांकडून भित्तीपत्रिका तयार करून घेतल्या.

यावर्षी त्यांच्याकडे विद्यालयाचा बौद्धिक विभाग आहे. या विभागात ‘एक तुकडी एक उपक्रम’ म्हणजेच प्रत्येक जयंती किंवा पुण्यतिथी एकेका वर्गाला वाटून देऊन विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे उपक्रम राबवून घेतले जातात. सर्व कार्यक्रमाच्या तयारीसह सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन विद्यार्थीच करतात. यावर्षी साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त १२५ विद्यार्थ्यांना ‘श्यामची आई संस्कार परीक्षेस’ बसवून सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

एक तुकडी एक गीत

एलिमेंट्री व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेतही पंधरा विद्यार्थ्यांचा सहभाग अर्चना भाले यांनी नोंदवला. त्याचबरोबर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने निबंध स्पर्धा आयोजित केली होती त्यात शाळेला विशेष पुरस्कार मिळाला. तसेच तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत विद्यार्थी सहभागी होऊन विजेते क्रमांक प्राप्त करतात. अर्चना भाले या वर्गामध्ये विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्य तयार करून वर्गात लावतात. स्वतः शैक्षणिक साहित्य बनवल्यामुळे संकल्पना आणि आशय समजण्यास विद्यार्थ्यांना मदत होते.

त्यांच्याकडे दिलेल्या विषयाचे अध्यापन करताना पूर्वतयारी म्हणून त्या संदर्भ ग्रंथाचा वापर करतात. ‘एक तुकडी एक गीत’ हा अनोखा उपक्रम म्हणावा लागेल. शब्दसंग्रह वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांकडून विरुद्धार्थी शब्दाचे हस्तलिखितही करवून घेतले जाते. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या रांगोळ्या काढण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. याबरोबरच विद्यार्थ्यांना नियमित गृहपाठ दिला जातो.

लेखनासाठी अहवाल लेखन, वृत्तांत किंवा बातमी लेखन, शुद्धलेखन प्रकल्प इत्यादींच्या स्वतंत्र वह्या करून त्या नियमितपणे तपासल्या जातात, यात दरवर्षी सातत्य ठेवले जाते. या लेखन विषयक उपक्रमात विद्यार्थी कल्पकतेने लेखन करतात. पालक मेळावा, मराठी भाषा गौरव दिन, भाषा संवर्धन पंधरवडा, जागतिक पर्यावरण दिन, वासंतिक वर्ग, लेखन वाचन कार्यशाळा, इ. उपक्रम त्यांनी ऑनलाइन पद्धतीने घेतले.

महात्मा जोतिबा फुले विद्यालय माजलगाव येथील गीतमंचही भाले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली नावारूपास आलेला आहे. त्यात प्रार्थना, देशभक्तिपर समूहगीते, विज्ञान गीते यांचा समावेश आहे. माजलगाव येथील एकता पत्रकार संघातर्फे मूकनायक दिनानिमित्त झालेल्या निबंध स्पर्धेत त्यांच्या नऊ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व बक्षिसही मिळवले. रोटरी क्लब आयोजित एकलव्य सामान्य ज्ञान परीक्षेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. माजलगाव प्रतिष्ठान तर्फे आंतरशालेय निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांना तयारीनिशी त्यांनी उतरवले. विविध स्पर्धांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना सहभागी करायला त्यांना आवडते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे त्यांचे मत आहे.

त्यांच्याकडे तासिका असलेल्या सर्व वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांशीही या शिक्षिकेचा दूरध्वनीद्वारे संपर्क असतो. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती त्या ठेवतात. त्यातून त्यांना विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजतात व त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करता येतात. त्यामुळे विद्यार्थी दररोज शाळेत उपस्थित राहतात व ते रोजचा अभ्यास रोज पूर्ण करतात. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई या संस्थेने त्यांचा अलीकडेच गौरवपत्र देऊन सत्कार केला आहे. माजलगाव रोटरी क्लबचा शिक्षक पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे.

डॉ. ‌कैलास दौंड ९८५०६०८६११, अर्चना भाले ८४४६३७९७४६

(लेखक नामांकित साहित्यिक व शिक्षक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT