
डॉ. कैलास दौंड
Innovative Teacher: पालघर जिल्ह्यातील मोखाडा हा आदिवासी बहुल तालुका. या तालुक्यातील ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेलगत असणारी किनिस्ते केंद्रातील कोचाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपल्या गुणवत्तेने समाजाचे लक्ष वेधून घेत आहे.
नावीन्यपूर्ण उपक्रम
कोचाळे गावातील शाळा इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत असून एकूण पट संख्या १३० इतकी आहे. या शाळेत विद्यार्थी विकासासाठी राबवले जाणारे उपक्रम म्हणजे घंट्यांविना शाळा, अजेंड्याविना शाळा व्यवस्थापन समिती सभा, गावाचा एक दिवस शाळेसाठी, ग्रीन स्कूल, लोकसहभागातून शाळा विकास.
गावाचा एक दिवस शाळेसाठी : या उपक्रमात प्रत्येक महिन्याला गावातील पालक आणि ग्रामस्थ एक दिवस शाळेत येऊन परिसर सफाई, गवत वगैरे साफ करणे, परसबागेसाठी जागा तयार करणे, रंगरंगोटी, झाडांची देखभाल, आवश्यक असलेली थोडीफार दुरुस्ती अशी कामे स्वयंस्फूर्तीने करतात. या उपक्रमामुळे आजपर्यंत शाळेची कोणत्याच कामासाठी मजुरी खर्च झालेली नाही. शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेलाही सरासरी नव्वद टक्के सदस्य उपस्थित असतात. कोचाळे शाळेत येण्यापूर्वी दिनकर फसाळी हे सावरपाडा येथील शाळेत कार्यरत होते. येथेही त्यांनी लोकवर्गणी आणि स्वतःच्या वेतनातील काही पैसे मिळून प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब उपलब्ध करून पालघर जिल्ह्यातील पहिली टॅब स्कूल निर्माण केली होती.
विद्यार्थिनींसाठी रेस्ट रूम : प्राथमिक शाळेमधील ही सुविधा निर्माण केल्यामुळे विद्यार्थिनी आणि पालक समाधानी आहेत. मुलींचे गैरहजेरीचे प्रमाण त्यामुळे कमी झाले. मुलींना मोफत सॅनिटरी पॅड व्हेंडींग मशिनमधून मिळत आहेत.
पाढे आणि स्पेलिंग पाठांतर : अलीकडे अध्ययन प्रक्रियेतील पाठांतरावरील भार कमी करण्यात आलेला आहे. तरीही पाढे पाठ असतील तर गुणाकार आणि भागाकार कमी वेळात करता येतात हे वास्तव स्वीकारून, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण तयार करून पाढे पाठ करून घेतले जातात. आज येथील जवळपास निम्म्या विद्यार्थ्यांचे साठ पर्यंत पाढे पाठांतर झाले आहे तर उर्वरित विद्यार्थ्यांचे तीस पर्यंत पाढे पाठांतर आहेत. याशिवाय इंग्रजी लेखनामध्ये अचूकता येण्यासाठी दररोज इंग्रजी स्पेलिंग पाठांतर उपक्रम घेतला जातो. सर्वात मोठी स्पेलिंग पाठांतर करणाऱ्या विद्यार्थ्याला बक्षीस म्हणून दररोज एक पेन दिला जातो. त्यामुळे अक्षराची स्पेलिंग पाठ करण्याकडे विद्यार्थी लक्ष देतात.
फिरती प्रयोगशाळा : विद्यार्थ्यांना छोटे छोटे प्रयोग दाखवता यावेत आणि त्यांना प्रत्यक्ष असे प्रयोग करून पाहता यावेत यासाठी शाळेचा प्रयत्न असतो. या उपक्रमात एका संस्थेमार्फत फिरती विज्ञान प्रयोग शाळा दर बुधवारी शाळेत येते. त्यामुळे विद्यार्थी स्वतः देखील प्रयोग करून पाहतात. याचा परिणाम म्हणून या वर्षी शाळेने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्यापर्यंत पर्यंत मजल मारली आहे.
कोचाळे येथील ही शाळा मोखाड्यापासून पस्तीस कि.मी. अंतरावर आहे. गावातील लोकांचा व्यवसाय शेती आणि मजुरी आहे. दरवर्षी दीपावली नंतर पंधरा ते वीस विद्यार्थी शहापूर, भिवंडी, पनवेल अशा ठिकाणी स्थलांतरित होतात. त्या ठिकाणी शिक्षक स्वतः जाऊन त्यांना ‘शिक्षणहमी कार्ड’ देवून नजीकच्या शाळेत दाखल करतात. गरीब परिस्थितीमुळे लेखनसाहित्याचा प्रश्न उद्भवतो त्यावर मात करून २०१९ पासून पालकांचा शैक्षणिक खर्च शून्यावर आणला आहे.
जिल्हा परिषद शाळा कोचाळे ता. मोखाडा ही आयएसओ मानांकनप्राप्त शाळा आहे. त्यामुळे शाळेच्या भौतिक सुविधा व गुणवत्तेतही बदल घडला आहे. शाळेकडे बघण्याचा ग्रामस्थांचा दृष्टिकोन बदलला आहे. शाळेला तालुक्यातील बारा शाळा व्यवस्थापन समित्यांनी भेटी दिल्या आहेत आणि त्यापैकी चार शाळांनी आयएसओ प्राप्त केले आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात मोखाडा तालुक्यातून शाळेला प्रथम क्रमांकांचे बक्षीस मिळाले आहे. शाळेच्या लेझीम पथकाला नुकताच इस्राईलच्या राजदूताचे स्वागत करण्याचा मान मिळाला. पालघर जिल्हा परिषदेच्या एम्प्लॉय ऑफ द वीक अंतर्गत दिनकर फसाळी यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सन्मान केला आहे. पालघर जिल्हा परिषदेचा शिक्षक पुरस्कार दिनकर फसाळी यांना २०१८ मध्ये मिळाला.
दिनकर फसाळी, ८०८०३९२३६६
(लेखक नामवंत साहित्यिक व शिक्षक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.