Chhatrapati Shahu Maharaj  Agrowon
ॲग्रो विशेष

Chhatrapati Shahu Maharaj : समता, न्याय अन् बंधुत्वाचे कार्यप्रतीक

Chhatrapati Shahu Maharaj Birth Anniversary : महाराजांचे विचार फारच प्रगल्भ होते. त्यांची सामाजिक भूमिका सर्वांना विकासकामात बांधण्याची होती. आज शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप...

अरुण चव्हाळ 

Rajashri Shahu Maharaj Journey : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांना ‘सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ’ अशा शब्दांत गौरविलेले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे असे एकमेव कालातीत महापुरुष आहेत, की समता लढ्याचे नायक म्हणून त्यांचे जीवनचरित्र अढळ आहे.

कोल्हापूर संस्थानचे राजे हे पद विसरून लोकशाही पद्धतीने त्यांनी राज्यकारभार केला, अनेक समाजोपयोगी शाश्‍वत विकासकामे केल्यामुळे ते समता लढ्याचे नायक ठरले. मागासवर्गांसाठी आरक्षण सर्वप्रथम शाहू महाराजांनी प्रत्यक्षात आणले.

‘‘मागासवर्गांना विकासाच्या रांगेत बसविण्यासाठी राखीव जागांची तरतूद असावी’’, ही सामाजिक न्यायाची संकल्पना महात्मा जोतिराव फुले यांनी पुढे आणली होती. शाहू महाराजांनी तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली.

२६ जुलै १९०२ रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानात मागास जातींसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्याचा काळाला कलाटणी देणारा निर्णय घेतला. समाजातील सर्व घटकांना समानतेने वागवण्याचा त्यांनी आदेश दिला. त्यामुळे कोल्हापूर संस्थानात शाळा-रुग्णालये-सार्वजनिक इमारती-पाणवठे-विहिरी-उद्योग सर्वांसाठी खुले झाले.

शाहू महाराज खऱ्या अर्थाने समता, न्याय आणि बंधुत्वाचे कार्यप्रतीक होते. त्यांना कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने ‘राजर्षी’ उपाधी दिली होती. उपाधीनुसार त्यांनी कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व साकारले. त्यांनी २८ वर्षे कोल्हापूर संस्थानात रयतेचे राज्य केले.

२ एप्रिल १८९४ रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाची सूत्रे हातात घेतली आणि त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात सांगितले, की आमची सर्व प्रजा सतत तृप्त राहून सुखी असावी; तिच्या कल्याणाची सतत वृद्धी व्हावी व आमच्या संस्थानाची हरएक प्रकारे सदोदित भरभराट होत जावी, अशी आमची उत्कट इच्छा आहे, हे असे त्यांनी प्रजेला आपले मानल्यामुळे प्रजेने प्रज्ञाशोध घेऊन सामाजिक अभिसरण घडवून आणले.

आजच्या राज्यकर्त्यांचे इथे चुकत आहे. ते प्रजेला वाऱ्यावर सोडतात आणि कार्यकर्ते लाभार्थी ठरतात. त्यामुळे कार्यकर्त्यांचा बोलबाला होतो. राज्यकर्त्यांपासून जनता दुरावली जाते. मग आम्ही कसे जनतेचे आहोत हे दाखविण्यासाठी सरकार आटापिटा करते. यातून विकास मागे पडतो आणि समाजाची पिछेहाट होते.

सत्तेच्या सामाजिकीकरणात जनता केंद्रबिंदू असली पाहिजे, शाहू महाराजांनी हेच केले होते. समाज बांधवांसाठी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक वास्तवतेची जोपासना केल्यानंतर राजकीय चौकट मजबूत होत असते.

शाहू महाराजांनी शालेय आणि उच्च शिक्षणाबरोबर वैद्यकीय शिक्षण, गायन, वादन, नाट्य, नृत्य, शिल्पकला, चित्रकला, लोककला, संगीत, साहित्य, क्रीडा, चित्रपट, मल्लविद्या, वकिली शिक्षण, औद्योगिक शिक्षणाच्या सोयी त्यांच्या राज्यात निर्माण केल्या.

‘मूकनायक’ वर्तमानपत्राच्या उभारणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराजांनी सहकार्य केले. त्यांच्या राज्यात वाहतुकीची सोय केली. १९११ मध्ये सत्यशोधक समाज शाखा स्थापना व १९१८ मध्ये आंतरजातीय विवाहाचा कायदा त्यांनी आपल्या संस्थानात मंजूर केला. त्या काळात पडलेल्या दुष्काळात जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या.

गोरगरीब आयाबायांच्या लेकरांसाठी पाळणाघर उभारले. धार्मिक बेबंदशाहीला छेद दिला. आपल्या संस्थानातील देवस्थानची रक्कम शैक्षणिक कार्यासाठी आणि काही पिरांचे उत्पन्न मुस्लिम बोर्डिंगमध्ये वळविले.

समाजात सगळ्या चांगल्या माणसांची व कार्यांची निर्मिती झाली. राज्य सर्वांगाने फुलत गेले. त्यांच्या लोकशाहीमध्ये आणीबाणी व आताच्या ईडीची हुकूमशाही नव्हती. लोकशाहीचा आदर्श त्यांच्यासारखा जपावा.

संस्थानचे राजे आणि ज्ञानराजे...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर परळ बीआयटी चाळीत राहत होते. त्यांना भेटायला शाहू महाराज त्यांच्या घरी गेले. शाहू महाराजांना आपल्या घरी पाहून बाबासाहेब म्हणाले, ‘‘शाहूराजे, तुम्ही घरी येण्याचे कष्ट का केले?’’ यावर शाहू महाराज म्हणाले, ‘‘आम्ही फक्त एका संस्थानचे राजे आणि आपण ज्ञानराजे आहात’’, यावरून आपल्या लक्षात येते, की शाहू महाराज रत्नपारखी होते.

२१ सप्टेंबर १९१७ रोजी राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात ‘प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे’ केले. एवढेच नाही, तर ‘गाव तिथे शाळा’ आणि ‘शाळेत वाचनालय’ या गोष्टींची अंमलबजावणी केली. त्या काळात ज्या वेळी मुंबई राज्यात शिक्षणावर वार्षिक ७० हजार रुपये खर्च होत असे, त्या वेळी कोल्हापूर संस्थानात वार्षिक एक लाख रुपये खर्च होत असे.

एकूण उत्पन्नाच्या ही रक्कम २३ टक्क्यांपेक्षा जास्त होती. देशात एकमेव कोल्हापूर संस्थान शिक्षणावर इतका खर्च करत असे. शिष्यवृत्तीची सवलत-विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था आणि विद्यार्थ्यांना विविध सोईसवलती देण्यात आल्या. विविध जातींची २२ वसतिगृहांची व्यवस्था केल्यामुळे सर्व जातींच्या व समाजाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला. मुलींना सर्व शिक्षण मोफत देणारे शाहू महाराज पहिले राजे होते.

शाहू महाराजांचे विचार फारच प्रगल्भ होते. त्याचा दाखला बघूयात. ते सांगतात, ‘‘शिक्षणाचा प्रश्‍न आणि त्याची निरनिराळी स्वप्ने याकडे प्रथमतः लक्ष गेले पाहिजे. आम्ही शेतकरी किंवा सैनिकच होऊन राहावे, ही स्थिती आम्हाला समाधानकारक नाही. म्हणून व्यापारधंदे व इतर उच्चप्रतीचे व्यवसाय यात आम्हास शिरण्याची जरुरी आहे.

हल्ली व्यापार व उदीम यात आम्ही पडतच नाही. विसाव्या शतकात राष्ट्राची उन्नती व्यापार व तद्‍संबंधी चळवळ यावर अवलंबून आहे’’, यावरून आपल्या लक्षात येते, की आपल्या कौशल्यानुसार आपण व्यापार जगतात उतरले पाहिजे.

मागे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनी शेतकऱ्यांना शेतीतील भार कमी करून व्यापार व उद्योगधंदे करण्याचे केलेले आवाहन त्यांनी शाहू महाराजांचे विचार अवलोकन करून केलेले असावे.

पण आपल्याकडे राजकीय नजरेने प्रत्येक भूमिकेकडे बघितले जाते. त्यामुळे शेतकरी शेती उद्योगधंद्यात आले पाहिजेत. आर्थिक उन्नतीचा गाभा उद्योगधंद्यांमध्ये सामावलेला आहे. त्यातील सचोटी आणि प्रामाणिकपणा जपून आपण सामाजिक उद्धार करू शकतो. आजही वर्णविरोध करून आपण आरक्षणाच्या बाबतीत आरपारची लढाई करत आहोत.

पण पोटापाण्याच्या सोयीसाठी ते ठीक असताना, दुसरीकडे आपल्याच बांधवांची मोट बांधून सामाजिकता जपून उद्योगप्रियता जपली तर झपाट्याने विकास होतो. सहकाराची चळवळ शाहू महाराजांनीच सुरू केली. १९०६ मध्ये सुरू झालेल्या ‘श्री शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’साठी त्यांनी जागा आणि भांडवलाची मदत केली.

उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी शाहूनगरीमध्ये व्यापाऱ्यांना सोयी उपलब्ध करून दिल्या. १९१२ मध्ये संस्थानात सहकारी कायदा मंजूर केला आणि सहकारी चळवळीस प्रेरणा दिली. १९१८ मध्ये मुंबईमध्ये परळ या ठिकाणी कामगारांच्या सभेत अध्यक्ष म्हणून त्यांनी ‘मजूर संघ’ तयार करण्याचे सांगितले.

एकूणच शाहू महाराजांची सामाजिक भूमिका सर्वांना विकासकामात बांधण्याची होती. त्यामुळे त्यांचे राज्य आणि त्यांची राज्यपद्धती विकासाची मार्गदर्शक आहे. त्यांच्यासारखे ‘राष्ट्रीय विचारांचा माणूस’ आपण होणे, आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने हीच खरी आदरांजली!

(लेखक रानमेवा शेती साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT