Rajrshri Shahu Maharaj : राज्यकर्ते कसे असावेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजर्षी शाहू. जनतेचं हित व्हावं म्हणून कायम खमकेपणानं निर्णय घेणं, कल्याणकारी व्यवस्था निर्मितीचं अंतिम ध्येय ठेवणं आणि अल्प आणि दिर्घकालीन मूलभूत बदल घडवण्यासाठी पुढाकार घेणं, शाहूंनी कायम जपलेलं.
राजर्षी शाहूंनी १९२० ला सिंचन धोरण राबवून कोल्हापूर संस्थानात वारंवार पडणाऱ्या दुष्काळातून शेतकऱ्यांचं रक्षण केलं. सार्वत्रिक पाटबंधारे धोरण लागू करून सिंचन अधिकाऱ्याची नेमणूक केली.
धरण, तलाव यांच्या परिस्थितीचा आढावा घेणारे अहवाल सादर करायला लावले. शेतीत नवीन प्रयोग व्हावेत म्हणून १९१२ साली किंग एडवर्ड अँग्रीकल्चर इन्स्टिट्यूट कोल्हापूरात स्थापन केली.
शिपाई स्वारीवर जात तेव्हा शेतकऱ्यांना पैसे देऊन त्यांच्याकडून धान्य खरेदी करायचे. परंतु त्याचे पैसे शेतकऱ्यांना उशिरा दिले जायचे. शाहूंच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा शेतकऱ्यांचा छळ होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांकडून शिपायांनी घेतलेल्या धान्याचे वा इतर वस्तूंचे पैसे जागीच द्यावेत, असा लेखी आदेश शाहूंनी काढला.
शेतकऱ्यांच्या लेकरांना शेतीचं शिक्षण मिळावं म्हणून हुकूम काढले. शेती आणि शिक्षणाची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरांना बिनव्याजी कर्ज दिलं.
एवढंच नाही तर शेतीमालाला हक्काची बाजारपेठ मिळावी, म्हणून विशेष प्रयत्न केले. खाजगी सावकार शेतकऱ्यांची लूट करत होते. त्यामुळं खाजगी सावकारीवर मर्यादा घातल्या. त्यांच्यासाठी कडक नियम आखून दिले.
शेतकऱ्यांनी नवीन पिकांची लागवड करावी म्हणून प्रोत्साहन दिलं. जेणेकरून शेतीतून शेतकऱ्यांना चार पैसे जास्तीचे मिळतील. शेतकऱ्यांना शेती विषयक नवीन प्रयोगा माहिती मिळावी म्हणून शेतकी शाळा सुरू केल्या. हे सगळं दूरदृष्टी असलेल्या राजर्षी शाहूं केलेलं.
लोखंडी नांगर बनवण्यासाठी लोखंडी तोफा देऊन शेतकऱ्यांचं हित जपणारे राजर्षी शाहू होते. पहिल्या महायुद्धाच्या वेळी शस्त्र निर्मितीसाठी लोखंडाचा तुटवडा पडू लागला होता. वसाहतवादी ब्रिटिशांनी भारतातील संस्थानिकांकडून लोखंडी तोफा जमा करायला सुरुवात केलेली. ती वितळून त्यापासून शस्त्र बनवण्याचा ब्रिटिशांचा उद्देश होता.
दरम्यानच्या काळात लक्ष्मण किर्लोस्करांनी औंध संस्थानात पहिला लोखंडी नांगर बनवण्याचा कारखाना सुरू केलेला. पण जगभरातील लोखंडाचा तुटवडा पाहता नांगर बनवण्यासाठी लोखंड मिळत नव्हतं.
शाहूंच्या कानावर याची खबर गेली. शाहूंनी तातडीने लोखंडी तोफा किर्लोस्करांना पाठवून दिल्या. त्या वितळून त्यापासून नांगर बनला पाहिजे, जेणेकरुन शेतकऱ्यांचं हित साधलं जाईल. शेतीची मशागत सोपी होईल, अशी भूमिका घेतली.
किर्लोस्करांनी लोखंडी तोफा वितळून नांगर बनवला. नांगर तयार करण्यासाठी तोफा देणं, सहज देऊन टाकणं सोप्पं नसतं. पण शाहूंकडे दूरदृष्टी होती. रयतेचं कल्याण व्हावं, यासाठी प्राणपणाला लावण्याची तयारी होती. हा खमकेपणा दूरदृष्टीतून येतो.
ती दूरदृष्टी राजर्षी शाहूंकडे होती. शोषित समाज घटकासोबत ठाम उभं राहणं, शाहूंनी कायम जपलं, याची जाणीव आपणही ठेवली पाहिजे.
आज शाहूंचा १०१ वा स्मृतीदिन. रयतेच्या लाडक्या राजर्षी शाहूंना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.