NCP President
NCP President Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar Update : शरद पवार यांच्या गुगलीमुळे राष्ट्रवादीचा खुंटा बळकट होणार?

Team Agrowon

NCP President Resign News : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून खा. सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची चर्चा आहे. खा. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी समिती स्थापन केली होती.

या समितीची लवकरच बैठक होणार असून अध्यक्षपदासाठी सुळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी राष्ट्रीय राजकारणात खा. सुप्रिया सुळे आणि खा. प्रफुल्ल पटेल हे दोघेच सक्रिय आहेत. त्यामुळे या दोघांपैकी एकाच्या नावाला अध्यक्षपदासाठी पसंती दिली जाईल, त्यात सध्या सुळे यांचे पारडे जड दिसत असल्याची चर्चा आहे.

सुप्रिया सुळे यांनी स्वयंसेवी क्षेत्राच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला सुरूवात केली. त्यानंतर आधी राज्यसभा आणि नंतर बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत राष्‍ट्रीय राजकारणात बस्तान बसवले.

सुळे यांना संसदरत्न पुरस्कार मिळालेला असून त्या सभागृहातील चर्चेत सातत्याने सक्रिय सहभाग घेताना दिसतात. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सर्वपक्षीय तरूण नेत्यांशी उत्तम संबंध प्रस्थापित करून त्यांनी आपली स्वीकारार्हता वाढवत नेण्यावर लक्ष केंद्रीत केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होण्यामध्ये सुळे यांची ही पार्श्वभूमी निर्णायक ठरू शकते.

महाराष्ट्रात आपापल्या सुभ्यात राजकीय वर्चस्व असलेल्या वजनदार नेत्यांची मोट असे स्वरूप असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला आगामी राजकीय वाटचालीत टिकाव धरण्यासाठी आधुनिक राजकीय पक्षाचे रूपडे बहाल करण्याचे आव्हान सुप्रिया सुळे यांच्या समोर असेल.

राज्याच्या राजकारणात विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी त्या कसे जुळवून घेतात, यावरही अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत. महाविकास आघाडीची आगामी वाटचाल आणि भवितव्य काय राहील, याबाबतीत सुळे यांचा कस लागणार आहे.

तसेच राष्ट्रीय राजकारणात भाजपच्या विरोधात देश पातळीवर विरोधी पक्षांची एकजुट करण्यात आपली उपयुक्तता त्यांना सिध्द करावी लागणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धक्कातंत्राचा वापर करत राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा मंगळवारी (ता. २) केली होती.

राज्यसभेची उरलेली तीन वर्षांची टर्म संपल्यानंतर कोणतीही निवडणूक लढवणार नाही, तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदावरूनही निवृत्त होत आहे, अशी घोषणा पवार यांनी केल्यानंतर राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, यासाठी प्रचंड आग्रही आहेत. या मुद्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात वरपासून खालपर्यंत घुसळण सुरू झाली.

पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाचे नेमके काय अर्थ लावायचे, याबद्दल सर्व स्तरांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली. पवारांनी एका दगडात अनेक पक्षी मारले असून यामागे दीर्घकालिन गेमप्लॅन असल्याचे तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले.

पवारांनी या निमित्ताने पक्षातील आपली ताकद दाखवून दिली असून खुंटा हलवून बळकट केला असल्याचे मानले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज असून ते भाजपच्या वळचणीला जाऊ शकतात, अशी चर्चा सुरू होती. परंतु पवारांनी निवृत्तीची गुगली टाकून अजित पवारांची पुरती नाकेबंदी केल्याचे मानले जात आहे.

तसेच शरद पवार यांच्या खेळीमुळे राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थान अधिक बळकट होईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पवारांच्या या अनपेक्षित चालीमुळे महाविकास आघाडीत शिवसेना आणि कॉंग्रेस या पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादीचे पारडे जड होईल, तसेच मुख्यमंत्रीपदावरचा दावा पक्का होईल, असे मानले जात आहे.

त्याच प्रमाणे राज्याच्या आणि राष्ट्रीय राजकारणात शरद पवार यांचे महत्त्व आणि बार्गेनिंग पॉवर वाढेल, असा राजकीय विश्लेषकांचा होरा आहे. पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा कारभार, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांची एकजूट या बाबतीत कोणतेही भाष्य केलेले नाही.

त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात पवार यापुढे नेमकी कोणती भूमिका वठवणार, याबद्दल उत्सुकता कायम आहे. परंतु अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर पवार यांची ‘पक्षीय चौकटीच्या पलीकडे व्यापक स्वीकारार्हता असलेले सर्वपक्षीय राजकीय व्यक्तिमत्व' ही ओळख अधिक ठळक होईल. त्याचा देशपातळीवर विरोधी पक्षांची एकजुट करण्यासाठी फायदा होईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT