Fruit Processing  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Processing : फ्रोझन पल्प निर्मिती व्यवसायातून घेतली भरारी

Team Agrowon

Frozen Pulp Manufacturing Business Success Story : वाळुंज (ता. पुरंदर) हा भाग तसा दुष्काळी. याच परिसरात नितीन अंकुश इंगळे यांची पाच एकर शेती आहे. त्यात सीताफळ, चिकू या फळपिकांसह टोमॅटो, गाजर, कांदा या पिकांची लागवड केली जाते. मात्र बाजारपेठेतील आवक आणि मागणीतील तफावतीमुळे अपेक्षित दर मिळत नव्हते. शिवाय हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ या नैसर्गिक संकटामुळे अनेक वेळा मोठे आर्थिक नुकसान होत होते.

सातत्याने होणाऱ्या नुकसानीमुळे शेती विकून टाकावी असा विचार इंगळे यांच्या मनामध्ये यायचा. दरम्यानच्या काळात कृषी विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत रसायनमुक्त फळशेती याबरोबरच प्रक्रिया आणि मूल्यवर्धन यासाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन पुरंदर तालुक्यात होत होते. या शिबिरामध्ये नितीन इंगळे सहभागी झाले. त्यानंतर २०१८ मध्ये ‘आत्मा’च्या योजनेतून कृषी अधिकारी सुनील बोरकर यांच्या प्रयत्नांतून सीताफळ पल्पर मिळाले आणि उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

घरातूनच व्यवसायाचा प्रारंभ

आत्मा योजनेतून सीताफळ पल्पर मिळाल्यावर स्वतःच्या शेतातील उत्पादित सीताफळांवर सुरुवातीच्या काळात प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. यावेळी पत्नी सौ. सविता यांच्या सोबतीने पहिल्या ५० दिवसांत २० टन पल्पनिर्मिती करण्यात आली.

उत्पादित पल्पची जेजुरी, सासवड यासह पुण्यातील काही ठिकाणी विक्री केली. त्यातून चांगला आर्थिक फायदा झाल्याने आत्मविश्‍वास वाढला. पुढे प्रक्रिया उद्योगासाठी घराजवळ शेडची उभारणी करत व्यवसायाचा विस्तार करण्याचे ठरविले.

कच्च्या मालाची खरेदी

सीताफळ पल्प निर्मितीमुळे आत्मविश्‍वास वाढला. पुढे आंबा, जांभूळ, चिकू, स्ट्रॉबेरी, फणस, स्वीटकॉर्न आदी फळांवर प्रक्रिया करून फ्रोझन उपपदार्थ बनविण्यास सुरुवात केली. प्रक्रिया उद्योगामध्ये कच्च्या मालाची उपलब्धता ही अत्यंत महत्त्वाची आणि मुख्य बाब असते. इंगळे यांनी प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाची खरेदी थेट शेतकऱ्यांकडून करण्याचे ठरविले. त्यानुसार स्थानिक शेतकऱ्यांकडून पेरू खरेदी केली जाते.

आंब्यामध्ये हापूससह केसर आंब्यावर प्रक्रिया करून पल्प आणि स्लाइस केल्या जातात. त्यासाठी कोकणातून हापूस आणि पुणे बाजार समितीमधून केसर आंब्याची खरेदी केली जाते. जांभळाची निपाणी, कर्नाटक आणि गुजरात येथून खरेदी होते. फणस आणि स्वीटकार्नची खरेदी पुणे बाजार समितीमधून होते. स्ट्रॉबेरीची खरेदी महाबळेश्‍वरसह भोर, वेल्ह्यातून देखील केली जाते.

...अशी मिळविली बाजारपेठ

उत्पादित पल्पला जेजुरी, पुरंदर, पुणे, नाशिक, मुंबई या शहरांबरोबरच परराज्यांतील व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी असते. परराज्यांतून प्रामुख्याने गुजरात, राजस्थान, दिल्लीमधील व्यापारी पल्प खरेदीसाठी येतात. पल्पला स्थानिक बाजारपेठेत केटरिंग व्यावसायिकांसह हॉटेलमधून चांगली मागणी असते. परराज्यांतील व्यापारी आमच्याकडून माल खरेदी करून स्वतःच्या ब्रॅण्डने पुढे विक्री करतात, असे नितीन इंगळे यांनी सांगितले.

बॅंकेने नाकारले कर्ज

व्यवसाय वृद्धीसाठी यंत्रसामग्रीची खरेदी करायची होती. त्यासाठी २०१९ मध्ये बँकेमध्ये कर्ज घेण्यासाठी गेलो. मात्र आयटीआर भरत नसल्यामुळे सुरुवातीला बँकेकडून कर्जासाठी नकार देण्यात आला. पुढे कर्ज प्रक्रियेसाठी शेती उत्पन्न कागदोपत्री करून आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर कर्जासाठी पात्र झालो. आणि बँक ऑफ इंडियाकडून प्रकल्प उभारणीसाठी भरीव स्वरुपाचे अर्थसाहाय्य प्राप्त झाले. त्यामुळे व्यवसाय वृद्धीस चालना मिळाली असल्याचे नितीन इंगळे सांगतात.

मॅग्नेट प्रकल्पाची मदत

राज्य सरकारच्या पणन विभागाद्वारे फळप्रक्रिया आणि मुल्यवर्धनासाठीच्या मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत साडेतीन कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. तर सुमारे १ कोटी ६० लाखांचे अनुदान प्राप्त मिळाले.

मात्र प्रत्यक्षात प्रकल्प उभारणीसाठी सुमारे ४ कोटींहून अधिक खर्च आला आहे. सध्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील दोन महिन्यांत पूर्ण होईल.

सध्या प्रकल्पाची उत्पादन क्षमता प्रतिदिन २ टन इतकी असून, आगामी काळात ती ६ टनांनी वाढेल. आणि दैनंदिन ८ टन पल्प उत्पादन सुरू होईल, असे इंगळे यांनी सांगितले.

भविष्यात फ्रोझन फूड बरोबरच आंबा कॅनिंग (हवाबंद डब्यातील पल्प) प्रक्रिया उद्योग वाढविण्यावर भर आहे. तसेच देशभरात स्वतःच्या ब्रॅण्डिंगने विक्री व्यवस्था उभारण्याचे प्रयत्न असल्याचे इंगळे यांनी सांगितले.

स्थानिक महिलांना रोजगार

इंगळे यांनी प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून स्थानिक ३० ते ३५ महिलांना रोजगार उपलब्ध केला आहे. दुष्काळी परिस्थितीत याच महिला रोजगार हमीच्या कामावर उन्हातान्हात गेल्या असत्या. मात्र आमच्या प्रकल्पामध्ये त्यांना हक्काचा आणि वर्षभर शीतगृहातील रोजगार उपलब्ध झाला आहे. याचे समाधान आहे. प्रकल्पाचे विस्तारीकरण झाल्यावर आणखी महिलांना रोजगार उपलब्ध होईल, असेही इंगळे यांनी सांगितले.

कुटुंबाची खंबीर साथ

नितीन इंगळे हे पत्नी सौ. सविता यांच्यासह रोहन आणि सोहम या दोन मुलांच्या साथीने संपूर्ण प्रक्रिया उद्योगाचे व्यवस्थापन पाहत आहेत. नितीन स्वतः कच्चा माल खरेदी आणि विक्री व्यवस्थापन पाहतात. त्यांच्या पत्नी सौ. सविता आणि दोन्ही मुले कामगारांच्या मदतीने संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थापन पाहतात. मुले सध्या लहान असली तरी शालेय जीवनातच त्यांना उद्यमशीलतेचे धडे मिळत आहेत. दोन्ही मुले भविष्यात अन्नप्रक्रिया उद्योगातील उच्च शिक्षण घेण्यासाठी तयारी करत आहे.

फ्रोझन पल्पचे दर (रुपयांमध्ये)

आंबा १२५ ते १५०

जांभूळ २०० ते २५०

पेरू ७० ते ८०

सीताफळ १२५ ते २००

फणस २०० ते २२५

अंजीर १०० ते १२५

स्ट्रॉबेरी १०० ते १२५

चिकू ८० ते ९०

राज्यातील प्रमुख पंधरा फळे व भाजीपाला पिकांची मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी राज्य शासन आणि आशियायी विकास बँक यांच्या संयुक्त सहकार्याने पणन विभागाद्वारे मॅग्नेट सोसायटीमार्फत महाराष्ट्र ॲग्रिबिझनेस (मॅग्नेट) नेटवर्क प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नितीन इंगळे यांच्या साडेतीन कोटींच्या फळप्रक्रिया आणि फ्रोझन प्रकल्पाला मॅग्नेटद्वारे सुमारे सव्वा कोटींचे अनुदान मिळाले आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना प्रक्रिया मुल्यवर्धनातून लघुउद्योग उभारणीस चालना मिळत आहे.

विनायक कोकरे, प्रकल्प संचालक मॅग्नेट

नितीन इंगळे ९६२३२८१०२१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT