Spice Manufacturing Industry : तीन उच्चशिक्षीत मित्रांनी सुरू केला मसाले निर्मिती उद्योग

परभणी येथील तीन उच्चशिक्षित मित्रांनी नोकरीकडे न वळता प्रक्रिया उद्योग उभारणीला महत्त्व दिले. २६ प्रकारचे मसाले, सात प्रकारच्या निर्जलीयुक्त पावडरींची निर्मिती केली. ग्राहकांच्या गरजेनुसार विविध पॅकिंगमधून सुर्यांशु ब्रॅण्डने ही उत्पादने लोकप्रिय करीत आश्‍वासक उलाढालीकडे त्यांनी वाटचाल केली आहे.
Spice Manufacturing Industry
Spice Manufacturing IndustryAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी शहरातील सहकार नगर येथील रहिवासी व युवक नंदकिशोर भारती, संदीप पिंपरकर, प्रशांत भानेगावकर हे लहानपासूनचे मित्र आहेत. नंदकिशोर यांची मूळ डाबी गावी पाच एकर शेती आहे.

वडील काशिनाथ महावितरणमध्ये सेवेत असल्याने कुटुंब काही वर्षापूर्वी परभणीत स्थायिक झाले. नंदकिशोर यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत अन्नतंत्र महाविद्यालयातून बी. टेक. पदवी घेतली केली आहे.

संदीप यांनीही परभणी येथील खासगी महाविद्यालयातून याच विषयातील बी. टेक पदवी तर प्रशांत (उमरखेड, जि.यवतमाळ) यांनी बीएडीएड ची पदवी घेतली.

प्रक्रिया उद्योगाचा श्रीगणेशा

नंदकिशोर यांनी पदवी घेतल्यानंतर काही काळ कंपनीत नोकरीचा अनुभव घेतला. परंतु तेथे मन रमले नाही. अन्नतंत्र विषयातील आपले शिक्षण असल्याने स्वतःचाच प्रक्रिया उद्योग सुरू केला तर पुढे प्रगतीच्या अधिक संधी निर्माण होतील त्यांना वाटू लागले.

सन २०१० मध्ये त्या दृष्टीने ‘इंडियन ट्रॅडिशनल फूड्स प्रोसेसिंग नावाने उद्योगाची नोंदणी केली. परभणी येथील वसमत रस्ता परिसरात भाडेतत्वावर घर घेतले.

परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या आंबा, लिंबू, आवळा आदी मालापासून लोणचे व चटणी निर्मिती सुरू केली. परभणी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये विक्री सुरू केली. हा उद्योग सुरू असताना मुंबई येथील संस्थेतून एमबीए (कृषी व्यवसाय व्यवस्थापन) ही पदवीही घेतली.

Spice Manufacturing Industry
Spices Industry : घरगुती मसाले उद्योगाने दाखवली यशाची वाट

भागीदारीत सुरू झाला उद्योग

दरम्यान एकट्याने उद्योग करण्याला मर्यादा होत्या. मित्रांची साथ मिळाली तर त्याची वृद्धी करता येईल या विचाराने नंदकिशोर यांनी संदीप व प्रशांत या आपल्या मित्रांना हा विचार बोलून दाखवला. त्यांनीही विचारांती होकार भरला.

त्यातून तिघांनी एकत्र येत २०१७ मध्ये भागीदारीत प्रक्रिया उद्योगाला नवे वळण दिले. कंपनीचे नाव व जागा पूर्वीचीच ठेवण्यात आली. आंबा, लिंबू, कवठ, हळद, कांदा, लसूण, आले, करवंद आवळा आदी मालावर आधारित लोणची आणि चटण्या ही उत्पादने बनवणे सुरू होते.

सन २०२० मध्ये लॉकडाऊन मध्ये निर्बंध लागले. त्यात तिघांना कोरोनाचा संसर्ग झाला. उत्पादनांची निर्मिती तात्पुरती थांबविण्यात आली.

मसाले निर्मितीत पदार्पण

निर्बंध शिथिल झाले. मग पुन्हा उद्योगाचे पुढील नियोजन सुरू झाले. लोणचे आणि चटण्या यांचे उत्पादन काही काळापुरते थांबवून मसाले व निर्जलीकरण केलेल्या पावडरींचे उत्पादन सुरु करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

त्यादृष्टीने ग्राइंडर, सौर ऊर्जेवरील सुकवणी यंत्र, पॅकिंग मशिन आदी सामग्री खरेदी केली. एखाद्या प्रकाराचे व्यावसायिक उत्पादन घेण्यापूर्वी सुरवातीला चाचणी स्वरूपात ते बनवले जायचे.

कुटुंबातील सदस्य व मित्र परिवारांना नमुना देऊन त्याचा ‘फीडबॅक’ घेतला जायचा. त्यातून मग अंतिम ‘फॉर्म्युला’ निश्चित केला जायचा. आज तशीच सर्व उत्पादने तयार झाली आहेत. आजमितीस सुमारे सात ते आठ लाख रूपयांची गुंतवणूक झाली आहे.

Spice Manufacturing Industry
VNMKV, Parbhani : ‘वनामकृवि’त फळे, मसाले प्रक्रिया तंत्रज्ञ कौशल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम

कच्चा मालाची उपलब्धता

जालना, परभणी आदी स्थानिक बाजारपेठेतून बहुतांशी शेतमालाची (कच्चा माल) खरेदी होते. संदीप यांच्या शेतातील हळदही उपलब्ध होते. लाल मिरचीची खरेदी नंदुरबार जिल्ह्यातून तर धने, तेजपान, जिरे, शहाजिरे, लवंग, दालचिनी आदींची खरेदी गुजरातहून होते. खरेदीनंतर निवडणे, वाळवणे, स्वच्छता, भाजणे आदी प्रक्रिया कराव्या लागतात.

वैविध्यपूर्ण मसाले व पावडरी

सूर्यांशु असा ब्रॅण्ड तयार करण्यात आला आहे. त्या अंतर्गत मसाल्याचे २६ प्रकार तयार केले जातात. यात काळा मसाला, कांदा लसूण, गरम, ग्रेव्ही, चाट मसाला, येसर (भाजी घट्ट करण्यासाठी), शेवभाजी, पावभाजी, मटण, चिकन, अंडा करी, बिर्याणी आदी विविध प्रकारांचा समावेश आहे.

यातील १८ प्रकार बॉक्स पॅकिंग तर काही जार पॅकिंगमध्ये उपलब्ध केले आहेत. पावडरींमध्ये कांदा, लसूण, आले, आमचूर, टोमॅटो. चिंच, पुदिना असे सुमारे सात विविध प्रकार बनवले जातात. ५० ग्रॅमच्या जार पॅकिंगमधून त्या उपलब्ध केल्या आहेत.

विक्री व्यवस्था

परभणी, हिंगोली, ठाणे, पुणे, सातारा आदी जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांकडून सुर्यांशु ब्रॅण्ड मसाल्यांना मागणी असते. परभणी येथील कृषी प्रदर्शनातही उत्पादने सादर केली जातात. चोखंदळ ग्राहकांना घरपोच सेवा दिली जाते. आजमितीला १०० ते १२५ रिटेलर्स तर तीन वितरक नेमले आहेत.

ऑनलाइन क्षेत्रातील काही कंपन्यांमार्फतही विक्रीला हातभार लागतो आहे. उत्पादनांसोबत माहिती पत्रक देत नवे ग्राहक जोडले जातात. महिन्याला ७० ते ८० हजार रुपयांची विक्री तर वर्षाला सुमारे १५ लाख रुपयांची उलाढाल करण्यापर्यंत या कंपनीने मजल मारली आहे.

तिघांचीही उद्योगात समान भागीदारी असून आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. उत्पादन विभाग संदीप, नवी उत्पादन निर्मिती नंदकिशोर तर मार्केटिंग त्यांच्यासह प्रशांतही सांभाळतात. उद्योगात या तिघांव्यतिरिक्त दोन जणांना उत्पादन विभागात तर एकाला विक्री विभागात रोजगार मिळाला आहे. गरजेनुसार हंगामी मजुरांची गरज भासते.

नंदकिशोर भारती- ९५८८४६३४४०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com