Soil Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Conservation : मृदा संवर्धन ही काळाची गरज...

Team Agrowon

डॉ. रवींद्र जाधव, डॉ. रमेश चौधरी

Soil Fertility : नैसर्गिक साधनसंपत्तीच्या व्यवस्थापनामध्ये मातीला संधारणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. मृदा आणि जलसंधारणामध्ये माती आणि पाण्याला विशेष प्राधान्य दिले जाते. दरवर्षी जलचक्रामुळे कमी-जास्त प्रमाणात तरी पाऊस पडतो, मात्र मृदा निर्मितीची प्रक्रिया ही त्या तुलनेत प्रदीर्घ काळाची आहे.

निसर्गात हवा, पाणी, सूर्याची उष्णता व इतर भौतिक आणि रासायनिक कारकांमुळे खडकांची झीज होते आणि खडकांचा चुरा तयार होतो. कालांतराने त्यामध्ये विविध जैविक घटक मिसळतात आणि त्याचे मातीमध्ये रूपांतर होते. अशा प्रकारे एक इंच मातीचा थर तयार होण्यासाठी साधारणत: ८००-१००० वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे मातीचे संवर्धन ही काळाची गरज बनली आहे.

मातीची धूप आणि त्याचे होणारे दुष्परिणाम

शेतीच्या दृष्टीने विचार केला असता, मातीचा वरचा फक्त चार इंचांचा थर शेतीसाठी उपयुक्त असतो. कारण याच थरामध्ये पिकांच्या वाढीसाठी लागणारी सर्व पोषकद्रव्ये उपलब्ध असतात. जर मातीच्या संवर्धनाच्या उपाययोजना केल्या नाहीत तर पाण्यासोबत पिकांना आवश्यक असणारी पोषकद्रव्येसुद्धा वाहून जातात.

परिणामी, जमिनीची सुपीकता कमी होते. पीक उत्पादनात मोठी घट होते. शेतकऱ्याला रासायनिक खते इ. बाह्य साधनांचा आधार घ्यावा लागतो. काही ठिकाणी मातीचा थर हा मर्यादित असतो. अशा ठिकाणी मातीची धूप झाल्यास हळूहळू मातीचा संपूर्ण थरच वाहून जातो.

खडक उघडा पडतो. अशा ठिकाणी भविष्यात पुन्हा शेती करणे अशक्य होऊन बसते. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मृदा संधारणेची कामे करणे आवश्यक असते. ती झालेली नसल्यास पाण्याच्या प्रवाहासोबत मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येऊन धरणात साठतो. परिणामी, धरणाची पाणी साठवणुकीची क्षमता मोठ्या प्रमाणात घटलेली आहे.

म्हणजेच सुपीक मातीचा थर सांभाळण्याची आवश्यकता वेळीच जाणून न घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम आपल्याला नजीकच्या काळात भोगावे लागतील. यामुळे मृदा संधारण गरजेचे बनले आहे.

उत्पादनासोबतच जमिनीचा पोत टिकवणे महत्त्वाचे...

जमीन, जमिनीची उत्पादन क्षमता ही निसर्गाची देणगी आहे. जमिनीचे गुणधर्म आणि उत्पादन क्षमता टिकवणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे. म्हणून वातावरण, जमीन आणि पाणी या तीनही घटकांना हानी करणारी किंवा निसर्गाचा समतोल बिघडवणारी कोणतीही शेतीची मशागत शेतकऱ्यांनी टाळली पाहिजे. मानवास आवश्यक असणाऱ्या मूलभूत गरजा डोळ्यासमोर ठेवून नियोजन केले जाते.

भारतातही सर्वाधिक लोकसंख्येचा भार असल्यामुळे पोसण्यासाठी शेती उत्पादनाला सर्वाधिक महत्त्व द्यावे लागते. लागवडीखालील क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता फारच कमी आहे. अशा स्थितीमध्ये शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली.

त्यात अधिक उत्पादन देणारे वाण, रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके इ.चा वापर केल्यामुळे आपण अन्नधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण झालो. स्वातंत्र्यानंतर हरितक्रांती घडवून आपल्या देशाने शेती व्यवसायातील क्षमता सिद्ध केली आहे. मात्र पिकांचे उत्पादन वाढविताना जमिनीचा पोत, सुपीकता राखण्यात कमतरता राहिल्याचे गेल्या काही वर्षांतील अभ्यासातून पुढे येत आहे.

जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि आवश्यक जिवाणू यांचे प्रमाण कमी होत गेले. त्याचा फटका जमिनीच्या आरोग्य बिघडण्याच्या स्वरूपात बसत आहे. शेतीचे क्षेत्र आणि त्यामुळे जनावरांची संख्या कमी झाल्यामुळे शेणखत आणि सेंद्रिय खतांची पूर्तता करण्यात अडचणी येत आहे. सातत्याने आणि सलग पिके घेतली जात असल्यामुळे जमिनीवरील ताण वाढत आहे. या सर्व घटकांचा परिणाम जमिनीच्या आरोग्यावर होत आहे. जमिनी नापीक होत आहेत.

संतुलित वापर

पीक उत्पादनातील सर्वांत महत्त्वाचा प्राथमिक घटक म्हणजे माती आहे. याच मातीमध्ये पुरातन काळापासून शेतकरी विविध पिके घेत आला आहे. मात्र पूर्वी सेंद्रिय खते अधिक प्रमाणात दिले जात. त्याचा फायदा जमिनीचा पोत टिकण्यास आपोआप होत असे.

मात्र कमी होत असलेल्या जमीनधारणेमध्ये शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होण्यासाठी आणि एकूणच अन्नधान्याची वाढती गरज भागविण्यासाठी अधिक उत्पादन मिळविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत गेला. त्यात अधिक उत्पादनक्षम अशा संकरित वाणांचा वापर वाढत गेला. सिंचनाच्या विविध सोयी उपलब्ध झाल्या.

आज बहुतांश शेतकरी सर्व हंगामात पिके घेण्याचा प्रयत्न करतात. त्यातही बागायती क्षेत्रात तिन्ही हंगामांत पिके घेताना आंतरपिके, दुबारपिके, इ. पीक पद्धतीसोबतच पीक घनता वाढली. या पिकांची वाढत्या अन्नद्रव्यांची मागणी पुरविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. मात्र त्यातही संतुलित खत वापराकडे लक्ष देण्याची आवश्यकता असताना शेतकरी उपलब्ध असलेल्या काही ठरावीक खतांना (केवळ नत्र, स्फुरद आणि पालाश) प्राधान्य देताना दिसतात.

खरेतर पुरेशा प्रमाणात सेंद्रिय खतांची पूर्तता करतानाच दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये. एकात्मिक खत व्यवस्थापनातूनच जमिनीची सुपीकता आणि पिकांची उत्पादकता जपणे शक्य होणार आहे. ज्या ठिकाणी सिंचनाची उपलब्धता आहे, तिथे पाण्याचा असंतुलित व बेसुमार वापर यामुळेही जमिनीवर विपरीत परिणाम होत आहे. अशा अनेक कारणांमुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक अशा नैसर्गिक गुणधर्माची हानी झालेली दिसते.

...अशा प्रकारे होऊ शकते मृद्संधारण

 शेतातील मातीचे परीक्षण करणे व माती परीक्षण अहवालानुसार खतांची मात्रा देणे.

 रासायनिक खतांचा असंतुलित वापर टाळणे.

 शेणखत, कंपोस्ट खताचा पुरेपूर वापर करणे.

 जिवाणू खतांसारख्या नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापरावर भर देणे.

 ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर करणे.

 पिकांच्या शास्त्रीय पद्धतीने फेरपालट करणे.

 पिकांच्या शेतातील तणे, शिल्लक अवशेष योग्य प्रकारे कुजवून वापर करणे.

 तणांचा वाढणारा प्रादुर्भाव टाळणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

UPSC Success Story : देवडीच्या अश्पाक मुलाणीचे ‘युपीएससी’मध्ये यश

Water Pollution : पुणे परिसरातील प्रदूषित पाणी थेट उजनी धरणात

Rabi Season 2024 : रब्बी हंगामासाठी ४५ हजारांवर क्विंटल बियाण्यांची मागणी

Ujani Dam : दीड महिन्यात उजनीतून सोडले १०० टीएमसी पाणी

Kandalwan : अतिसंवेदनशील कांदळवनांवर सीसीटीव्हीचा वॉच

SCROLL FOR NEXT