Soil Health : पाणथळ, क्षारपड जमिनीवरील उपाययोजना, शिफारशी

Mahatma Phule Krishi Vidyapeeth Research : महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत करण्यात आलेल्या संशोधनातून मिळालेल्या पाणथळ व क्षारपड जमिनीच्या गंभीर समस्येवर उपाययोजनेसंदर्भातील शिफारशी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत. या लेखामध्ये त्यांची माहिती घेऊ.
Wetlands and Saline Soils
Wetlands and Saline SoilsAgrowon
Published on
Updated on

डॉ. श्रीमंत राठोड

Problem of Wetlands and Saline Soils : क्षारयुक्त-चोपण जमिनीत निलगिरी, सुबाभूळ, सुरू आणि रामकाठी बाभूळ या झाडांची चांगली वाढ होते. परंतु आवळा, चिंच, बोर, शेवगा, लिंब आणि करंज या झाडांची वाढ होत नाही.क्षारयुक्त चोपण आणि दलदलीच्या जमिनीत करनाल गवताची वाढ चांगली होते. करनाल गवताला प्रति हेक्टरी २५ किलो नत्र आणि उन्हाळ्यात पाणी देणे आवश्यक आहे.

भारी काळ्या क्षारयुक्त-चोपण जमिनीची सुधारणा करण्यासाठी सच्छिद्र पाइप भूमिगत निचरा प्रणाली (१.२५ मीटर खोली, २ पाइपमधील अंतर २५ मीटर) आणि जिप्सम आवश्यकतेनुसार (५० टक्के) व हिरवळीचे पीक धैंचा यांचा एकात्मिक वापर फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे. (२००५-०६).

कमी निचरा होणाऱ्या भारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी, तसेच पिकांचे अधिक उत्पादन घेण्यासाठी मोल निचरा प्रणालीचा अवलंब करावा. दोन मोल मधील अंतर ४ मीटर व खोली ०.६० मीटर ठेवण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. (२०११-१२).

पाणथळ भारी काळ्या जमिनीच्या योग्य निचऱ्यासाठी, आणि उसाचे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर उत्पादन घेण्यासाठी व जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी भूमिगत निचरा पद्धतीत दोन सच्छिद्र निचरा पाइपमधील अंतर ४० मीटर आणि खोली १.२५ मीटर ठेवण्याची शिफारस करण्यात आलेली आहे (२०१८-१९).

Wetlands and Saline Soils
Banana Cultivation : पावसाने केळी लागवड रखडली

कमी खर्चाचे मोल निचरा तंत्रज्ञान हे लहान व सिमांत शेतकऱ्यांच्या क्षारपड-पाणथळ आणि कमी निचरा क्षमता असणाऱ्या भारी काळ्या जमिनीसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. म्हणून या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार होण्याकरिता (गटचर्चा, शेतकरी मेळावे इ.) कृषी विभाग, महाराष्ट्र शासन आणि कृषी विज्ञान केंद्र यांनी कृषी विद्यापीठांच्या साह्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

या तंत्रज्ञानाचे बळकटीकरण आणि प्रसाराकरिता कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फंत ६५ पेक्षा अधिक अश्‍वशक्तीचा ट्रॅक्टर व मोल नांगर सानुकुल भाड्याने उपलब्ध करावा. किंवा त्यासाठी बँकेद्वारे पीक कर्जाप्रमाणे ४ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करणे आवश्यक आहे. हे तंत्रज्ञान प्रभावी होण्याकरिता साखर कारखान्यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये निचरा चर काढणे आवश्यक आहे. (२०१९-२०).

मध्यम ते भारी काळ्या पाणथळ क्षारयुक्त-चोपण जमीन सुधारण्यासाठी भूमिगत निचरा प्रणाली तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि सामाजिकदृष्ट्या स्वीकार्य असल्याचे दिसून आले असले तरी, हिरवळीच्या खतांचा तसेच जिप्समच्या वापराबद्दलचे शेतकऱ्यांचे अवलंबन कमी आढळून आले आहे.

याशिवाय जमीन सुधारणेनंतर घेतलेल्या निरीक्षणामध्ये १० ते १५ मीटर, १६ ते २० मीटर व २१ ते ३० मीटर या तिन्ही अंतरावरील निचरा पाइपमधील ऊस पिकाचे उत्पादन व नफा-खर्च गुणोत्तरामध्ये लक्षणीय फरक दिसून येत नाही. त्यामुळे मध्यम ते भारी काळ्या पाणथळ, क्षारयुक्त- चोपण जमिनी सुधारण्यासाठी शेतकऱ्यांद्वारे कमी अंतरावर निचरा पाइप बसवून खर्चात वाढ आणि अतिरिक्त निचरा टाळण्यासाठी २१ ते ३० मीटर अंतरावर निचरा पाइप टाकण्याचे तंत्र अवलंबण्याची शिफारस करण्यात येते.

त्यानंतर हिरवळीची खते, जिप्सम (५ टन प्रति हेक्टर) यांच्या वापरासाठी विस्तार यंत्रणांनी (कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विद्यापीठे व कृषी विभाग) गट चर्चा व परिणाम प्रात्यक्षिके यांचे आयोजन करावे. त्याद्वारे शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. (२०२०-२१).

महाराष्ट्राच्या बागायती भागातील भारी काळ्या क्षारपड व पाणथळ जमिनींची सुधारणा झाल्यानंतर, निचरा पद्धतीतून उन्हाळ्यामध्ये पाण्याचा निचरा होऊन मातीतील ओलावा कमी होऊ शकतो. त्यामुळे ऊस पिकावर निर्माण होणारा ताण टाळून किफायतशीर उत्पादन घेण्यासाठी भूमिगत निचरा पद्धतीचे आउटलेट उन्हाळी हंगामात (१५ फेब्रुवारी ते १५ जून) बंद करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. (२०२१-२२).

Wetlands and Saline Soils
Vijay Wadettiwar : संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिएकरी २५ हजार रुपये द्या ; विजय वड्डेटीवर यांची मागणी

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या भूमिगत निचरा तंत्रज्ञानाचा क्षारपड जमीन सुधारण्यासाठी अवलंब केल्याने, आडसाली ऊस पिकाच्या प्रति हेक्टरी उत्पादनात ६८.८३ टक्क्यांची वाढ दिसून आली, तर प्रति क्विंटल उत्पादन खर्चात २१.५२ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे, क्षारपड जमीन सुधारण्यासाठी भूमिगत निचरा तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा, अशी शिफारस करण्यात आलेली आहे. (२०२१-२२).

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमधील शेतकरी निचरा तंत्रज्ञानाचा वापर स्वखर्चाने करत आहे. भूमिगत निचरा पद्धत अवलंबलेल्या साधारणत: १०० शेतकऱ्यांची उसाची सरासरी उत्पादकता ५१.७५ टन/हेक्टर वरून १३६.५१ टन/हेक्टर इतकी वाढल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे भूमिगत सच्छिद्र पाइप निचरा पद्धत हे तंत्रज्ञान आर्थिकदृष्ट्या अतिशय फायदेशीर असल्याचे संशोधनांती दिसून आले आहे. तसेच मोल निचरा प्रणाली राबविलेल्या १५० शेतकऱ्यांची सरासरी उत्पादकता १०५.३८ टन/हेक्टर वरून १४२.६५ टन/हेक्टर इतकी वाढलेली दिसून आली. त्यामुळे क्षारपड-पाणथळ जमिनीची समस्या भेडसावणाऱ्या शेतकऱ्यांनी वरील तंत्रज्ञानांचा अवलंब करून आपली जमीन सुधारून घेतल्यास उत्पादन वाढ मिळू शकेल.

- डॉ. श्रीमंत राठोड, ९८५०२३६१०३, (सहायक प्राध्यापक, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी, कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com