वंदना टेकाळे Agrowon
ॲग्रो विशेष

Women Empowerment : अल्पभूधारक महिला झाली शून्यातून प्रक्रिया उद्योजक

Success Story of Women : केवळ दोन एकर शेती असलेल्या वंदना टेकाळे (रा. रुईखेड टेकाळे, जि. बुलडाणा) यांनी परिस्थितीवर रडत न बसता अन्नप्रक्रिया उद्योगाचा मार्ग धरला.

 गोपाल हागे

गोपाल हागे

रुईखेड हे बुलडाणा शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवरील गाव आहे. येथील बबन आणि वंदना या टेकाळे दांपत्याची केवळ दोन एकर शेती आहे. सोयाबीन, तूर, काबुली हरभरा अशी पीकपद्धती आहे. केवळ शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नव्हता. ‘उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी’ अशी म्हण प्रचलित आहे.

सामान्य कुटुंबातून आलेल्या वंदना यांनी अन्नप्रक्रिया क्षेत्राचा मार्ग धरत ही म्हण आचरणात आणली. छोट्या- छोट्या कामांतूनही पैसा उभा करता येतो हे जाणून लघू उद्योगांवर भर दिला. गावातील महिलांना एकत्र करून अंबिकामाता बचत गट स्थापन केला. कृषीसखी म्हणूनही वंदना कार्यरत आहेत.

उद्योगातील प्रयत्न

शेतीला उत्पन्नाचे स्रोत जोडताना २०१८ पासून गांडूळ खत, दशपर्णी अर्क, व्हर्मिवॉश, जीवामृत तयार करून विक्री सुरू केली. मागील वर्षी त्यातून एक लाख रुपयांची कमाई केली. या वर्षी ३० हजार रुपयांचे गांडूळ कल्चर विकले. नवे काही शोधण्याची व धडपड सुरू ठेवण्याची वृत्ती यातून चार वर्षांपूर्वी मिनी डाळ मिलही सुरू केली.

त्यातून तूर, मूग, उडीद, हरभरा अशा डाळी किलोला दीड रुपये एवढ्या माफक दरात तयार करून देण्यास सुरुवात झाली. एक पाऊल अजून पुढे टाकताना घरगुती मसाले, पापड, साबण आदींची निर्मिती सुरू केली. आज मसाले, हळद व मिरची पावडर आणि धणे पावडर ही त्यांची मुख्य उत्पादने आहेत.

वर्षाला ४० ते ५० किलो मसाल्याची प्रति किलो ४०० रुपये दराने, तर दर्जेदार लाल मिरची पावडरीची ३०० रुपये प्रति किलो दराने विक्री होते. हंगामात आंब्याचे ४० ते ५० किलो, तर लिंबाचे ७० ते ८० किलो लोणचे तयार करतात. मिरची, मेथी, ओल्या हळदीचेही लोणचे बनवून व्यवस्थित पॅकिंगद्वारे त्यास बाजारपेठ देण्यास सुरुवात केली आहे.

निर्जलीकरण केलेली उत्पादने

ज्या वेळी भाज्यांचे दर घसरतात त्या वेळी शेतकऱ्यांना आर्थिक फटका ठरलेलाच असतो. अशा वेळी पालेभाज्यांवर निर्जलीकरणाची प्रक्रिया (डीहायड्रेशन) केल्यास त्याचे मूल्यवर्धन होऊन चांगला नफा मिळू शकतो हे वंदना यांनी जाणले. त्यानुसार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, बुलडाणा येथील कृषी विज्ञान केंद्र व अमरावती येथे अन्न प्रक्रियेचे प्रशिक्षण त्यांनी घेतले.

वाळवणीचे, काप करण्याचे यंत्र, ग्राइंडर आदी यंत्रसामग्रीसाठी पाच लाखांची गुंतवणूक होती. यामध्ये पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून भाजीपाला ‘डीहायड्रेशन युनिट’ उभारणीसाठी एक लाख ८० हजारांचे अनुदान मिळाले.

त्यातून उद्योग पुढे नेणे शक्य झाले. त्यातून कारले, बीटरूट, भोपळा, कोथिंबीर, टोमॅटो, कढीपत्ता आदींचे ‘डीहायड्रेशन’ आज केले जाते. पाव, अर्धा किलो व एक किलो वजनी पॅकिंगमधून या प्रक्रियायुक्त भाज्या बाजारात सादर केल्या आहेत.

तयार केली बाजारपेठ

पदार्थांचा दर्जा उत्तम ठेवल्याने ग्राहकांची पसंती मिळवण्यात वंदना यांना यश आले. बुलडाणा शहरातील गृहिणी, विविध शासकीय व अन्य संस्थांमध्ये उत्पादनांची विक्री होत आहे. मुंबई येथील प्रसिद्ध महालक्ष्मी सरस किंवा अन्य प्रदर्शनांमधून वंदना सहभागी होतात. सर्व उत्पादनांची महिन्याची उलाढाल एक लाख रुपयांच्या पुढे पोहोचली आहे.

शिवाय चार महिलांना त्यांनी या उद्योगाद्वारे रोजगारही दिला आहे. प्रक्रिया उद्योगाची व्याप्ती वाढल्याने वेळेअभावी गांडूळ खताचे उत्पादन थोडे कमी केले आहे. उद्योगाचा कारभार सांभाळून वंदना पतीला शेतीतही मदत करतात. तर पती देखील वंदना यांना उद्योगात सहकार्य करतात.

शून्यातून प्रगती

शेती थोडी असली तरी रडत न बसता प्रक्रिया उद्योगाद्वारे शून्यातून प्रगती साधल्याचा आनंद टेकाळे दांपत्याला आहे. वंदना सांगतात की छोट्या घरातून चांगल्या घरात गेलो आहे. मुलीच्या लग्नासाठी घेतलेले पाच लाखांचे कर्ज फेडले. अर्ध्या गुंठ्यात प्लॉट घेतला. तीन म्हशी व दोन गायी असे पशुधन आहे. एकेकाळी दुसऱ्यांच्या शेतात मजुरीला जायचो. आता उद्योजक झालो असून समाजात वेगळी ओळख व प्रतिष्ठा तयार झाली आहे.

आमच्या केंद्रात वंदना यांनी दोन वेळा प्रक्रिया, मूल्यवर्धनातील तसेच गृहोपयोगी साबण, तेल, शाम्पू निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. ‘सोलर टनेल ड्रायर’चे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आम्ही त्यांच्याकडे घेतले. प्रशिक्षणाच्या बळावर त्यांनी स्वयंरोजगार उभा केला. प्रतिकूल परिस्थितीतून महिलांपुढे त्यांनी उद्यमशीलतेचा आदर्श तयार केला आहे.

डॉ. अनिल तारू, वरिष्ठ शास्त्रज्ञ, प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा

वंदना टेकाळे ९०६७४७८९५२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT