Women Agriculture : नागपूर जिल्ह्यात भागेमाहारी (ता. पारशिवणी) येथील ज्योती भोंडेकर यांचे याच गावापासून सात किलोमीटरवरील नवेगाव खैरी येथे माहेर आहे. त्यांचे वडील वाहनांच्या टायरचे पंक्चर काढण्याचे काम करायचे. भाडेतत्त्वावर शेती घेऊन ती कसायचे देखील. लहानपणापासूनच ज्योती यांना घरातील संघर्षमय वातावरणाची सवय झाली होती.
कष्टांची जाण होती. सन १९९८ मध्ये प्रेम भोंडेकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पतीच्या खांद्याला खांदा लावत त्यांनी सासरची शेती पाहण्यास सुरुवात केली. सामाजिक कार्याची आवड असल्याने महिला समूह बांधणीच्या कामात स्वतःला झोकून दिले. या दांपत्याच्या कार्याची दखल घेत २००३ मध्ये पती प्रेम यांना गावचे सरपंच होण्याचा मान मिळाला.
महिलांना मिळाले उद्योगाचे बळ
भागेमाहारी हे जेमतेम लोकवस्तीचे गाव. आज याच गावात ज्योती महाराष्ट्र राज्य जीवन्नोती अभियान प्रभाग व ग्राम संघाच्या सचिव आहेत. त्या माध्यमातून महिलांचे समूह तयार करून त्यांना उद्योगाचे बळ त्या देतात. गावात २५ तर पेंढरी गावात त्यांच्या माध्यमातून आठ समूहांची बांधणी झाली आहे.
गावस्तरावरच उद्योगांची उभारणी व रोजगार निर्मितीचा उद्देश साधला जावा यासाठी ज्योती यांचा प्रयत्न असतो. त्यातूनच नवप्रभात, श्री साई, श्री गणेश या समूहांतील महिलांनी दुधाळ जनावरांची खरेदी करीत दुग्ध व्यवसाय उभारला आहे. प्रति दिन १०० ते १२५ लिटर दूधसंकलन त्या माध्यमातून होते.
खासगी व्यवसायिकांच्या माध्यमातून दुधाची उचल होते. श्री गणेश महिला स्वयंसाह्यता समूहाने कांडप यंत्र खरेदी करून व्यवसायाला सुरुवात केली आहे. बेसन, मिरची पावडर, हळद, मसाले यांसारख्या उत्पादनांची विक्री, ब्रॅण्डिंग हा समूह करतो. कृष्णाई समूहाद्वारे मिरची, मसाले पावडरची विक्री होते. काही महिला वड्या, पापड, शेवया आदींचे उत्पादन घेतात.
‘उमेद’अंतर्गत प्रदर्शने, मेळावे यांच्या माध्यमातून महिला उद्योग समूहांद्वारे उत्पादित वस्तूंना बाजारपेठ मिळाली आहे. प्रदर्शने नसलेल्या काळात एका ग्रामसंघाद्वारे दुसऱ्या ग्रामसंघाला उत्पादित वस्तूंचा पुरवठा करीत बाजारपेठ कायम ठेवण्याचा प्रयत्न असतो. सुमारे ७० ते ८० हजार रुपयांची वार्षिक उलाढाल या उपक्रमांतून होते.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त कृषी विभागाच्या माध्यमातून ज्वारी, बाजरी, राळा, राजगिरा बियाण्यांचे वाटप करण्यात आले. ज्योती यांच्या माध्यमातून बांधणी झालेल्या ग्रामसंघातील सर्व समूहांना त्याचे वितरण केले गेले. घरच्या शेतीत या बियाण्यांची लागवड करणे त्यांना शक्य होणार आहे.
शेतीचे व्यवस्थापन
भोंडेकर कुटुंबीयांची सहा एकर शेती आहे. त्यात दोडका, चवळी, गवार आदी भाजीपाला पिके, भात, तूर आदी पिके असतात. दोन विहिरी आहेत. बांद्राझरी तलाव शेतालगत आहे. उन्हाळ्यात सिंचनासाठी पाण्याच्या प्रश्न निर्माण व्हायचा. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी तीन शेततळे खोदण्याचा निर्णय घेतला. आज त्याचा उपयोग होण्याबतच मृगल, रोहू, कटला आदी जातींचे मत्स्यपालन देखील करणे शक्य झाले आहे.
कृषी विभागाच्या ७५ हजार रुपयांच्या अनुदानाची मदत मिळाली आहे. भागेमाहारी सोबत लगतच्या गावांतून माशांना मागणी राहते. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत दोन ट्रॅक्टर्स, रोटाव्हेटर, नांगर आदी अवजारांचा लाभ कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत मिळाला आहे. अन्य शेतकऱ्यांनाही भाडेतत्त्वावर अवजारांचा पुरवठा केला जातो. या माध्यमातूनही आर्थिक स्रोत बळकट केले आहेत.
कृषी पर्यटनातून उत्पन्नाचा स्रोत
भोंडेकर यांच्या शेतीपासून पेंच व्याघ्र प्रकल्प सात किलोमीटरवर आहे. ही संधी साधून त्यांनी आपल्या शेतात ब्रांदाझरी कृषी पर्यटन केंद्र विकसित केले आहे. पर्यटकांसाठी पाच खोल्या बांधण्यात आल्या आहेत. शाकाहारी, मांसाहारी जेवणासह येत्या काळात बोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. समूहातील सदस्यांच्या माध्यमातूनच खाणावळ चालविली जाते. त्यामुळे त्यांनाही या उपक्रमाद्वारे रोजगार मिळाला आहे.
येत्या काळात हुरडा पार्टींची संकल्पना राबविण्याचे प्रस्तावित आहे. वर्षभरात एक हजाराहून अधिक पर्यटकांची या ठिकाणी रेलचेल राहते. त्यामुळे कुटुंबासाठी अतिरिक्त व सक्षम उत्पन्नाचा स्रोत ठरला आहे. केंद्राच्या व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी ज्योती स्वतः सांभाळतात. शेतीला दीडशेच्या संख्येत कोंबडीपालनाची जोड दिली आहे. पर्यटक केंद्रात गावरान कोंबडी मटण व अंडी उपलब्ध केली आहेत.
- ज्योती भोंडेकर, ९८२२३८५३२६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.