डॉ. प्रदीप दळवे , डॉ. युवराज बालगुडे, नितीश घोडके
Sitaphal Orchard Management : सीताफळामध्ये मॉन्सूनच्या आगमनाबरोबर नैसर्गिक बहर येतो. परंतु पाण्याची उपलब्धता असल्यास लवकर म्हणजे उन्हाळाच्या सुरुवातीसही बहर धरता येतो. उन्हाळी बहराची फळे जुलै-ऑगस्ट दरम्यान काढणीस तयार होत असल्याने बाजारभाव चांगला मिळून अधिक आर्थिक नफा मिळतो. परंतु यंदा उन्हाळा कडक असल्याने दुष्काळजन्य परिस्थिती होती. पाणी उपलब्धतेची खात्री नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी हा बहर धरणे टाळले आहे.
सध्या राज्यात सर्वच विभागात पूर्वमोसमी पाऊस पडला आहे. पावसामुळे बागांचा ताण तुटला असून नवीन फूट येऊ लागली आहे. त्यामुळे शेतकरी बहर धरण्याच्या तयारीस लागले आहेत. यंदाच्या वर्षी मॉन्सूनचे आगमन वेळेवर होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बहर धरण्याकरिता पोषक वातावरण तयार झाले असून बागायतदारांनी नियमितपणे बहराची तयारी सुरू करावी. सीताफळाच्या अधिक उत्पादनाकरिता बहराचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते.
सध्या राज्यात सर्वच विभागात पूर्वमोसमी पाऊस पडला आहे. पावसामुळे बागांचा ताण तुटला असून नवीन फूट येऊ लागली आहे. त्यामुळे शेतकरी बहर धरण्याच्या तयारीस लागले आहेत. यंदाच्या वर्षी मॉन्सूनचे आगमन वेळेवर होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बहर धरण्याकरिता पोषक वातावरण तयार झाले असून बागायतदारांनी नियमितपणे बहराची तयारी सुरू करावी. सीताफळाच्या अधिक उत्पादनाकरिता बहराचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते.
झाडांची छाटणी
नैसर्गिक बहर धरताना मे महिन्याच्या अखेरीस ते जून महिन्याच्या सुरवातीस पावसाच्या अंदाजानुसार आणि सिंचन सुविधेच्या उपलब्धतेनुसार छाटणीची कामे सुरु करावीत.
अवकाळी पावसामुळे बागांना नवीन फूट येऊन फुलधारणा झाली आहे. बागेची छाटणी करताना उर्वरित फांद्यांवरील फूट काढून टाकावी.
छाटणी करताना जुन्या, वाळलेल्या फांद्या, अनावश्यक आणि दाटी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात.
झाडाची उत्पादकता ही झाडास मिळणारा सूर्यप्रकाश आणि त्याचे झाडामध्ये पसरणे याच्याशी संबंधित असल्याने झाडाचा मध्यभाग मोकळा राहील अशा पद्धतीने छाटणी करावी. झाडास कमी सूर्यप्रकाश मिळाल्यास फळधारणा कमी प्रमाणात होते,.
छाटणीनंतर नवीन फूट फुटण्यापूर्वी झाडांच्या फांद्या आणि खोडावर एक टक्का बोर्डोमिश्रणाची (एक किलो चुना अधिक एक किलो मोरचूद प्रति १०० लिटर पाणी) तातडीने फवारणी करावी.
झाडाची खोडे जमिनीपासून दोन ते अडीच फुटांपर्यंत मोकळी करावीत. खोडावर १० टक्के तीव्रतेची बोर्डोपेस्ट लावावी.
छाटणीमुळे झाडांची नियंत्रित वाढ होते. झाडावर फळांची संख्या मर्यादित राखता येते. फळे आकाराने मोठी होतात, फळांची गुणवत्ता सुधारते.
पाणी व्यवस्थापन
नैसर्गिक बहरात निव्वळ पावसाच्या पाण्यावरसुद्धा चांगले उत्पादन मिळते. मात्र पावसाचा खंड पडल्यास भारी जमिनीत पाच ते सहा व हलक्या जमिनीत तीन ते चार दिवसांनी जमिनीच्या मगदुरानुसार संरक्षित पाणी द्यावे. फळवाढीच्या काळात पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.
ठिबक सिंचनाच्या नळ्या झाडाच्या घेरालागत अंथरून घ्याव्यात.
शिफारशीप्रमाणे खतमात्रा देऊन पाणी सुरु करावे.
ठिबक सिंचनपद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची ५० ते ७० टक्के बचत होते. तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
खत व्यवस्थापन
पूर्ण वाढ झालेल्या बागेत प्रति झाड ३० ते ४० किलो शेणखत किंवा ६ किलो गांडूळखत आणि २५० ग्रॅम नत्र, १२५ ग्रॅम स्फुरद आणि १२५ ग्रॅम पालाश अशी खतमात्रा द्यावी.
नत्राची निम्मी मात्रा तसेच स्फुरद आणि पालाश खताची संपूर्ण मात्रा पहिले पाणी देताना द्यावी. नत्राची उर्वरित मात्रा त्यानंतर ३० दिवसांच्या अंतरानेद्यावी.
बहर धरताना घ्यावयाची काळजी
बहर धरण्यापूर्वी बागेची स्वच्छता करावी. बागेत पडलेली पाने,फळे, झाडावर लटकलेली काळी व रोगट फळे गोळा करून खड्ड्यामध्ये पुरून टाकावीत. छाटणीनंतर बागेची आडवी उभी हलकी मशागत करून घ्यावी. बागेत तणांचा प्रादुर्भाव कमी करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि पाण्याची बचत करण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. यासाठी प्लॅस्टिक आच्छादन किंवा पालापाचोळा, उसाचे पाचट, वाळलेले गवत, लाकडाचा भुसा इत्यादीचा वापर करावा.
डॉ. प्रदीप दळवे, ८९८३३१०१८५ (अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके (अंजीर आणि सीताफळ) संशोधन प्रकल्प, जाधववाडी, ता. पुरंदर जि. पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.