Sitaphal Orchard Success Story : कमी पाण्यातील सीताफळाचा नवले कुटुंबीयांना आधार

Sitafal Farming : मालदाड (ता. संगमनेर) येथील नवले कुटुंबीयांनी माळरान, हलक्या प्रतीच्या जमिनीवर अत्यंत कमी पाण्यात निर्यातक्षम सीताफळ बाग वाढविली आहे. उत्तम फळबाग व्यवस्थापनातून नावलौकिक मिळविला आहे.
Sitaphal Orchard
Sitaphal OrchardAgrowon

Sitafal Management : संगमनेरच्या उत्तर भागातील मालदाड येथील विठ्ठलराव दादा नवले व सीताराम दादा नवले हे दोघे भाऊ. वडिलोपार्जित ३८ एकर शेती. या मुळातच पाण्याची कमतरता असल्याने वीस वर्षांपूर्वीपासून टप्प्याटप्प्याने शेती फळबागेकडे वळवली. माळरानात सुधारणा करत कमी पाण्यावर येणाऱ्या सीताफळ, डाळिंब, चिकू, आंबा अशी फळबाग लागवड केली. त्यांच्याकडे सध्या २० एकर सीताफळ, ४ एकर डाळिंब, एक एकर केसर आंबा, वीस गुंठ्यांवर चिकू आहे.

दोन वर्षी या दोघा भावांचे कुटुंब वेगळे झाले असले कुटुंबातील बंधुत्व लोपले नाही. शेती व्यवस्थापनासह अन्य बाबीत ते एकमेकांना मदत करतात. प्रशांत सीताराम नवले ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंटचे, तर अनिल विठ्ठलराव नवले दहावीचे शिक्षण घेतले असून, प्रत्येकी २२ एकर शेतीचे व्यवस्थापन पाहतात. शेतीला पूरक उत्पन्न म्हणून दूध व्यवसायही करतात. त्यामुळे फळ पिकांना शेणखत उपलब्ध होत आहे.

व्यवस्थापन व विक्री

नवले कुटुंबांनी आधी आवळा, नंतर डाळिंबाचे उत्पादन घेतले. आवळा, डाळिंब काढून आठ वर्षांपूर्वी २१ एकर सीताफळाची लागवड केली. सामान्यतः सीताफळाची लागवड १२ बाय ९ फुटावर केली जाते. मात्र त्यांनी सीताफळाची लागवड एक एकरात ६ बाय १२ फूट, दोन एकरांत ७ बाय १४ फूट, पंधरा एकरांवर १३ बाय ९ फूट व तीन एकरांवर ५ बाय १३ फुटांवर केली आहे.

डाळिंबाची नव्याने लागवड चार एकरांवर १४ बाय ९ फुटांवर केली आहे.
सीताफळ लागवडीआधी त्यांच्याकडे डाळिंब होते. डाळिंबातच सीताफळाची आंतरपीक म्हणून लागवड केली होती. सीताफळांत व्यवस्थापन करताना साधारणपणे जून महिन्यात छाटणी करतात. गेल्या वर्षी मात्र २२ एप्रिलला छाटणी केली. त्यानंतर प्रति झाडाला वीस किलो शेणखताची मात्रा दिली.

Sitaphal Orchard
Sitaphal Fruit Crop Insurance : पेरु, सीताफळ फळपिकांसाठी विमा योजना

गेल्या आठ वर्षांपासून सीताफळाला केवळ शेणखताचाच वापर करतात. मे महिन्याच्या सुरुवातीला पाणी सोडले. लवकर छाटणी केल्याने फळधारणा लवकर झाली. सीताफळात मिलीबग या किडीचा अधिक प्रादुर्भाव होतो.

पावसाळ्यात अधिक पाऊस असल्यास झाडांना सूर्यप्रकाश कमी मिळतो. अशा वेळी फळांवर बुरशी, काळेडाग पडतात. त्यामुळे फुलोरा काळ, तसेच कळी लागायला सुरुवात झाल्यापासूनच कीटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणीला प्राधान्य दिले.

योग्य व्यवस्थापनातून पूर्वी सीताफळाचे एकरी सरासरी तीन टनांपर्यंत उत्पादन निघत असे. मात्र लागवड पद्धतीत बदल, शेणखताचा वापर, छाटणीच्या वेळेत बदल आणि व्यवस्थापनात वेळेवर फवारणीला प्राधान्य यातून त्यांना एकरी चार ते साडेचार टनांपर्यंत उत्पादन मिळते. फळाचा दर्जा चांगला राहिल्याने प्रति किलो ११५ रुपयांपर्यंत उच्चांकी दर मिळाला. मागील वर्षी सरासरी ७९ रुपये प्रति किलो दर मिळाला होता.

२० एकर सीताफळ बागेतून एकरी चार टनांच्या सरासरी उत्पादन गृहीत धरले, तरी ८० टन उत्पादन मिळते. गेल्या तीन वर्षांतील सरासरी ६० प्रति किलो दराप्रमाणे ४८ लाख रुपये उत्पन्न होते. सीताफळाच्या व्यवस्थापनाचा खर्च फारच कमी आहे. पण डाळिंब बागेतून अद्याप उत्पादन झालेले नाही. मात्र खर्च सुरू आहे.

अलीकडे बागेतच व्यापाऱ्यांना सीताफळाची विक्री करतात. यंदा व्यापाऱ्यामार्फत पाच टन सीताफळ बांगलादेशात निर्यात झाले. अन्य सीताफळे पाटना, गुजरातला पाठवले जातात.

नव्याने लागवड केलेल्या डाळिंबात टोमॅटोचे चार एकरांवर आंतरपीक घेतले जाते. टोमॅटो या आंतरपिकातून खर्च वजा जाता वार्षिक ४ लाखांपर्यंत उत्पन्न हाती येते. त्यातून फळबागेच्या व्यवस्थापनाचा खर्च बऱ्यापैकी निघून जातो.

नवले कुटुंबाकडे शेतीकामासाठी अन्य जिल्ह्यांतील एकूण बारा
मजूर कार्यरत असून, त्यांच्या राहण्याची व्यवस्था केलेली आहे. या व्यतिरिक्त अधिक मजूर लागल्यास स्थानिक मजुरांची मदत घेतली जाते. सर्व मजुरीवर वार्षिक १३ लाखांपर्यंत खर्च होतो.

अर्धा एकर चिकू बागेतून ९०० किलो ते एक टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्याला सरासरी दर २५ रुपये मिळतो.

शेती व्यवस्थापनासाठी ४५ व ५० एचपीचे दोन मोठे ट्रॅक्टर आणि २७ एचपीचा एक छोटा ट्रॅक्टर आहे.

Sitaphal Orchard
Sitaphal Orchard Success Story : निर्यातक्षम सीताफळ बागेची जोपासना

सिंचनासाठी...

नवले कुटुंबीयांनी पंचवीस वर्षांपूर्वीच सिंचनासाठी ठिबकचा अवलंब सुरू केला. त्याच प्रमाणे फळबागेसह अन्य शेतीच्या संरक्षित पाण्याची सोय करण्यासाठी वीस वर्षांपूर्वी एक शेततलाव खोदला होता. १२ वर्षांपूर्वी कृषी विभागाच्या मदतीने प्रत्येकी दोन एकरांवर असे दोन शेततलाव घेतले आहेत.

त्यामुळे त्यांच्या पाणी साठवणीमध्ये साडेचार कोटी लिटरची भर पडली आहे. तळी भरण्यासाठी प्रवरा नदीवरून गटाने आणलेली पाइपलाइन उपयोगी पडते. या सर्व शेततळ्याच्या मदतीनेच उन्हाळ्यातही फळबाग व्यवस्थापन केले जाते.

वेगवेगळे प्रयोग


नवले कुटुंबे अनेक वर्षापासून प्रयोगशील म्हणून परिसरात परिचित आहे. पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने कमी पाण्यावर येणारे फळपीक म्हणून कवठाच्या झाडावर लिंबाचे रोपण करण्याचा प्रयोग केला होता. शिवाय आंब्याच्या दोन झाडांचे एकच खोड तयार केले. त्यामुळे आंब्याच्या उत्पादनात वाढ होत आहे. २५ वर्षांपूर्वी १३ एकरांवर आवळ्याची लागवड केली होती. मात्र बाजारासह अन्य अडचणींमुळे आवळ्याची झाडे २००५-०६ मध्ये काढण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या फळबाग व्यवस्थापन आणि एकूणच प्रयोगशील वृत्तीचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, मंडळ कृषी अधिकारी पंकज कवाड यांनी कौतुक केले आहे. कृषी सहायक आकाश गोरे व वैभव कानवडे यांच्या शेतीसंबंधीचे मार्गदर्शन मिळत असल्याचे प्रशांत सांगतात.

शेडनेटमध्ये काकडी
नवले यांनी कृषी विभागाच्या मदतीने सहा महिन्यापूर्वी दोन एकरांवर शेडनेट उभारले आहे. त्यात दोन महिन्यांपूर्वी काकडीची लागवड केली आहे. गुजरातेत मागणी असलेल्या काकडीचे आतापर्यंत २५ टन उत्पादन मिळाले आहे. अजूनही उत्पादन सुरू आहे. संगमनेरमधील मॉलमध्ये काकडीला उत्तम मागणी असून, त्यांच्या मागणीनुसार काकडीचा पुरवठा करतात. शिवाय पुणे, मुंबई बाजारालाही पाठवतात. काकडीला प्रति किलो १७ ते २५ रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

शेणखतासाठी पशुपालन
नवले कुटुंबीय अनेक वर्षांपासून दूध व्यवसाय करतात. सीताफळांसह अन्य फळबागेला आठ वर्षांपूर्वीपासून शेणखत वापरतात. शेणखताच्या वापरामुळे फळधारणा चांगली होते, टिकवणक्षमता वाढते. यासह उत्पादन वाढीमध्ये फायदा दिसतो. हे लक्षात आल्यानंतर सर्व फळबागांसाठी शेणखताची गरज पडू लागली.

मात्र तेवढी उपलब्धता वेळेवर होत नसल्यामुळे पाच वर्षांपूर्वी स्वतःच पशुपालनात वाढ केली. सध्या त्यांच्याकडे ३० च्या जवळपास एचएफ गाई आहेत. दररोज ७० लिटर दुधाचे संकलन होते. दुधाला दर २८ रुपये प्रति लिटर मिळतो. तसेच वर्षभरात साठ टनांपर्यंत शेणखत उपलब्ध होते. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून उपयोगी ठरत आहे.
अडचणीच्या काळात चाराटंचाई टाळण्यासाठी पाच वर्षांपासून ते मुरघास करतात. यंदाही १२ टन मुरघास करून ठेवला आहे. शिवाय दोन एकर क्षेत्र चाऱ्यासाठी ठेवले असून, त्यात गिन्नी गवत आणि मक्याचे उत्पादन घेतात.

‘ॲग्रोवन’चे मार्गदर्शन
नवले कुटुंबाचे कुटुंबप्रमुख विठ्ठलराव नवले यांनी सांगितले, की आम्ही लहान असताना वडिलांचे छत्र हरवले. वडिलोपार्जित शेतीत राबत माळरानावरील शेतीत टप्प्याटप्प्याने सुधारणा केली. कमी पाणी असल्याने फळबाग लागवडीला प्राधान्य दिले. त्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे ‘ॲग्रोवन’ दैनिक सुरू झाले. त्याचा पहिल्या अंकापासून मी वाचक आहे. शेती, फळबागात सुधारणेमध्ये ॲग्रोवनचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

उत्पन्नाचा विनियोग अशा प्रकारे होतो.
कुटुंबासाठी : ४ लाख रुपये
मुलांच्या शिक्षणासाठी : एक लाख रुपये.
शेतीच्या व्यवस्थापनासाठी : खते, कीडनाशके - ८ लाख रुपये, मजुरी १३ लाख रु.
यंत्राची देखभाल व अन्य खर्च : दीड लाख रुपये.
प्रत्येकाचा विमा काढला असून, त्यांचा हप्ता प्रत्येकी ९४ हजार रुपये.

संपर्क : प्रशांत सीताराम नवले : ९६६५४२४६२१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com