Vermicompost Production : तंत्र गांडूळखत निर्मितीचे...

शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जातो. त्यामुळे जमिनीची आरोग्य धोक्यात येत आहे. जमिनीचे आरोग्य चांगले राखण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रीय खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे.
Vermycompost Production
Vermycompost ProductionAgrowon
Published on
Updated on

टी. एस. शिंदे

VermyCompost Production Techniques शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) वापर केला जातो. त्यामुळे जमिनीची आरोग्य धोक्यात येत आहे. जमिनीचे आरोग्य चांगले राखण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रीय खतांचा (Organic Fertilizer)वापर वाढविणे आवश्यक आहे.

सेंद्रिय खतांपैकी एक उपयुक्त खत म्हणून ‘गांडूळखत’ ओळखले जाते. रासायनिक खतांना गांडूळखत हा उत्तम पर्याय आहे. सेंद्रीय पदार्थांच्या वेगवान विघटनामध्ये गांडूळे (Worm) अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. गांडूळखताच्या वापरामुळे जमिनीचा पृष्ठभाग सुपीक बनतो.

गांडूळे काही झाडांची पाने विशेष आवडीने खातात. पानांचा आकार आणि त्यातील रासायनिक घटक ह्याप्रमाणे त्यांची पसंती असते. आंबा, भात, पेरु काजू, निलगिरी इत्यादी वनस्पतींची पाने गांडुळे आवडीने खातात. गांडूळे कुजलेले सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळण्याची महत्त्वाची कामे करतात.

गांडुळांचे प्रकार ः

१) एण्डोजिक (Endogenic) ः

ही गांडुळे जमिनीत ३ मीटर किंवा त्याहून अधिक खोलीपर्यंत राहतात. त्यांचा आकार लांब आणि रंगाला फिक्कट असतात. ते बहुधा माती खातात. प्रजननाचा दर अतिशय कमी असतो.

२) एपिजिक (Epigic) ः

ही गांडूळे जमिनीच्या पृष्ठभागालगतच राहतात. त्यांचा आकार लहान असतो. एकूण अन्नापैकी ८० टक्के सेंद्रीय पदार्थ तर २० टक्के भाग माती व इतर पदार्थ खातात. त्यांचा प्रजननाचा दर अधिक असतो.

Vermycompost Production
Maize Composting : मका खरच खादाड पीक आहे का?

३) ॲनेसिक (Anasenic) ः

ही गांडुळे साधारणत: जमिनीत एक मीटर खोलीपर्यंत राहतात. ते सेंद्रिय पदार्थ आणि माती खातात. त्यांचा आकार मध्यम असतो.

महत्त्वाच्या प्रजाती ः

गांडूळाच्या ३०० पेक्षा जास्त जाती आहेत. त्यापैकी आयसेनिक फेटीडा, युड्रीलस युजेनिया, पेरीनोक्सी एक्झोव्हेट्‌स (Perionyx excavatus), फेरीटीमा इलोंगेटा या जाती गांडूळांच्या महत्त्वाच्या जाती आहेत.

यापैकी आयसेनिक फेटीडा या जातीचे गांडूळ हे खत निर्मितीसाठी वापरले जातात. गांडूळखत निर्मितीची प्रक्रिया साधारणपणे ४० ते ४५ दिवसांमध्ये पूर्ण होते.

Vermycompost Production
Compost : कंपोस्ट बदनाम का झाले ?

शेडची बांधणी ः

गांडूळखत तयार करण्याची पद्धती ः

- गांडूळ खत हे ढीग आणि खड्डा पद्धतींने तयार करता येते. मात्र दोन्ही पद्धतींमध्ये कृत्रिम सावलीची गरज आहे. यामध्ये शेड तयार करून सूर्यप्रकाश व पावसापासून त्यांचे संरक्षण केले जाते.

- शेडची लांबी २ ढिगांसाठी साधारण ४.२५ मीटर तर ४ ढिगांसाठी ७.५ मीटर इतकी असावी.

- शेडवरील निवारा हा दोन्ही बाजूने उताराचा असावा. बाजूच्या खांबांची उंची १.२५ ते १.५ मीटर तर मधल्या खांबांची उंची २.२५ ते अडीच मीटर इतकी ठेवावी.

- छपरासाठी गवत, नारळाच्या झावळ्या, ज्वारीची ताटे, जाड प्लास्टिक कागद, लोखंडी पत्र्याचा वापर करावा.

१) ढीग पद्धत ः

- या पद्धतीने गांडूळखत तयार करण्यासाठी साधारणतः २.५ ते ३ मीटर लांब व ०.९ मीटर रुंदीचे ढीग तयार करावेत.

- प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी. ढिगाच्या तळाशी नारळाच्या झावळ्या, काथ्या गवत, भाताचे तूस यांसारख्या लवकर न कुजणाऱ्या पदार्थांचा ३ ते ५ सेंमी जाडीचा थर रचावा. या थरावर पुरसे पाणी शिंपडून ओला करावा. त्यावर ३ ते ५ सेंमी जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेण, कंपोस्ट किंवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थरावर पूर्ण वाढलेली गांडूळे हळुवारपणे सोडावीत.

- दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, धान्याचा कोंडा, गवत, गिरिपुष्प, शेवरी यांसारख्या हिरवळीच्या झाडांची पाने, खत, कोंबड्यांची विष्ठा इ. चा वापर करावा.

- या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिकच चांगले असते. संपूर्ण ढिगाची उंची ६० सेंमी पेक्षा जास्त असू नये.

- कुजणाऱ्या पदार्थांमध्ये ४० ते ५० टक्के पाणी असावे. त्यासाठी ढिगावर गोणपाटाचे आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी मारावे. त्यामुळे ओलावा वाढून खत लवकर तयार होण्यास मदत होते.

- ढिगातील सेंद्रिय पदार्थांचे तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान राहील याची काळजी घ्यावी.

२) खड्डा पद्धत ः

- या पद्धतीमध्ये सिमेंटच्या खड्ड्यांची लांबी ३ मीटर, रुंदी २ मीटर आणि खोली ०.६ मी. ठेवावी. खड्ड्यांच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस, गवत टाकावे. त्यावर ३ ते ५ सेंमी जाडीचा अर्धवट कुजलेले शेण, कंपोस्ट खत किंवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा.

- दोन्ही थर पाणी शिंपडून ओले करावेत. त्यावर १०० किलो सेंद्रिय पदार्थांपासून गांडूळ खत तयार करण्यासाठी ७ हजार प्रौढ गांडुळे सोडावीत. त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत जास्त ६० सेंमी जाडीचा थर रचावा. त्यावर गोणपाटाचे आच्छादन देऊन नेहमी ते ओले ठेवावे.

- गांडुळांच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थांमध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा थर घट्ट झाल्यास हाताने सैल करावेत. असे करताना गांडुळे जखमी होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अशाप्रकारे गांडूळ खताचा झालेला शंकू आकाराचा ढीग करावा.

- खत तयार झाल्यावर पाण्याचा वापर बंद करावा. त्यामुळे गांडूळे तळाशी जाऊन बसतील. ढिगातील वरच्या भागाचे खत वेगळे करून सावलीत वाळवून चाळून घ्यावे. चाळल्यानंतर वेगळी झालेली गांडुळे, त्यांची पिल्ले व अंडकोश यांना पुन्हा गांडूळ खत तयार करण्यासाठी वापर करावा.

गांडुळांचे फायदे ः

- गांडूळे सेंद्रीय पदार्थांचे वेगाने विघटन करतात.

- जमिनीची पाणी धरण्याची क्षमता वाढते. धूप कमी होते.

- जमिनीचा पोत सुधारतो

- जमिनीतील जिवाणूंची कार्यक्षमता वाढते.

- गांडूळे सेंद्रीय पदार्थ जमिनीत मिसळतात.

- रासायनिक खतांचा वापर कमी होतो.

- गांडूळे झाडांना जमिनीतील अन्नद्रव्ये व सेंद्रिय पदार्थ उपलब्ध करून देतात.

- टी. एस. शिंदे, ८३७९०८४०७०

(मृदाशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभाग,

डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, आकुर्डी, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com