Pune News : पुणे जिल्हा कुस्तिगीर संघ आणि प्रदीपदादा कंद यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ६६ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कुस्तीच्या पंढरीत गंगावेस तालमीत मेहनत घेणाऱ्या सिकंदर शेखने ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावला.
भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर संघाच्या सहकार्याने फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत शुक्रवारी (ता. ९) संपलेल्या या स्पर्धेत सिकंदर शेखने अवघ्या बावीस सेकंदांत शिवराज राक्षेला झोळी डावावर चितपट केले.
या अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदर शेखचे पारडे निश्चित जड होते. पण शिवराज राक्षे त्याला आव्हान देईल अशी अपेक्षा होती. मात्र वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदर शेखपुढे शिवराज राक्षेचा निभाव लागला नाही.
लढतीला सुरुवात झाल्यावर अवघ्या काही सेकंदात सिकंदर शेखने झोळी डाव घेत शिवराज राक्षेला उचलून खाली घेतले आणि त्याच स्थितीत शिवराज राक्षेला चितपट करून सिकंदरने विजेतेपदाचा मान मिळविला.
माती विभागात झालेल्या अंतिम लढतीत पहिल्या फेरीतच सिकंदर शेखने संदीप मोटेवर सातत्याने ताबा मिळवत सलग दोन गुणांचा सपाटा लावला आणि दहा गुणांची वसुली करत तांत्रिक वर्चस्वावर विजय मिळवून किताबी लढतीत प्रवेश केला होता. गादी विभागात शिवराज राक्षेने कमालीचा चपळपणा दाखवत हर्षद कोकाटेचा तांत्रिक वर्चस्वावर पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, स्वागताध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे सदस्य प्रदीप कंद, कुस्तिगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, विलास कथुरे, योगेश दोडके आदी या वेळी उपस्थित होते. विजेत्या सिकंदरला थार गाडी, गदा असे पारितोषिक देण्यात आले. उपविजेता शिवराज ट्रॅक्टरचा मानकरी ठरला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.