Agriculture Technology : सूर्यफूल लागवडीचे सुधारित शाश्‍वत तंत्रज्ञान

Sunflower Sustainable Technology : सूर्यफूलांच्या बियांमध्ये ४० ते ४५ टक्के तेलाचे प्रमाण आहे. सूर्यफूल तेलामध्ये ६९ टक्के लिनोलेईक आम्ल असून, ते रक्तातील कोलेस्टेरॉल प्रमाण कमी करून उत्तम रक्तभिसरणास मदत करते.
Sunflower Cultivation
Sunflower CultivationAgrowon
Published on
Updated on

डॉ. अशोक डंबाळे, डॉ. अशोक घोटमोकळे, डॉ. वसंत सूर्यवंशी

Sunflower Farming : सूर्यफूल हे कमी कालावधीत व तीनही हंगामांत येणारे एक महत्त्वपूर्ण तेलबिया पीक आहे. सूर्यफुलाच्या बियांमध्ये ४० ते ४५ टक्के तेलाचे प्रमाण आहे. सूर्यफूल तेलामध्ये ६९ टक्के लिनोलेईक आम्ल असून, ते रक्तातील कोलेस्टेरॉल प्रमाण कमी करून उत्तम रक्तभिसरणास मदत करते.

हवामान :

मुळात थंड हवामानातील हे पीक असून, बियाण्याची चांगल्या उगवणीसाठी ८ ते १० अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. पिकाची वाढ, बियाण्यातील तेलाचे प्रमाण वाढविण्यासाठी रात्रीचे तापमान १८ ते २० अंश सेल्सिअस, तर दिवसाचे तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस आवश्यक असते.

पूर्वमशागत :

खरीप हंगामासाठी जमिनीची चांगली मशागत केलेली असल्यास रब्बी हंगामामध्ये एखादी नांगरट करून कुळव्याच्या दोन पाळ्या घ्याव्यात.

जमीन, हंगाम व वेळ :

पेरणीची वेळ हा पाण्याची उपलब्धतेप्रमाणे निश्‍चित करावी लागते. कारण सूर्यफूलाला पाण्याचा ताण सहन होत नाही. पिकाची फुलोरा अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था पावसात सापडणार नाही, असे नियोजन करावे. रब्बी हंगामामध्ये सूर्यफूल लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी व सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण अधिक असलेली जमीन निवडावी. रब्बीसाठी १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात लागवड पूर्ण करावी. ३० सेंमीपेक्षा कमी खोली असलेल्या व पाणथळ जमिनीत या पिकाची लागवड करू नये. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असल्यास पिकाची उत्पादन चांगले मिळते.

बीजप्रक्रिया :

मररोग, मूळकुज या रोगाच्या प्रतिबंधासाठी पेरणीपूर्वी थायरम अथवा कार्बेन्डाझिम २ ते २.५ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. केवडा रोगाच्या प्रतिबंधासाठी मेटॅलॅक्झील (३५ एसडी) ६ ग्रॅम, तर मावा व अन्य रसशोषक किडींना प्रतिबंध करण्यासाठी इमिडाक्लोप्रिड (७० डब्ल्यूए) ५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. म्हणजेच त्यांच्यामुळे पसरणाऱ्या विषाणूजन्य रोगांना प्रतिबंध होऊ शकतो. त्यानंतर हवेतील मुक्त नत्राच्या स्थिरीकरणासाठी ॲझोटोबॅक्टर २५ ग्रॅम आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पी.एस.बी) २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे.

पेरणी : 

जिरायती पेरणी दोन चाड्यांच्या पाभरीने केल्यास बी आणि खत एकाच वेळी पेरता येते.

बागायती पिकाची लागवड सरी, वरंबा वरंब्यावर टोकण पद्धतीने केल्यास फायद्याचे ठरते.

बियाणे ५ सें.मी.पेक्षा जास्त खोल पेरू नये.

Sunflower Cultivation
Sugarcane Harvesting : कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडणी ठप्प

विरळणी व आंतरमशागत :

संकरित सूर्यफूल पिकाची हेक्टरी रोपांची संख्या ५५,५०० ठेवणे महत्त्वाचे ठरते. तिफणीने पेरणी करतेवेळी रोपांची संख्या ही कमी-अधिक होते. अधिक झालेली संख्या कमी करण्यासाठी विरळणी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. विरळणीचा परिणाम खताच्या मात्रेएवढाच दिसून येतो. म्हणून पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी विरळणी करून एके ठिकाणी फक्त एकच जोमदार रोप ठेवावे. पहिली खुरपणी पेरणीनंतर पहिल्या १५ दिवसांत आटोपून घ्यावी. पहिली कोळपणी पेरणीनंतर २० दिवसांनी, तर दुसरी कोळपणी ४० दिवसांनी करावी.

सूक्ष्म अन्नद्रव्ये :

लोह, मँगेनीज व मॉलिब्डेनम कमतरता असलेल्या जमिनीत ही सूक्ष्म अन्नद्रव्ये शिफारशीप्रमाणे द्यावीत. फुले उमलण्याच्या वेळी बोरॅक्स (०.२ टक्का) म्हणजे २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी केल्यास दाणे भरण्याचे व त्यातील तेलाचे प्रमाण वाढते. झिंक सल्फेट (१.० टक्का) म्हणजेच १० ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारल्यास उत्पादनात वाढ होते.

सिंचन व्यवस्थापन _

सूर्यफूल हे पाण्यासाठी अतिसंवेदनशील पीक आहे. एकूण पाणी वापराच्या २० टक्के पाणी वाढीसाठी ५५ टक्के पाणी फुलोरा अवस्थेत, तर उरलेले २५ टक्के पाणी दाणे भरण्यासाठी वापरले जाते. पिकास रोपावस्था, फुलकळी अवस्था, फुलोऱ्याची अवस्था, दाणे भरण्याची अवस्था या चार संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे गरजेचे आहे. फुलकळी ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहतात व उत्पादनात घट येते.

पाण्याच्या उपलब्धतेनुसार नियोजन...

आपल्याकडे एक पाळी देण्याइतकेच पाणी असेल, तर आपण पीक फुलोऱ्यावर असताना (म्हणजे पेरणीनंतर ५५ ते ६५ दिवसांनी) पिकास पाणी द्यावे.

आपल्याकडे दोन पाळ्यांइतकेच पाणी असेल, तर फुलकळी अवस्था (म्हणजे पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी) व पीक फुलोऱ्यावर असताना (म्हणजे पेरणीनंतर ५५ ते ६५ दिवसांनी) पिकास पाणी द्यावे.

आपल्याकडे तीन पाळ्या देण्याइतके पाणी असेल तर फुलकळी अवस्था व पीक फुलोऱ्यावर असताना आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत (म्हणजे पेरणीनंतर ६५ ते ७५ दिवसांनी) पिकास पाणी द्यावे.

पीक फुलोरा अवस्थेत असताना तुषार सिंचन करू नये.

फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळे राहतात. उत्पादनात घट येते.

Sunflower Cultivation
Agriculture Irrigation : पालखेडला दोन आवर्तने द्या; अन्यथा मंत्रालयासमोर आत्मदहन करू

तणनियंत्रण :

सूर्यफुलास फुटवे किंवा फांद्या फुटत नसल्याने तणे मोठ्या प्रमाणात वाढतात. तणनियंत्रणासाठी १५ दिवसांच्या अंतराने २ कोळपण्या व एक खुरपणी करावी.

रासायनिक तणनाशकाचा वापर करणार असाल...

पेरणीनंतर पण उगवणपूर्व वापरायचे तणनाशक - पेंडीमेथिलीन (३० टक्के ईसी) २५ ते ३० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे पेरणीनंतर परंतु पीक उगवण्यापूर्वी फवारणी घ्यावी.

त्यानंतर गरजेनुसार २५ ते ३० दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करून पीक तणविरहित ठेवावे.

हस्त परागीकरण :

सूर्यफूलात बी भरण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी पीक फुलोऱ्यात असताना सकाळी ८ ते ११ च्या दरम्यान एक दिवसाआड फुलावरून हात फिरवावा. हस्तपरागीकरण शक्य नसल्यास फुले उमलण्याच्या वेळी बोरॅक्स २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फक्त फुलांवर फवारणी करावी. मधमाश्‍यांच्या पेट्या हेक्टरी ५ या प्रमाणात ठेवल्यास सर्वांत उत्तम.

बियाण्याचे हेक्टरी प्रमाण :

हेक्टरी झाडांची संख्या योग्य ठेवावी. सूर्यफुलाच्या सुधारित व संकरित जातीनुसार प्रति हेक्टरी बियाण्याचे प्रमाण हे कमी जास्त लागते.

वाण कोरडवाहू (किलो./हे.) बागायती (किलो./हे.)

सुधारित ८-१० ६-७

संकरित ५-६ ४-५

सुधारित / संकरित वाण

अ. क्र. वाण पीक परिपक्व होण्यास लागणारा कालावधी (दिवस) हेक्टरी उत्पादन (क्विंटल) तेलाचे प्रमाण (टक्के) वैशिष्ट्ये

सरळ वाण

१. मॉडर्न ८० – ८५ ८ ते १२ ३४ ते ३६ लवकर परिपक्व होणारा, कोरडवाहू लागवडीस योग्य

२. एस. एस -२०३८ (भानू) ८५ – ९० १५ ते १६ ०० अधिक उत्पादकता, कोरडवाहू लागवडीस योग्य

३. एल.एस-८ ९० – ९५ १२ ते १५ ३५ ते ३७ अधिक उत्पादन देणारा वाण

४. एल.एस- ११ ८० – ८५ १२ ते १४ ३४ ते ३६ लवकर परिपक्व व केवडा रोगास प्रतिकारक्षम

संकरित वाण

५. केबीएसएच-४४ ९० – ९५ १८ ते २० ३६ ते ३८ अधिक उत्पादन क्षमता

६. एल एस एफ एच-३५ ९० – ९५ १८ ते २० ३६ ते ३८ कोरडवाहू लागवडीस योग्य, केवडा रोगास प्रतिकारक्षम

७. एल. एस. एफ. एच-१७१ ९० – ९५ १८ ते २० ३८ ते ४० तेलाचे प्रमाण अधिक, केवडा रोगास प्रतिकारक्षम.

पेरणीचे अंतर :

वाण पेरणीचे अंतर (दोन ओळीमतील अंतर × दोन झाडांतील अंतर) हेक्टरी झाडांची संख्या

संकरित ६० × ३० सें.मी. ५५,५००

सुधारित ४५ × २० सें.मी. ७५,५००

आंतरपीक :

भुईमूग + सूर्यफूल (६:२ किंवा ३:१) तसेच सूर्यफूल + तूर (२:१) ही

आंतरपिके फायदेशीर आढळून आली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com