Kolhapur District Cooperative Milk Sangh : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात (गोकुळ) पशुसंवर्धन विभागातील औषध खरेदीत घोटाळा झाल्याचे एक निनावी पत्र संघाला पाठविले आहे. त्यामध्ये औषधांमध्ये कसा घोटाळा केला जातो, कोण डॉक्टर हा घोटाळा करतो, टक्केवारी कशी ठरते याची माहिती दिली आहे. यामुळे ‘गोकुळ’मध्ये एकच खळबळ उडाली आहे. यावर गोकुळच्या विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी वक्तव्य करत गोकुळच्या कारभारावर पुन्हा एकदा आरोप केले आहेत.
महाडिक म्हणाल्या की, गोकुळच्या कारभारावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. त्यानुसार गोकुळचे संचालक मंडळ बरखास्त झाले असते. मात्र, ही कारवाई वैयक्तिक आकसापोटी करून गोकुळची बदनामी केली असे चर्चा झाली असती. त्यामुळे ही कारवाई मीच थांबवली आहे. तसेच गोकुळकडे आलेल्या निनावी पत्रातील औषध घोटाळ्याची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी दूध संघाकडे काल औषध घोटाळ्याबाबत निनावी पत्र आले आहे. याबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
महाडिक म्हणाल्या, ‘गोकुळ’मध्ये चुकीचा कारभार होत आहे. याबद्दल अनेकवेळा आवाज उठवला होता. याची चौकशीही झाली. न्यायालयाने या कारभाराबाबत ताशेरी ओढले आहेत. मात्र, सत्ताधारी संचालकांना काही दिवस संधी द्यावी, या हेतूने ही कारवाई आपण स्वतःच थांबवली आहे. मात्र, अजूनही हा कारभार थांबलेला नाही. ‘गोकुळ’मध्ये डॉक्टरांकडून गैरव्यवहार केला जात असल्याचे निनावीपत्र आले आहे. या पत्राला बेदखल करण्याऐवजी त्याची चौकशी करून फौजदारी दाखल करावी, हे पत्र खोडसाळपणे लिहिले आहे असं म्हणणं चुकीचं आहे.
...म्हणून निनावी पत्राद्वारे दिली माहिती
प्रस्थापितांना अंगावर घेणे परवडणार नाही म्हणूनच संबंधिताने औषध खरेदी घोटाळ्याची माहिती निनावी पत्राद्वारे दिली आहे. याची चौकशी होणे गरजेचे असल्याचेही महाडिक यांनी सांगितले.
त्या निनावी पत्रात काय?
‘गोकुळ’मध्ये पशुसंवर्धन विभागास अनेक कंपन्या औषध पुरवठा करत असतात. औषधांची निविदा काढत असताना त्याची गुणवत्ता ही पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या समितीकडून ठरते. मात्र, गेली कित्येक वर्षे एका डॉक्टरकडून संबंधित औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्यांशी परस्पर बैठका होतात. त्यांच्या प्रतिनिधीशी खरेदीवरील कमिशनची टक्केवारी ठरवली जाते. अशा चुकीच्या प्रकारे औषधे खरेदी केली जातात.
ज्या कंपन्या पुरवठा करतात त्यांच्याकडून सुरुवातीच्या टप्प्यातील औषधांची गुणवत्ता चांगली असते. त्यानंतर तीच औषधे -इंजेक्शन पाणी भरून दिल्या जातात. त्यामुळे औषधे -इंजेक्शनचा उपयोग होत नाही. याविषयी बऱ्याच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची तक्रार आहे. वास्तविक प्रत्येक औषध स्टोअरला देताना त्याची गुणवत्ता तपासणी आवश्यक आहे. अनेक कंपन्यांशी त्यांचे लागेसंबंध आहेत. कोट्यवधी रुपयांचे कमिशन त्यांना त्यातून मिळत असते, त्यामुळे संबंधितांची चौकशी करावी, चौकशी सुरू असताना त्यांना निलंबित करावे. असे त्या पत्रात लिहले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.