Crop Insurance : विमा कंपनीने एकाच दिवशी दिलेल्या माहितीत तफावत

Crop Insurance Scheme : पीकविमा दाव्यांच्या बाबतीत विमा कंपनीने एकाच दिवशी दिलेल्या माहितीत तफावत आढळून आल्याचे समोर आले आहे.
Crop Insurance
Crop Insuranceagrowon

Chhatrapati Sambhajinagar News : जिल्ह्यातील पीकविमा दाव्यांच्या बाबतीत विमा कंपनीने एकाच दिवशी दिलेल्या माहितीत तफावत आढळून आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता कृषी विभागाने विमा कंपनीने दिलेल्या कारणांचा मंडळ व लाभार्थीनिहाय आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीसमोर हा सर्व प्रकार ठेवत, विमा कंपनीने दावे फेटाळण्याची कारणे तपासून ती सयुक्तिक नसल्यास विमा कंपनीला परतावा मंजूर करण्यासाठी बाध्य करण्याची भूमिका जिल्हा कृषी विभागाने घेतली आहे.

या संदर्भातील माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चोलामंडल एम. एस. जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून खरीप २०२३ मध्ये शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला. जवळपास ६ लाख ६९ हजार ६२७ विमा दाव्यांपैकी विमा कंपनीने ४ लाख ५१ हजार ३९३ दावे फेटाळले होते. जिल्हा कृषी विभागाकडून कंपनीकडे शेतकऱ्यांच्या प्राप्त तक्रारींच्या आधारे दावे फेटाळण्या मागची नेमकी कारणमीमांसा काय याचे उत्तर मागितले जात होते. परंतु अपेक्षित माहिती कृषी विभागालाही मिळत नव्हती.

Crop Insurance
Crop Insurance Disqualified : पाच लाख शेतकरी पीकविम्यातून अपात्र

अखेर आयुक्तांकडे तक्रारीची तंबी दिल्यानंतर गुरुवारी (ता. ५) सकाळी विमा कंपनीने एकूण विमा दाव्यांपैकी २ लाख २९ हजार १५५ विमा दावे मंजूर केल्याचे कळविले. तर त्याच दिवशी सायंकाळी पुन्हा मेलद्वारे ३ लाख ४३ हजार ६८३ विमा दावे मंजूर केल्याचे कळविले. त्यामुळे विमा कंपनीकडून एकाच दिवशी सकाळी व सायंकाळी दिलेल्या स्वीकृत दाव्याच्या माहितीत तफावत प्रकर्षाने पुढे आली. शिवाय दिवसभरात आकडा बदलला कसा यावरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले. त्यामुळे हरकतीत आलेल्या कृषी विभागाने आता विमा कंपनीकडून फेटाळण्यात आलेल्या ३ लाख २५ हजार ९४४ पीकविमा दाव्यांचा सखोल अभ्यास करणे सुरू केले आहे.

Crop Insurance
Crop Insurance : पीक विम्याबाबत कृषी विभागाकडून महत्वाची सूचना, नावातील किरकोळ बदल गाह्य

विमा कंपनीकडून कृषी विभागाला गुरुवारी (ता. ५) कळविण्यात आलेल्या माहितीनुसार, जवळपास ६६,७४३ दावे उशिरा सूचना देणे, ७२१ दावे चुकीची कारणे देणे, १०६२० दावे वादळी पाऊस नसताना तो कळविणे, ३९१०५ दावे दुष्काळ नसताना दुष्काळाचा ऑप्शन सिलेक्ट करणे, ५३०३ दावे डिसीज पेस्टच्या कारणाची, तर जवळपास १८,३३७ दावे बिगर मोसमी पावसाचा ऑप्शन सूचना देताना कळविण्यात आल्याने रिजेक्ट केल्याचे समोर आले आहे.

कंपनीने दिलेली कारणे पाहता पीकविमा संदर्भात शेतकऱ्यांची ही साक्षरता प्रकर्षाने पुढे आली आहे. एकीकडे एक रुपयात विमा आणि दुसरीकडे विमा परतावाच मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अंतिम पीकविमा हा प्रश्‍नही आता या विमा परताव्याच्या मुद्द्यामुळे ऐरणीवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विम्याची सूचना देण्याची शेतकऱ्यांना मर्यादा, मग विमा कंपनीला विमा परतावा कधी द्यावा याविषयी मर्यादा नाही का, असा प्रश्‍नही शेतकरी उपस्थित करीत आहेत.

विमा कंपनीने फेटाळलेल्या पीकविमा दाव्याचा आता मंडळनिहाय अभ्यास व आढावा घेऊ. त्यानंतर हा सर्व प्रकार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती समोर ठेवला जाईल. विमा कंपनीने दिलेली कारणे सयुक्तिक न वाटल्यास पीकविमा धारक शेतकऱ्यांना विमा परतावा मिळवून देण्यासाठी कृषी विभाग प्रामाणिक प्रयत्न करेल.
- प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com