Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop : माणसांना मिळतेय... गुरांचे काय? ; पावसाअभावी सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात विदारक चित्र

विकास जाधव 

Satara News : पाऊस झाला नसल्याने जमिनीतील ढेकाळ फुटलं नाय, पेरण्या तर दूरच... चारा महागलाय जनावरं सांभाळणे पण अवघड झालंय... माणसाला मिळतेय, पण गुरांचे काय? अशी व्यथा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेतकरी सांगत आहे.

ऐन ऑगस्टमध्ये ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्याची पाण्याची ही अवस्था, तर शेताला पाणी कुठून मिळणार. पाऊसच नसल्याने उगवलेली पिके सोडून द्यावी लागण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या प्रारंभापासूनच अडचणींना सामोरे जावे लागतेय. दरवर्षी अनेक भागांत उन्हाळी पाऊस होऊन शेतजमीन मशागतीसाठी तयार होतात. मात्र यंदा हा पाऊसच न झाल्याने मशागती झाल्या नाहीत. जूनच्या सुरुवातीपासून पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

हलक्या पावसानंतर जुलै महिन्यात जोरदार पाऊस येईल, या आशेवर काही भागांत शेतकऱ्यांनी पेरणी केली. जमिनीत कमी ओल, अपुरी मशागत असतानाही नशिबाच्या जोरावर शेतकऱ्यांनी धाडस केले. आता हे धाडस शेतकऱ्यांच्या अंगलट येऊ लागले आहे.

सध्या उन्हाळ्यासारखे ऊन पडत असल्याने, शेतातील कामे सकाळी उरकून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. पाणी नसल्याने कामही नाही. यामुळे सकाळी अकरा वाजताच शिवारे सामसूम दिसत आहेत. लहान, मोठ्या तलावातील पाण्याने थोडे फार शेतकरी त्यावर पिके जगविण्यासाठी धडपड करत आहेत. चाऱ्यासाठी मका पिकावर भर दिसून येतोय.

टोकाची परिस्थिती

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात मुसळधार, तर पूर्व भाग कोरडा अशी टोकाची परिस्थिती आहे. पाटण, महाबळेश्‍वर, जावळी, सातारा तालुक्यांच्या पश्‍चिम भागात दमदार पाऊस झाल्याने या परिसरातील ‘कोयना’सह प्रमुख धरणे ७० टक्के भरली आहे.

याउलट पूर्वेकडील लहान-मोठे तलाव कोरडे पडले आहेत. खटाव तालुक्यातील येरळवाडी, नेर तर माण तालुक्यातील राणंद, आंधळी हे प्रकल्प पाच टक्केही भरले नाहीत. याचा परिणाम पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनावर होत आहे.

माण, खटाव तालुक्यांत उरमोडीचे पाणी सोडल्याने काही प्रमाणात टंचाई अजूनही कमी आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या दुष्काळी तालुक्यांसह वाई, कऱ्हाड तसेच सातारा तालुक्याचा पूर्व भागालाही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

चाऱ्याच्या गाड्या फिरू लागल्या

दुष्काळ चक्रामुळे दूध व्यवसायाचा येथील शेतकऱ्यांना आधार आहे. शेतकरी जून महिन्यापर्यंत चाऱ्याचे नियोजन करतात. जरा पाऊस झाला की जनावरे चरायला नेता येतात. मात्र या वेळी पावसाअभावी जनावरांना चरायला नेता येत नाही.

शिल्लक चारा संपत आला आहे. चाराही महागला आहे. जिल्ह्यासह परजिल्ह्यांतून चाऱ्यांच्या गाड्या विक्रीसाठी दररोज फेऱ्या मारत आहेत. ज्या दुभत्या जनावरांनी कुटुंबाला आधार दिलाय, त्या जनावरांना जगविण्यासाठी आता महागाईचा चारा घेऊन देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

टँकर सुरू

माण तालुक्यात ४७ टँकरद्वारे ४१ गावे ३०६ वाड्यावस्त्यांवरील ६५ हजार ६०४ जनतेला, तर फलटण तालुक्यातील नऊ टँकरद्वारे सहा गावे ३७ वाड्यावस्त्यांवरील १४,२१६ जनतेस पाणीपुरवठा केला जात आहे.

पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. अगोदर झालेल्या पावसामुळे पिकांची परिस्थिती ठिक होती. पाणी असलेल्या शेतकऱ्यांकडून पाणी दिले जात आहे. पुढील चार ते पाच दिवसांत पाऊस न झाल्यास पिकांची परिस्थिती अवघड होणार आहे.
- भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा
सुरुवातीस झालेल्या पावसामुळे आमच्या भागात पेरण्या झाल्या. थुईथुई पावसामुळे पिकांची उगवण झाली. आता पावसाने दडी मारली आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने पिके दुपार धरू लागली आहेत. थोडे पाणी शिल्लक आहे. माणसाचे कसेतरी भागेल, पण जनावरांचे अवघड होणार आहे.
- सचिन कोकरे, पिंगळी ब्रु, ता. माण, जि. सातारा

तालुकानिहाय १ जून ते १० ऑगस्ट अखेर पावसाची टक्केवारी

सातारा ८९.३, जावळी ८५.४, पाटण ७५.१, कऱ्हाड ६३.१, कोरेगाव ४८.९,खटाव ६९.१, माण ६०.८, फलटण ५०.९, खंडाळा ५८.९, वाई ७१.७, महाबळेश्‍वर ६२.३.

तालुकानिहाय पेरणी (हेक्टर)मध्ये

सातारा- ३०६७२, जावळी- १६९८२, पाटण-४५२४२, कऱ्हाड ३८२२०, कोरेगाव-२१५०३, खटाव-३३०९८, माण-१४२०७, खंडाळा-१०९११, वाई-१७११७, महाबळेश्‍वर-४१५५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT