
Amravati News : तुरीचं ८० ते ९० टक्के पीक जयालं. डाबरीतील सोयाबीन खराब झालं. कपाशी मनावं तशी वाढून नाई रायली, सोयाबीन फुलावर सुटून रायलं म्हणून पावसाची वाट पायनं सुरू हाये, हंगाम असा नासला त सालभर कसं भागवावं’’, अशा शब्दांत तळवेल (ता. चांदूर बाजार, अमरावती) येथील शिवा राऊत यांनी आपली चिंता व्यक्त केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रातिनिधिक स्थितीच त्यांनी मांडली. जिल्ह्यात कमी, तर काही भागांत जास्तीच्या पावसामुळे मोठे क्षेत्र नापेर राहिले आहे.
अमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यांत सुरुवातीला कमी आणि त्यानंतर मुसळधार पाऊस झाला. त्याचा सर्वाधिक फटका तिवसा, चांदूरबाजार या तालुक्यांना बसला. तिवसा तालुक्याचे सरासरी क्षेत्र ६३६७३ असून, त्यातील ४३३८२.५० म्हणजे ८७, तर चांदूररेल्वे ४५६२२.२५ हेक्टर असून, येथे ३८५६४ हेक्टर म्हणजे ८९ टक्केच पेरणी होऊ शकली.
वरुड तालुक्यातही मोठे क्षेत्र पडीक राहिले आहे. या तालुक्याचे सरासरी क्षेत्र ५०८१०.४९ हेक्टर असून, त्यातील ४४६३४ हेक्टर म्हणजेच ८८ टक्के क्षेत्रावरच पेरणी करणे शक्य झाले.
जिल्ह्याची लागवडीची सरासरी ८५ टक्के इतकी आहे. परिणामी, मोठे क्षेत्र नापेर राहिले आहे. जिल्ह्याच्या १४ तालुक्यांत एकूण सरासरी लागवड क्षेत्र सहा लाख ९९ हजार ४२०.५५ हेक्टर आहे. त्यातील केवळ सहा लाख ६६ हजार ९७६ हेक्टरवर पेरणी करता आली. सर्वांत कमी पाऊस वडागव्हाण गावात १२५ ते १५० मिमी इतका झाला. कमी पाण्याच्या वावरात स्थिती गंभीर आहे.
दर्यापूर तालुका हा मूग-उडदासाठी ओळखला जात होता. पावसातील अनियमितता, वन्यप्राण्यांचा वाढता त्रास यामुळे तालुक्यातील सात हजार एकर मूग-उडदाखालील क्षेत्र यंदा कपाशीखाली आल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे. रामागड येथील सुभाष लाजूरकर म्हणाले, ‘‘गावातील अनेक शेतकरी मूग लागवड करत, काही कपाशीत आंतरपीक म्हणून मूग घेत. पण कधी कोरडा, कधी ओला दुष्काळ पडला की हे पीक उद्ध्वस्त होतं.’’
संत्रा पिकाखाली राज्याच्या दीड लाख हेक्टरपैकी सर्वाधिक ७० ते ७५ हजार हेक्टर क्षेत्र वरुड, मोर्शी व अमरावतीच्या इतर तालुक्यांत आहे. १५-२० वर्षांत फळगळीची समस्या गंभीर झाली आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात संततधार पाऊस होता, पण गळ मर्यादित होती. या वर्षी पाऊस कमी होऊनही गळ मोठ्या प्रमाणावर आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.