Nagar News : दुभत्या जनावरांना प्रामुख्याने रक्तातून होणाऱ्या तसेच कासेतील आजारांचे आता अचूक निदान होणार आहे. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाने आजारी जनावरांची आता ‘आरटीपीसीआर’ चाचणी करून चार तासांत अहवाल देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. ही सुविधा अल्प दरात शेतकऱ्यांना मिळणार आहे.
‘आरटीपीसीआर’ चाचणीमुळे अंदाजे उपचार, अनावश्यक खर्च आणि होणारे नुकसान टाळले जाईल. अशी चाचणी राज्यात पहिल्यांदाच सुरू होत असल्याचा नगर जिल्ह्यातील संगमनेर दूध संघाचा दावा आहे. प्रारंभी संगमनेर तालुक्यातील साधारण दोन लाख जनावरांना याचा फायदा होईल. संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या पुढाकारातून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
राज्यात दूध उत्पादन आणि प्रक्रियेत या दूध संघाचा नावलौकिक आहे. संघाच्या कार्यक्षेत्रात दोन लाख पशुधन असून एक लाखावर दुभती जनावरे आहेत. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या संघाने सातत्याने विविध उपक्रम राबविले. दुभत्या जनावरांत गोचीडापासून होणाऱ्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण अधिक आहे.
त्यात प्रामुख्याने ताप व अन्य सारखीच लक्षणे असलेल्या थेलेरियासिस, बेबिसिओसीस, अॅनाप्लाज्मोसिस व ट्रीपॅनोसोमियासीस तर दुभत्या गाईत मस्टीटीस हा कासेतील संसर्गजन्य आजार असून त्यात स्टाफयलोकॉककस, स्टेप्टोकॉककस, मायकोप्लास्मा व इ कोलाय हे आजार आढळतात. रक्तातील व दुधातील आजाराचे अचूक निदान होण्याला अनेक अडचणी येतात.
सध्याची रक्त चाचणी तपासणीची प्रक्रिया वेळखाऊ, खर्चिक आणि अडचणीची आहे. त्यामुळे या दूध संघाने जनावरांच्या संसर्गजन्य तसेच कासेतील आजाराच्या अचूक निदानासाठी रक्त व दूध तपासणी करण्यासाठी पशू वैद्यकीय अभ्यासक डॉ. अब्दुल समद यांच्या मार्गदर्शनाखाली ‘क्वेंचर बायोटेक’ यांच्याशी करार केला आहे. ‘आरटीपीसीआर’ चाचणीसाठी प्रामुख्याने डॉ. संदीप काळे यांचे मार्गदर्शन असेल.
थोडक्यात महत्त्वाचे...
- रक्त तपासण्यात थेलेरियासिस, बेबिसिओसीस, अॅनाप्लाज्मोसिस व ट्रीपॅनोसोमियासीस तपासण्या होणार
- दूध तपासण्यात स्टाफयलोकॉककस, स्टेप्टोकॉककस, मायकोप्लास्मा व इ कोलाय तपासण्या होणार
- या चाचण्या शेतकऱ्यांना केवळ साडेसातशे रुपयांमध्ये उपलब्ध
- दर दिवसाला साडेसात हजार तपासण्या करण्याची यंत्राची क्षमता
- चार तासांत तपासणी अहवाल देण्याची व्यवस्था
- तपासणी प्रयोगशाळा संगमनेर येथे सुरू होणार
- तपासण्यांसाठी रक्तनमुने, दुधनमुने काढण्याची पद्धत सोपी
- केवळ एक-दोन रक्त अथवा दूध थेंबांतून ही तपासणी होणार
- शेतकरी स्वतः त्यासाठी नमुने पाठवू शकणार
- तपासणीसाठी संकलन किट दूध संघाच्या औषधी विक्री केंद्रात उपलब्ध
जनावरांमध्ये तापेचे व कासेचे आजार अधिक होतात. उपचाराला अधिक अवधी लागतो. शिवाय आर्थिक खर्च अधिक होतो. आजार गंभीर झाल्यास जनावरांच्या जीवितासही धोका होतो. आता ‘आरटीपीसीआर’ चाचणी आणि तातडीने अचूक निदानाचा अहवाल प्राप्त झाल्यावर आजारी जनावराला तातडीने योग्य उपचार मिळतील. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळेल. आर्थिक बचत होईल. राज्यातील हा पहिलाच असा उपक्रम आहे.रणजितसिंह देशमुख, अध्यक्ष, संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.