Kesar Mango Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Kesar Mango Farming: केसर आंबा बागेत फळांचा दर्जा राखण्यावर भर

Mango Farming Management: छत्रपती संभाजीनगर येथील ओंकार चांडक यांनी केसर आंबा बागेचे पुनरुज्जीवन करून उत्तम दर्जाचे उत्पादन घेतले. योग्य व्यवस्थापन, संतुलित खतांचा वापर आणि काटेकोर सिंचनामुळे त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Maharashtra Farming Success Story:

शेतकरी नियोजन । पीक : केसर आंबा

शेतकरी : ओंकार रामप्रसाद चांडक

गाव : जि. छत्रपती संभाजीनगर

एकूण शेती : १५ एकर

केसर आंबा क्षेत्र ः साडेपाच एकर

ओंकार रामप्रसाद चांडक हे मूळ बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मादळमोही गावचे रहिवासी. पीडब्ल्यूडीमध्ये नोकरी करत होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वास्तव्यास आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर ते थेट शेतीकडे वळले. केसर आंबा बागेसह सुमारे १५ एकर शेती विकत घेतली.

या बागेत १५ वर्षे वयाची झाडे आहेत. मात्र बाग सुस्थितीत नसल्याने ती काढून टाकण्याचे श्री. चांडक यांचा विचार होता. मात्र बंधू रामेश्‍वर चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली बागेचे पुनरुज्जीवन केले. त्यातून ६१३ झाडांची साडेपाच एकरांतील केसर आंबा बाग पुन्हा उभी राहिली. योग्य व्यवस्थापन करून बागेतून दर्जेदार केसर आंबा उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे श्री. चांडक यांचा शेतीतील हुरूप आणखी वाढला.

बागेचे पुनरुज्जीवन

ओंकार चांडक यांनी पैठण तालुक्यातील अमरापूर शिवारातील केसर आंबा बागेसह १५ एकर शेती विकत घेतली. परंतु बाग सुस्थितीत नव्हती. बागेतील झाडांना खोडकीड लागली होती. जमीनदेखील कडक झाली होती. त्यामुळे ही बाग काढून टाकावी असा विचार ओंकार चांडक मनात आला. दरम्यान श्री. चांडक यांचे बंधू रामेश्‍वर चांडक यांनी बाग काढून टाकण्याऐवजी तिचे पुनरुज्जीवन करण्याविषयी मार्गदर्शन केले. रामेश्‍वर चांडक हे निवृत्त कृषी अधिकारी कृषी शास्त्राचे अभ्यासक आहेत. रामेश्‍वर यांच्याकडून शास्त्रोक्त सल्ला घेत बाग पुनरुज्जीवनाचे प्रयत्न सुरू झाले.

खोडकिडीच्या नियंत्रणासाठी झाडाची साल काढून प्रादुर्भावाच्या ठिकाणी रासायनिक कीटकनाशके सोडण्यात आली. नंतर ते छिद्र शेणाने लिंपून घेऊन त्यावर बोर्डो पेस्ट लावण्यात आले. बागेत आंतरमशागत, बाग स्वच्छता, शेणखताच्या वापरासह रासायनिक खतांचे संतुलित व्यवस्थापन करण्यावर भर देण्यात आला. साधारणपणे सहा महिन्यांत बागेचे पुनरुज्जीवन करण्यात श्री. चांडक यशस्वी झाले. सध्या बाग १८ वर्षे वयाची झाली आहे.

खत व्यवस्थापन

आंबा बागेत नियोजित खत व्यवस्थापनानुसार दरवर्षी जूनमध्ये रासायनिक खतांचा बेसल डोस दिला जातो. त्यामध्ये १९:१९:१९, चांगले कुजलेले शेणखत, निंबोळी पेंड, बिव्हेरिया बॅसियाना, मेटाऱ्हायझियम, मायकोरायझा, एनपीके यांचा वापर करण्यात येतो.

बागेत सेटिंग सुरू झाल्यानंतर जून महिन्यात दिल्याप्रमाणे पुन्हा खतांचे बेसल डोस दिले जातात. फळे सुपारी आकाराची झाल्यानंतर नत्रयुक्त खतांची फवारणी केली जाते. ही फवारणी दोन टप्प्यांत घेतली जाते. याशिवाय सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या पंधरा दिवसाआड तीन फवारण्या घेतल्या जातात. रासायनिक खतांच्या संतुलित वापरावर भर देत आवश्यकतेनुसार वापर केला जातो.

विश्रांती काळात अशी घेतात काळजी

बागेतील फळे तुटून गेल्यानंतर झाडांना बोर्डो पेस्ट लावण्यासह ब्ल्यू कॉपरची एक फवारणी घेतली जाते. याशिवाय बागेतील काडी काढली जाते. त्यानंतर पुढील हंगामासाठी आवश्यक शेणखताचे तसेच इतर जैविकसह आवश्यकतेनुसार रासायनिक खतांचे नियोजन केले जाते. ही सर्व कार्यवाही बागेच्या विश्रांती काळात केली जाते. गोमूत्र व शेणखताच्या पुरेशा उपलब्धतेसाठी तीन देशी गाईंचे संगोपन केले आहे.

पुढील पंधरवड्याचे नियोजन

सध्या बागेतील सेटिंग पूर्ण झाली आहे. किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. दरवर्षी मार्च महिन्यात असणारे तापमान यंदा फेब्रुवारीमध्येच जाणवत आहे. त्यामुळे ठिबकद्वारे व नियोजनानुसार मोकळे पाणी देण्याचे काम सुरू आहे. नुकतेच नॅनो युरिया व एनएची फवारणी घेतली आहे. आगामी काळात तापमानातील वाढ व बागेची स्थिती यांचा अंदाज घेऊन सूक्ष्म अन्नद्रव्यांची एक फवारणी घेतली जाईल, असे श्री. चांडक म्हणाले.

उत्पादनामुळे वाढला हुरूप

बागेचे पुनरुज्जीवन केल्यानंतर २०२२-२३ मध्ये पहिल्यांदा केवळ सात टन केसर आंबा उत्पादन मिळाले. त्या वेळी अनुभव नसल्याने दोन लाखांमध्येच बागवानाला बाग देऊन टाकली होती. गतवर्षी बागेतून सुमारे ३८ टन केसर आंबा उत्पादन मिळाले. त्यास चांगला दरही मिळाला. उत्पादित केसर आंब्यापैकी काही आंबा बागवानाला, तर काही आंब्याची थेट ग्राहकांना विक्री करण्यात आली. थेट विक्रीतून चांगले दर मिळाले. शिवाय एकूण शेतीवर झालेल्या खर्चाच्या तुलनेत चार लाख जास्तीचे केवळ केसर आंब्याच्या विक्रीतून मिळाले. त्यामुळे आपला शेतीतील हुरूप वाढल्याचे श्री चांडक सांगतात.

काटेकोर सिंचनावर भर

बाग वाफसा स्थितीत ठेवण्यावर भर दिला जातो. त्यासाठी ओलावा टिकून ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार सिंचन करण्यावर भर दिला जातो. पावसाळ्यात सिंचनाची आवश्यकता भासत नाही. मात्र पाऊस थांबल्यानंतर सिंचनाचे नियोजन केले जाते. साधारणपणे सप्टेंबरमध्ये बागेचे पाणी तोडले जाते. त्यानंतर ताणावर असलेल्या बागेला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोहर दिसून येण्यास सुरुवात होते.

नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत ५० टक्के मोहर दिसून येतो. सुरुवातीच्या काळात एक तास किमान २० लिटर पाणी मिळेल अशा पद्धतीने झाडांना सिंचन केले जाते. सहा ड्रीपच्या नळ्यांच्या माध्यमातून ताशी चार लिटर पाणी सोडले जाते. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात पाणी देण्याचा कालावधी दोन तास व तिसऱ्या आठवड्यात चार तास केला जातो. अशा पद्धतीने सिंचनाचे काटेकोर नियोजन केले जाते. याशिवाय आठवड्यातून एकदा पाटपाणी दिले जाते.

- ओंकार चांडक ९५७९०६३९९२

(शब्दांकन : संतोष मुंढे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT