Kesar Mango Farming : केसर आंबा उत्पादनातून अर्थकारण केले भक्‍कम

Article by Santosh Mundhe : जालना जिल्ह्यातील डोलखेडा बु. (ता. जाफराबाद) येथील भारत कडूबा सुळ-पाटील यांच्या कुटुंबाची १५ एकर शेती. पत्नी सौ. चंद्रकला, लहान भाऊ सतीश आणि आई शोभाबाई यांच्यासमवेत भारतराव शेतीची जबाबदारी सांभाळतात.
Kesar Mango Farming
Kesar Mango FarmingAgrowon

Mango Management :

शेतकरी नियोजन

पीक : केसर आंबा

 शेतकरी : भारत कडूबा सुळ पाटील

 गाव : डोलखेडा बु., ता. जाफराबाद, जि. जालना

 एकूण शेती : १५ एकर

 केसर आंबा : ४ एकर

 इतर फळबाग क्षेत्र : सीताफळ १ एकर, पेरू १ एकर.

जालना जिल्ह्यातील डोलखेडा बु. (ता. जाफराबाद) येथील भारत कडूबा सुळ-पाटील यांच्या कुटुंबाची १५ एकर शेती. पत्नी सौ. चंद्रकला, लहान भाऊ सतीश आणि आई शोभाबाई यांच्यासमवेत भारतराव शेतीची जबाबदारी सांभाळतात. केसर आंबा बागेची लागवड करण्यापूर्वी खरिपात सोयबीन, कपाशी, मका तर रब्बीत हरभरा, गहू अशी पिके ते घेत होते.

परंतु ही पीक पद्धती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नसल्याने त्यांनी फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. सुरुवातीला केसर आंबा लागवड केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सीताफळ, पेरू लागवड केली. नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या दर्जेदार आंब्याला शहरी भागांतून चांगली मागणी येऊ लागली. उत्पादित केसर आंब्याची जाफराबाद, जालना, छत्रपती संभाजीनगर, चिखली, बुलडाणा आदी शहरांमध्ये थेट विक्री करण्याचे तंत्र त्यांनी अवलंबिले. केसर आंबा उत्पादनातून अर्थकारण भक्‍कम झाल्याचे भारतराव सांगतात.

आधी केली पाण्याची सोय

सिंचनाच्या शाश्‍वत स्रोताशिवाय कोणत्याही पिकाचे दर्जेदार उत्पादन मिळविणे शक्य नाही. शिवाय उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई अधिक भासते. हीच बाब ध्यानात घेऊन भारत सुळ यांनी सिंचनासाठी १९९३ ते २००० दरम्यान ३ विहिरी आणि ३ बोअरवेलही घेतल्या.

एवढ्यावरच न थांबता त्यांनी विहिरी व बोअरवेल ला जोड म्हणून २०१८ मध्ये ३० बाय ३० मीटर आकाराचे शेततळे उभारले. त्यातून फळपिकांसह इतर पिकांसाठी सिंचनाची शाश्‍वत सोय तयार झाली.

Kesar Mango Farming
Mango Farming : दुर्गम भातपट्ट्यात आंबा बागेचा प्रयोग

दोन टप्प्यांत विस्तारला केसर आंबा

भारतराव यांनी केसर आंब्याची पहिल्या टप्प्यात २००४ मध्ये पारंपरिक पद्धतीने एक एकरांत २० बाय २० फूट अंतरावर २०० झाडांची लागवड केली.

त्यानंतर अतिघन पद्धतीने २०१९ मध्ये ३ एकरांवर दुसरी लागवड केली. अतिघन पद्धतीच्या बागेत दोन झाडांमध्ये १२ बाय ५ फूट इतके अंतर राखत सुमारे २७०० झाडांची लागवड केली आहे.

आंबा उत्पादनाचा प्रारंभ

पहिल्या टप्प्यात लागवड केलेल्या केसर आंबा बागेतून २०१० पासून उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली. तर दुसऱ्या टप्प्यातील बागेतून यंदा प्रथमच उत्पादन मिळणार आहे.

जुन्या लागवड पद्धतीत एक झाडापासून अंदाजे ७ ते ९ क्रेट केसर आंबा फळांचे उत्पादन मिळते. या वर्षी बागेतील फळे निर्यातक्षम दर्जाची आहेत. सध्या झाडांवर पावणे दोनशे ते दोनशे ग्रॅम वजनाची फळे झाडांना लगडलेली आहेत, असे भारतराव सांगतात.

खत व्यवस्थापन

केसर आंबा बागेला वर्षभरातून तीन वेळा खतमात्रा दिली जाते. पहिल्यांदा जूनमध्ये पाऊस झाल्यानंतर झाडाच्या आकारमानानुसार शेणखताची मात्रा दिली जाते. अतिघन लागवडीतील झाडांना प्रति झाड ४ ते ५ किलो आणि पारंपरिक पद्धतीने लागवड केलेल्या बागेतील झाडांना २० किलो प्रति झाड प्रमाणे शेणखत दिले जाते.

त्यानंतर महिनाभराने सेंद्रिय किंवा गांडूळ खत रिंग पद्धतीने अति घन लागवडीतील २ किलो तर पारंपरिक लागवडीला ५ किलो प्रति झाड प्रमाणे मात्रा दिली जाते. त्यानंतर दोन महिन्यांनी १०:२६:२६ किंवा डीएपी या रासायनिक खतांच्या मात्रा अतिघन लागवडीस १ किलो, तर पारंपरिक लागवडीस २ ते अडीच किलो प्रति झाड प्रमाणे दिली जाते.

रासायनिक खतमात्रा देताना ५० किलो रासायनिक खताच्या बॅगेत २ किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळून दिली जाते. याशिवाय फळे बोराच्या आकाराची झाली की ०:०:५० ची फवारणी केली जाते.

Kesar Mango Farming
Mango Farming : थेट आंबा विक्रीवर भर

ताण आणि पाणी व्यवस्थापन

झाडांना पाण्याचा ताण देण्यासाठी हिवाळ्यापासून बाग ताणावर असते. मोहर ८० टक्‍के फुटल्यानंतर पहिल्यांदा पाणी दिले जाते. ड्रीपद्वारे एक दिवसाआड ३ तास प्रमाणे सिंचन केले जाते.

फळधारणा झाल्यानंतर फळांचा आकार वाढत जाईल तसे पाण्याचे प्रमाण वाढविले जाते. फळे बोराच्या आकाराची झाल्यानंतर प्रति झाड किमान ५ लिटर पाणी मिळेल असे नियोजन केले जाते.

पीक संरक्षण

केसर आंबा झाडांना आलेल्या मोहराच्या संरक्षणासाठी शिफारशीप्रमाणे रासायनिक कीडनाशके आणि बुरशीनाशकांचा वापर केला जातो. पावसाळा संपल्यानंतर झाडाच्या खोडांना बोर्डो पेस्ट लावली जाते.

फळांची सेटिंग झाल्यानंतर फळगळ टाळण्यासाठी शिफारशीप्रमाणे रासायनिक फवारणी केली जाते. याशिवाय फळमाशी नियंत्रणासाठी फेरोमन सापळे एकरी ५ ते ६ प्रमाणे लावले जातात.

व्यवस्थापनातील बाबी

सध्या दोन्ही बागेत मिळून २ टप्प्यांत फळधारणा झालेली आहे. दर्जेदार आंबे झाडांवर लगडलेले आहेत.

मागील काही दिवसांपासून उष्णतेमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. वाढत्या तापमानात झाडांची पाण्याची गरज वाढलेली असते. हीच बाब ध्यानात घेऊन मागील पंधरवड्यापासून सिंचनाचे काटेकोर नियोजन करत आहे.

झाडांवर लागलेल्या फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे फळांचा दर्जा खालावतो. त्यासाठी शिफारशीप्रमाणे रासायनिक फवारणी घेतली आहे. तसेच सापळे लावले आहेत.

पुढील महिनाभरात बागेचे वेळोवेळी निरीक्षण करून आवश्‍यकतेनुसार रासायनिक फवारणी व सिंचन व्यवस्थापनावर भर दिला जाईल. सोबतच पक्‍व झालेली फळे तोडण्याचे काम केले जाईल.

आंबा काढणी केल्यानंतर विक्रीसाठी २ किलो आणि ४ किलो प्रमाणे बॉक्स पॅकिंग केले जाईल. ग्राहकांना थेट विक्री करण्यावर भर दिला जाईल.

भारत सुळ-पाटील, ९५४५४६४८१०

(शब्दांकन : संतोष मुंढे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com