मुकुंद पिंगळे
Nashik Mango Farmer Success Story : नाशिक जिल्ह्यातील निरगुडे (ता. त्र्यंबकेश्वर) येथील पांडुरंग सोमा भोये या परिवाराला ३० वर्षांपासून प्रयोगशील शेतीचा वारसा आहे. नागली, वरई, भात आदी पारंपरिक पिकांच्या तुलनेत सन १९९० पासून त्यांनी टोमॅटो, वांगी, भेंडी, गिलके अशी भाजीपाला शेतीची कास धरली. सन २००१ मध्ये त्यांनी लखनौ सरदार पेरू वाणाची लागवड केली.
प्रयोगशीलतेचा हा वसा चिरंजीव अंबादास यांनी जपला. कला शाखेतून पदव्युत्तर तर शिक्षण शास्त्र विषयात पदवी त्यांनी घेतली. सेट परीक्षाही ते उत्तीर्ण झाले. सन २००९ ते २०१४ या कालावधीत तासिका तत्त्वावर परिसरातील महाविद्यालयात साहायक प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली. पुढे तांत्रिक कारणांमुळे त्यांना नोकरी सोडावी लागली. मग शेतीतच खरे करिअर घडवायचे हा निश्चय बाळगून ते वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यात पूर्णवेळ उतरले.
शेतीत व्यावसायिक दृष्टिकोन
व्यावसायिक दृष्टिकोनातून अंबादास यांनी शेतीचा विकास सुरू केला. परिसरातील शेतकरी जनार्दन भोये, नामदेव लहारे, धर्मराज महाले व तत्कालीन तालुका कृषी अधिकारी श्री.पाटील यांनी मार्गदर्शन केले. केसर आंबा हे मुख्य पीक निवडले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून रोपे आणून २०१८ च्या सुमारास दीड एकरांत लागवडही झाली.
कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या विषय विशेषज्ञ हेमराज राजपूत यांनी बागेसाठी मार्गदर्शन केले. हळूहळू आंबा बागेचा आवाका वाढू लागला. आत्मविश्वास येऊ लागला. आज एकूण पाच एकर शेतीपैकी तीन एकरांत आंबा व त्यातील अडीच एकरांत केसर वाण तर उर्वरित क्षेत्रात वनराज, रत्ना, सिंधू, पायरी, आम्रपाली, बैंगनपल्ली आदी वाण आहेत.
बांधावरच मिळवले मार्केट
सूक्ष्म पद्धतीने कामकाज करून गुणवत्ताप्रधान व स्वादयुक्त केसर आंबा उत्पादित करण्यात अंबादास यांना यश मिळाले आहे. म्हणूनच व्यापारी थेट बांधावर खरेदीसाठी येतात. तोडणीचा खर्च त्यांच्याकडेच असतो. नाशिक, मुंबई व पुण्यासह गुजरात राज्यातील विविध बाजारपेठांत आंबा जातो. त्यास किलोला ७०, ९५ रुपयांपासून ते १३५ रुपयांपर्यंत दर मिळतो.
उत्पादन (एकरी ८, ९ ते ९.५ टन )
रोपेनिर्मितीतून उत्पन्नाचा दुहेरी मार्ग
आंबा विक्री व्यवस्थेत चांगला जम बसल्यानंतर अंबादास यांनी रोपविक्रीतून उत्पन्नाची आणखी एक संधी शोधली. चुलतभाऊ मधुकर यांच्याकडून त्यांनी आंबा कलम करण्याचे प्रशिक्षण घेतले. सुरुवातीच्या काळात अडीच हजार कलमी रोपे व त्यांची विक्री साध्य झाली. त्यातून ८० हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळाल्याने हुरूप वाढला.
पुढे जाऊन शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केला. त्यातूनच पॉलिथिन व नेटचे आच्छादन असलेल्या चार टनेल्सची उभारणी करून त्यात रोपे तयार करण्यास सुरुवात केली. कृषी विभागाकडून २०२१ मध्ये शासकीय रोपवाटिकेची मान्यता मिळवली. मग ‘भोये नर्सरी’ नावाने रोपवाटिका नावारूपास येऊ लागली.
उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, कृषी पर्यवेक्षक श्री. दिवटे, कृषी सहायक दादासाहेब खोसे यांचे सहकार्य लाभले. आज अंबादास यांनी २५० मातृवृक्षांची लागवड केली आहे. आज वर्षाला ५० हजारांपर्यंत रोपेनिर्मितीची क्षमता पोहोचली आहे. प्रति रोप ८० रुपये दराने विक्री होते. या व्यवसायामुळे परिसरातील २५ कामगारांना हंगामी रोजगार उपलब्ध झाला आहे. अंबादास यांच्या प्रेरणेतून गावात आंबा लागवड क्षेत्र २५ एकरांपर्यंत पोहोचले आहे.
कुटुंबाच्या एकीतून प्रगती
संपूर्ण भोये कुटुंब शेतीत राबते. त्यामुळेच शेतीत त्यांनी उल्लेखनीय प्रगती केली आहे. यात अंबादास यांचे वडील पांडुरंग, आई विठाबाई, पत्नी सविता आदींचा समावेश आहे. पूर्वी चुलते भगवानराव यांच्या शिक्षणासाठी अंबादास यांच्या वडिलांनी मदत केली होती. पुढे आंबा लागवडीसाठी भांडवल नसल्याने दोघेही शिक्षक असलेले भगवानराव व ललिता भोये यांनी पाच लाखांची मदत अंबादास यांना केली.
पुढे अजून भांडवलाची गरज होती. अशावेळी अंबादास यांनी ठिबक सिंचनाच्या कामाला रोजंदारीने जात दररोज ३०० रुपये मेहनतानाद्वारे बागेसाठी खत व अन्य कामांसाठी भांडवल उभे केले. परिवार आज एकत्र आहे. आपल्या चुलत भावांचे शिक्षणदेखील शेती उत्पन्नातून करणार असल्याचे अंबादास सांगतात. शेतीतूनच पाइपलाइन करणे, विहीर खोदणे शक्य झाले. घराचे बांधकाम सुरू आहे.
पुरस्काराने सन्मान
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने अंबादास यांना आदर्श आंबा उत्पादक पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांचे प्रयोग पाहण्यासाठी विविध भागांतून शेतकरी येतात. अनेक तरुण शेतकऱ्यांना अंबादास मार्गदर्शन करतात. रोप निर्मिती व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात शेतापर्यंत येण्यासाठी रस्ता नव्हता त्यावेळी अर्धा किलोमीटरवरून पाठीवरून रोपे वाहून मुख्य रस्त्यापर्यंत आणण्याचे कष्ट अंबादास यांना घ्यावे लागले. विनोद साबळे यांनी रस्त्यासाठी जागा दिल्याने हा प्रश्न आता सुटला आहे. शेतीतील उत्पन्नातून पक्का मुरूम रस्ता तयार केला आहे. आजवर अनेक अडचणी आल्या. मात्र खचून न जाता पुढे जात राहिलो. म्हणूनच हे दिवस पाहायला मिळाले असे अंबादास आवर्जून सांगतात.
अंबादास भोये - ८८०५८०८४५१, ९४२०६२०३६४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.