Village Biodiversity Agrowon
ॲग्रो विशेष

Village Biodiversity : गावातील जैवविविधता जपण्याची जबाबदारी

Biodiversity Conservation : जगातील एकूण ऑक्सिजन उपलब्धतेमधील ५० टक्के प्राणवायू (ऑक्सिजन) समुद्र प्लवके तयार करतात, तर २० टक्के प्राणवायू ॲमेझॉनची (वर्षावने) जंगले तयार करतात, त्यामुळे या जंगलांना ‘पृथ्वीची फुफ्फुसे’ म्हणून ओळखले जाते.

Team Agrowon

डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील

Responsibility to Conserve Biodiversity : जगातील एकूण ऑक्सिजन उपलब्धतेमधील ५० टक्के प्राणवायू (ऑक्सिजन) समुद्र प्लवके तयार करतात, तर २० टक्के प्राणवायू ॲमेझॉनची (वर्षावने) जंगले तयार करतात, त्यामुळे या जंगलांना ‘पृथ्वीची फुफ्फुसे’ म्हणून ओळखले जाते. जागतिक जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून संपन्न अशा फक्त बारा राष्ट्रामध्ये भारताचा समावेश होतो. हीच जैवविविधता निसर्गाचा संपूर्ण समतोल राखण्याचे कार्य करते. आज विकासाच्या विविध प्रकल्पामुळे वनसंपत्ती धोक्यात येत आहे. भारताचा निती आयोग कोणत्याही विकासात्मक प्रकल्पांची मांडणी करत असताना पर्यावरणाला महत्त्व देतो. पाणलोट क्षेत्रांचा विकास करत असताना ‘माथा ते पायथा’ या तत्त्वाने कार्यरत असताना १५ टक्क्यांपेक्षा अधिक उतार असणाऱ्या गावांमध्ये वृक्ष लागवड आणि वनांच्या निर्मितीवर भर देणे हे पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरते.

वृक्ष लागवडीसाठी योग्य त्या शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. प्रत्येक गावाने आपल्या परिसरातील पर्यावरण, वनराई आणि जंगले जपली पाहिजेत. त्यांचे संरक्षण, संवर्धन आणि वाढ यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. परिसरातील नैसर्गिक हरित आच्छादन वाढवला पाहिजे. पाणलोट क्षेत्रांच्या उपचारांमध्ये वृक्ष लागवड व नंतर त्यांची तपासणी करण्यासाठी सुदूर संवेदन व भौगोलिक माहिती प्रणाली (जीपीएस) या तंत्राचा वापर केला जातो. या तंत्रामध्ये ज्या क्षेत्रावरील वनांचे किंवा नैसर्गिक आच्छादनाचे मोजमाप करायचे आहे, त्या क्षेत्राची उपग्रह प्रतिमा घेतली जाते. उपग्रहांवरील इन्फ्रारेड कॅमेऱ्याद्वारे टिपलेल्या या प्रतिमांचे संगणकाच्या साह्याने विश्‍लेषण केले जाते. या विश्‍लेषणातून आपल्याला जलसाठे, नैसर्गिक जंगले, जलप्रकल्प, पडीक जमीन, मानवी वसाहतीतील वाढ, शेती क्षेत्रामध्ये झालेले बदल इ. बाबी समजू शकतात. या उपग्रह प्रतिमा

साधारणतः मूळ रंगाच्या (True Colors) किंवा कृत्रिमरीत्या रंगाची भरणी (False Colour Composite -FCC) केलेल्या असू शकतात. जमिनीवरील विविध घटकांवर पडणाऱ्या सूर्यकिरणांचे परावर्तन अथवा उपग्रहाद्वारे सोडलेल्या किरणांचे परावर्तन यांचे संकलन अंकात्मक (डिजिटल) प्रतिमेमध्ये केले जाते. परावर्तनानुसार मिळणाऱ्या विविध रंगच्छटांची प्रतिमा तयार केली जाते. या आपल्या साध्या प्रतिमांमध्ये लाल, हिरवा, निळा (RGB) या दृश्य रंगच्छटांचे एकत्रीकरण केलेले असते. तर नॉर्मलाइज्ड डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स (NDVI)मध्ये निकट अवरक्त प्रकाश (जो वनस्पती जोरदारपणे परावर्तित करते) आणि लाल प्रकाश (जो वनस्पती शोषून घेते) मधील फरक मोजला जातो. त्यावरून त्या भागामध्ये वनस्पतींचे प्रमाण ठरवले जाते. याचा अर्थ प्रतिमेमध्ये असलेला लाल रंग जमिनीवरील वनस्पती, पिके अथवा घनदाट

अरण्य दर्शवितो. प्रतिमांकन तंत्रामध्ये क्रांतिकारी बदल झाले असून, आता बहू रंगच्छटा प्रतिमा (Multispectral Band) उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आता वनस्पती किंवा पिकामधील थोडा फरकही समजू शकतो. त्याला ‘स्पेक्ट्रल सिग्नेचर’ म्हणतात. या तंत्राद्वारे वृक्ष आच्छादनाचे वाढलेले एकूण क्षेत्रफळ (निर्देशांक क्रमांक २)आपण मोजू शकतो. तक्ता क्र. एक मधील निर्देशांक निर्देशांक क्रमांक १ साठी प्रश्‍नावली तयार करून गावकऱ्यांसोबत चर्चेतून वृक्षाच्या आच्छादनात झालेल्या बदलांबाबत नोंदणी करण्यास सुचवले आहे. हे काम पाणलोट विकास पथक, पाणलोट विकास समिती, संनियंत्रण व मूल्यमापन यांनी करावे असे केंद्र शासनाच्या नियमावलीमध्ये म्हटले आहे.

भारतामध्ये प्रदेशनिहाय नैसर्गिक आच्छादन वाढीच्या किमती बदलतात. तक्ता क्र. एकच्या खाली नमूद निगडित देशातील नमूद प्रदेशांमध्ये वृक्ष वाढीवरती होणारा परिणाम वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे. प्रकल्पामध्ये वृक्ष लागवड केल्यानंतर (पूर्वटप्पा) त्याबाबतची नोंदणी सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये करणे बंधनकारक होते. प्रकल्प पश्‍चात पूर्वटप्प्यातील आकडेवारी ग्राह्य धरून त्यामध्ये होणारा बदल हा सरासरी (टक्के) मध्ये दिला आहे.

Chart

या तक्त्यातील किमतीनुसार तीन वर्षांनी व पाच वर्षांनी वृक्ष आच्छादनातील बदल मोजणे अपेक्षित होते. मात्र याबाबत अनभिज्ञता आहे. यासाठी एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प इ. महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत झालेली वृक्ष लागवडीचे मूल्यमापन होणे अपेक्षित आहे.

संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संस्थेच्या मते, भारतामध्ये वनशेती हा पारंपरिक व्यवसाय असून, त्यातून भारतीयांना शाश्‍वत जीवनमान, ऊर्जा आणि पर्यावरणीय सुरक्षितता मिळाली आहे.

या वनसंपत्तीमुळे एकूण जळाऊ लाकडाच्या सुमारे ५० टक्के गरज भागवते. तर दोन तृतीयांश छोट्या - मोठ्या घरगुती गरजा, ७० ते ८० टक्के घरगुती स्वरूपातील गरजा (उदा. दारे, खिडक्या, फर्निचर इ.), ६० टक्के कागद निर्मितीची गरज, ९ ते ११ टक्के जनावरांसाठी हिरवा चारा, याशिवाय अन्न, फळे, औषधे, अन्य वनोपज यांसारख्या अनेक गरजा भागवल्या जातात. भारतामध्ये वृक्षवाढीसाठी कृषी विभाग व वन विभाग यांच्या वतीने १९८३ मध्ये २० केंद्रे सुरू केली होती. याशिवाय वनशेतीचे प्रबळीकरण करण्यासाठी राष्ट्रीय वन धोरण, १९८८ व राष्ट्रीय कृषी धोरण २००० मध्ये भर देण्यात आला होता. हरित भारत ही संकल्पना राबविण्यात नियोजन आयोगाने कृती दलाची रचना २००१ मध्ये केली. याशिवाय राष्ट्रीय बांबू अभियान २००२ पासून राबविण्यात आले. २००७ मध्ये राष्ट्रीय शेतकरी धोरण व हरित भारत अभियान २०१० राबविण्यात आले. या सर्व धोरणांद्वारे वन निर्मिती करून २.५ ते ३ अब्ज कार्बन डायऑक्साइड कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसहभागीय जैवविविधता पत्रकांद्वारे (Peoples Biodiversity Register) ग्रामपंचायत पातळीवरती माहिती संकलित केली जात आहे. हे कार्य दोन टप्प्यांमध्ये पार पाडले जाते. यामध्ये ३१ प्रकारची परिपत्रके जोडली आहेत. समुद्र किनारपट्टी वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये १९ परिपत्रके भरल्यानंतर संबंधित गावांची जैवविविधता माहिती मिळत आहे. पहिल्या टप्प्यातील प्राप्त माहिती नंतर दुसऱ्या टप्प्यांमध्ये जैवविविधतेचे मोजमाप संख्यात्मक पद्धतीने वन व कृषी विभाग करत आहे. दुसरा टप्पा हा शास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे, कारण यामध्ये वनस्पतिशास्त्रज्ञ, प्राणिशास्त्रज्ञ, पक्षितज्ज्ञ, जैवविविधता तज्ज्ञ अशा अनेक विद्याशाखांतून तज्ज्ञांच्या मदतीने हे अहवाल अंतिम ठरणार आहे. यासाठी पुढील तीन वर्षे ग्रामपंचायत पातळीवरती हे कार्य सुरू राहणार आहे. या निर्देशांकामध्ये सूचित केल्याप्रमाणे अशा प्रकारे माहितीचे संकलन करणे ग्रामपंचायत स्तरावर अपेक्षित आहे.

याबाबत आपण घुंगूर (जि. कोल्हापूर) येथील प्राथमिक टप्प्यातील संकलित केलेल्या जैविकता परिपत्रकाची माहिती घेऊ. या प्रमाणे आपल्या गावामध्ये - ग्रामपंचायतीमध्ये माहितीचे संकलन झाले आहे का, हेही तपासता येईल.

कोल्हापूरपासून ३५ कि.मी.वर, तर शाहूवाडीपासून ३२ कि.मी. वर, पन्हाळगडपासून १६ किलोमीटर अंतरावर मसाई पठारजवळ सह्याद्रीच्या निसर्गसंपन्न परिसराच्या आणि पन्हाळगड व विशाळगड या ऐतिहासिक राजमार्गांच्या आणि सुंदरभोपळा धबधब्याच्या कुशीत वसलेले गाव म्हणजे घुंगूर. या गावाच्या पूर्वेला भैरवनाथचे जागृत देवस्थान आणि माध्यमिक हायस्कूल, गावात मधोमध विठ्ठल मंदिर, गावाच्या उत्तरेला मराठी शाळा, पश्‍चिमेला घुंगूरवाडी आंबूशेत देवस्थान, पूर्वेला सावरेवाडी-धनगरवाडा आणि दक्षिणेला आंबेडकर नगर आणि भव्य आणि विशाल सह्याद्री डोंगराची पर्वत रांग, डोंगरात पाझर तलाव अशी स्थिती. गावात सरासरी पाऊस १८५० ते २४०० सेंमी पाऊस पडतो, त्यामुळे गावात मुबलक पाणी असून उसाचे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते. चारा पिके चांगली असल्याने दुग्ध व्यवसाय जोमात आहे. गावात ५ दूध संकलन डेअरी असून, सर्व दूध गोकूळ प्रकल्पाला जाते.

गावातील खरीप पिके : भात, नाचणी, वरी, भुईमूग, हळद, रताळी, कारिळा, भाजीपाला, सोयाबीन, वर्णा (पावटा), आले भांडी वांगी टोमॅटो, काकडी, फ्लॉवर, कारले.

रब्बी पिके : सूर्यफल, भाजीपाला, उडीद, मूग, चवळी,मक्का, स्वीटकॉर्न, हरभरा, तीळ, कांदा, लसूण, वाटाणा, कोथिंबीर.

उन्हाळी पिके : भाजीपाला, उन्हाळी भात, मक्का, उन्हाळी नाचणी.

बारमाही पिके : ऊस

फळझाडे : आंबा, फणस काजू, चिकू, पपई, नारळ, लिंबू, केळी, आळू जांभूळ, बदाम, पेरू, चिंच, कलिंगड

रानमेवा : करवंद (काळी मैना), तोरण, खोबरतोडे, पिरशी, बिरंबुळे.

चारा : गवत, हत्ती गवत, मक्का, उसाचा पाला (वाड), भाताचा पेंढा, कडवळ, बाजरी, ज्वारी, चवळी.

रानभाजी : कुर्डू, नाल, पात्री, केना,तोंडा, मांजरी, शेंडवल, मोहर, थर्मरा, घोळ, करडा, मोरशेंडा, टाकळा, कडवीची, हुंबराची भाजी.

औषधी वनस्पती : अमृतवेल, अर्जुन, कठीपत्ता, टणटणी, शतावरी, मोह, कडुलिंब, मुरुडशेंग, निरगुडी, रुई, आघाडा रानकेळ, गुंज, दगडी पाला, गुळवेल.

जंगली झाडे : ऐन, कुंभा बहावा, अर्जुन, निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाभूळ, सावर, पिंपळ वड, पायरी, बांबू, लोखंडी, कार्वी, मखमल, करवंद.

तण प्रजाती : केना, जंगली सुलई, दूर्वा, कुंदा दुधानी, घाणेरी, पिवळी टिलवन, आघाडा, धोत्रा, रुई, अमरवेल, एकदांडी, निरगुडी, चित्रहार, तरोटा.

कीड प्रजाती : खोडकीडा, खोडमाशी, मावा, तुडतुडे, लष्करी अळी, करपा, केसाळ अळी, शेंग पोखरणारी अळी, घाटे अळी, पिसारी पतंग, भुरी, मर, हुमणी, पांढरीमाशी, कूज, मिलिबग, फळमाशी, तेलकट डाग, फुलकिडे.

जवळची बाजारपेठ : बांबवडे, पन्हाळा, कोतोली, कळे, नांदगाव, कोल्हापूर.

लोकजीवन : मराठा, धनगर, सुतार, लोहार, कुंभार, न्हावी, बौद्ध , मुस्लिम.

जमिनीचा प्रकार : मध्यम, हलकी, भारी.

मृदेचे प्रकार : काळी, लाल, मुरमाड, चिकणमती

पाणी उपलब्धता : विहीर, बोअर, आड, तलाव शेततळी, पाझर तलाव.

औषधी वनस्पती : जांभूळ, चिंच, बहावा, भोकर, आवळा, उंबर, बोर हिरडा, गुंज, निरगुडी, कढीपत्ता, करवंद, अडुळसा, सर्पगंधा, धायटी, गुळवेल सागरगोटा, चिचार्डी, मुरुडशेंग, निवडुंग, रुई, आघाडा, रानकेळ, रानतुळस, कुहिली, टणटणी, शतावरी, वासन, मेहंदी नागचाफा.

झाडे, वेली : करंज, अंजनी, सप्तपर्णी, गुलमोहर.

वनस्पती / झाडे / वेली : बांबू, पळसवेल, काशीद, गुलाब, जाई, जुई, अशोक झेंडू, चाफा, रातराणी, चंद्रवेल.

इमारती लाकूड : सागवान, पळस, शिवर, निलगिरी, कवठ, महारुख, जाभूळ, करंज, भोकर.

पाळीव प्राणी : गाय, बैल, कुत्रा, मांजर, म्हैस, रेडा, शेळी, मेंढर..कोंबडी, जर्सी.

पक्षी : कावळा, चिमणी, साळुंखी, पोपट, बगळा, कोकारी भारद्वाज, मोर, लांडोर, रानकोंबडी, खंड्या, कोतवाल.

रानटी प्राणी : वाघ, बिबट्या, अस्वल, माकड, वानर, डुक्कर, गवारेडा, बैलगवा, सलिंदर, खवल्या, कोल्हा, पटकुरी.

उभयचर : खेकडा, साप, बेडूक, पाणकोंबडी, बेंडकुली, गोगलगाय.

जलचर वनस्पती : शेवाळ, केना, पाणकणीस, नाळघुट, लव्हाळा, लिली.

सस्तन प्राणी : ससा, भेकर, सांबर

सरीसृप : घोरपड

(गावाच्या माहितीचे संकलन ः मानसिंग सावरे, ९५४५६२३७११, वसुंधरा सामाजिक कौशल्य विकास संस्था, मु. पो. घुंगुर, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर)

ग्रामपंचायत घुंगूर (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर)

एकूण क्षेत्रफळ ७८८.८६ हेक्टर

एकूण लोकसंख्या १७६८(२०११)

जिरायती क्षेत्र १७० हेक्टर

बागायती क्षेत्र १३० हेक्टर

फॉरेस्ट क्षेत्र ३६० हेक्टर अंदाजे

पड जमीन १२८ हेक्टर

डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (इंदिरा महाविद्यालय, ताथवडे, पुणे)

डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT