ॲग्रोवन वृत्तसेवा
Nagpur News : नागपूर ः राज्य शासनाने मोठ्या दिमाखाने सुरू केलेल्या महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची अवस्था दयनीय झाली आहे. या मंडळाला ना अध्यक्ष आहे, ना अशासकीय सदस्य. सदस्य सचिवही प्रभारी असल्याने या मंडळाला अवकळा आली आहे. शासनाच्या उदासीनतेचा हा कळस असून, वनमंत्र्यांनी मोठ्या उत्साहाने सुरू केलेल्या अनेक मंडळांची अवस्था अशी बिकट झालेली आहे.
२००२ मध्ये जैवविविधता कायदा अस्तित्वात आला. २०१२ मध्ये मंडळ स्थापन झाले. राज्यातल्या जैवविविधतेच्या संवर्धनासाठी शहरी व ग्रामीण भागात समिती स्थापन करण्याची जबाबदारी या मंडळावर सोपवण्यात आली. मंडळाचे पहिले अध्यक्ष इरॉक भरुचा, त्यानंतर डॉ. विलास बर्डेकर यांच्या रूपाने मंडळाला अध्यक्ष लाभले. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर डॉ. एस. एस. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी नागपुरातील कार्यालयातून कामकाज करण्यास सुरुवात केली.
आघाडीची सत्ता जाऊन सप्टेंबर २०२२ मध्ये महायुतीची सत्ता येताच जैवविविधता मंडळासह अनेक महामंडळांचे अध्यक्षपद रद्द करण्यात आले. त्यानंतर तब्बल पावणेदोन वर्षांपासून जैवविविधता मंडळाचे अध्यक्षपद आणि अशासकीय सदस्यांची निवड झालेली नाही. तसेच मार्च २०२३ रोजी मंडळाचे सदस्य सचिव म्हणून नियुक्त असलेले प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव हे सेवानिवृत्त झाले. तेव्हापासूनच हे पद प्रभारी आहे. यावरून शासन राज्यातील जैवविविधता संवर्धन आणि संरक्षणाबाबत किती गंभीर आहे हे स्पष्ट होते.
उपराजधानीत वनखात्याचे मुख्यालय आहे. तसेच जैवविविधता मंडळाचे मुख्यालय स्वतंत्र इमारतीत आहे. मात्र या इमारतीतील मंडळ अध्यक्षांविना सुरू आहे. मंडळ चांगले काम करीत असताना अध्यक्ष आणि कायमस्वरूपी सदस्य सचिवाची नियुक्तीच करत नसल्याने कर्मचाऱ्यांचे मनोबल खालावत आहे. महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प संचालकांचा कारभार अतिरिक्तच आहे.
जैवविविधता समित्या स्थापनेत राज्य अग्रेसर
जैवविविधता संवर्धन, जैविक स्रोतांचा शाश्वत वापर, जैवविविधतेची न्याय्य वाटणी करण्यासाठी राज्यातील विविध शहरे व गावांमध्ये २८ हजार ६४९ जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन केल्या आहेत. देशात राज्याने यात आघाडी घेतली आहे. पण आता अध्यक्ष, अशासकीय सदस्यांविना आणि कायमस्वरूपी सचिव नसल्याने जैवविविधता मंडळाचे काम ठप्प आहे. हे मंडळ आता दिनविशेष साजरे करण्यापुरते मर्यादित राहिले असल्याचे बोलले जात आहे.
राज्यात पाच जैवविविधता वारसा स्थळे घोषित
राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील वारसा स्थळे जाहीर करायची आहेत. त्यासाठी सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना मंडळाने वारसा स्थळाचे प्रस्ताव पाठविण्याचे पत्र पाठविले आहे. मात्र एकाही जिल्ह्यातील वारसा स्थळाचा प्रस्ताव आला नसल्याची माहिती पुढे आली आहे. यापूर्वी जैवविविधता मंडळाने पाच वारसास्थळे जाहीर केलेली आहेत. त्यात गडचिरोलीतील सागवानाच्या भव्य वृक्षांकरिता प्रसिद्ध असलेल्या ग्लोरी ऑफ आलापल्ली, गणेश खिंड (जि. पुणे), लांडोरखोरी (जळगाव), सेस्टूरा हिरण्यकश्यप आणि बंबारडे (दोन्ही जि. सिंधुदुर्ग) या स्थळांचा समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.