paddy crop Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season : लावणीनंतर पाऊस गायब; भात, नाचणीचे मोठे नुकसान

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : ‘भेगाळल्या भुईपरी जिणं, अंगार जिवाला जाळी, बळ दे झुंजायला किरपेची ढाल दे,’ या अस्वस्थ करणाऱ्या ओळी... अगदी असंच जिणं वाट्याला आलंय ते समृद्ध समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर. कायमच पावसाची अवकृपा असणारा पूर्व भाग तर विमनस्क आहेच, पण पावसाळा संपेपर्यंत उसंत नसणारे तालुकेही पहिल्यांदाच तहानले आहेत. या भागात पावसाशिवाय पाण्याचे इतर स्रोत नसल्‍याने होणारे पीक नुकसान मोठे आहे. ‘यंदाच काही खरं नाही’, अशीच सार्वत्रिक प्रतिक्रिया खरिपाचे भवितव्‍य सांगणारी.

जिथून पाऊस सुरू होतो, दोन-दोन महिने सूर्यदर्शन होत नाही तो चंदगड तालुका उन्हाने भाजून निघतोय, बहुतांशी गावे तहानली आहेत. अगदी दहा किलोमीटरनजीक हंबेरे, आसगाव, तुळये, श्रीपादवाडी आदी गावपरिसरांत नाचणीसारखी पिके माना टाकत आहे. सतत पाणी वाहणाऱ्या भात शेती आज भेगाळली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील आजरा, चंदगड, शाहूवाडी, गगनबावडा, पन्‍हाळा हे तालुके पूर्णपणे जादा पावसाचे. छोटी छोटी शेती व त्यामध्ये घेतली जाणारी भात, नाचणा पिके हेच या तालुक्यांचे वैभव. मात्र तब्बल एक महिन्यापासून गायब झालेल्या पावसामुळे पीक वाचविण्याकरिता कोणी ओढ्यातून पाणी घेतोय, तर कोणी पाणी असणाऱ्याकडे विनवणी करत असल्याचे सध्या चित्र आहे.

यंदा सुरुवातीपासूनच खरिपाचे गणित विस्कटले. अनेकांनी एक महिना उशिरा आलेल्या पावसावर भाताची पेरणी केली, उगवणही झाली, पण भवितव्याची खात्री नव्‍हती. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर रोप लावण झाली. पण तेव्हापासून आजपर्यंत पाऊस गायबच आहे. भरीसभर म्हणून कडक ऊन आणि प्रचंड उष्णतेसह रोगराईने पिकांना ग्रासले आहे.

प्रत्येक वर्षी पश्‍चिम भागात पाऊस आणि पूर्व भागात पूरस्‍थिती सारखीच स्‍थिती असते. यंदा पूर्व भागात पूरस्थिती नाही. हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत पिकांना विहिरी-नद्यांचे पाणी देऊन जगविण्याची कसरत सुरू आहे. सोयाबीनवर पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव होत आहे. पावसाच्या उघडिपीचा उसालाही मोठा फटका बसत आहे, वाढ खुंटल्‍याचे चित्र आहे. ऊस उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या या तालुक्यांना उत्पादनात फटका बसण्याची शक्यता आहे.

आमच्‍या भागात अशी स्थिती पहिल्यांदाच झाली आहे. ओढ-नालेही आटल्याने भातासह नागली पीक संकटात आहे. जमिनी भेगाळल्‍याने पिकांची वाढ खुंटली आहे. ऊन प्रचंड आहे. पाण्याची सोय नसल्‍याने आम्ही हतबल झालो आहोत. पिकांचे नुकसान अटळ आहे.
- महेश पाटील, नाना गुरव, अप्पासाहेब पाटील, हंबेरे, ता. चंदगड
पावसाअभावी नाचण्याच्या केवळ काड्याच उरल्या आहेत. यामुळे यंदाचा खरीप वाया गेल्यातच जमा आहे. आता जरी पाऊस पडला तरी झालेले नुकसान भरून निघणारे नाही.
- रवळनाथ पाटील, नाचणी उत्पादक, हंबेरे, ता. चंदगड
यंदा पावसाची फारशी समाधानकारक स्थिती नाही. जुलै महिन्यातील पावसाने अपेक्षित पेरण्या झाल्या असल्या, तरी पावसाअभावी पिके संकटात आहेत. जिल्‍ह्यात ३१ जुलैपर्यंत पेरण्या सुरू होत्या. ३१ दिवसांपर्यंत पावसाचा खंड पडल्‍यास शेतकऱ्यांना पीकविम्याच्या नियमाप्रमाणे ‘मिड सीझन करेक्शन’ म्हणून पुन्हा पंचनामे करण्याची सुविधा पीकविम्यामध्ये उपलब्ध आहे. ३१ ऑगस्टपर्यंत पाऊस न झाल्यास जिल्‍हाधिकाऱ्यांशी या बाबत बोलून पंचनाम्याची कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- दत्तात्रय दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

१ ऑगस्टपासून ३३.७८ टक्के पाऊस

जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यांत पडणाऱ्या पावसापैकी केवळ ६६.३ टक्केच पाऊस झाला. १ ऑगस्ट ते २० ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी २८२.१ मि.मी. पाऊस पडतो. या कालावधीत जिल्ह्यात ९५.३ मि.मी. (३३.७८ टक्के) पाऊस झाला आहे. एक जून ते २० ऑगस्ट या कालावधीत १३३०.५ मि.मी. इतका सरासरी पाऊस होतो. या वर्षी तो ७९१.३ मि.मी. म्हणजे ५९.५ टक्के झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT